पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय रोजगार मेळ्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले नियुक्तीपत्रांचे वितरण


पाचव्या रोजगार मेळ्याअंतर्गत महाराष्ट्रात 450 हून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान

केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि फग्गन सिंग कुलस्ते यांच्या हस्ते मुंबई, पुणे आणि नांदेड या तीन ठिकाणी आयोजित रोजगार मेळ्यात उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान

Posted On: 16 MAY 2023 2:44PM by PIB Mumbai

मुंबई, 16 मे 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला संबोधित करत विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भर्ती झालेल्या सुमारे 71,000 उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वितरण केले.

महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नांदेड या ठिकाणी आयोजित आजच्या या पाचव्या रोजगार मेळ्यात एकूण 495 उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. आजच्या या रोजगार मेळाव्यात नोकरीची नियुक्ती पत्र देण्यात आलेल्या विभागामध्ये भारतीय डाक आणि टपाल, रेल्वे, हिंदुस्तान पेट्रोलियम, वैद्यकीय सेवा, सीमा रस्ते संघटना आणि संरक्षण विभागांचा समावेश आहे.

मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात आज झालेल्या कार्यक्रमात एकूण 172 उमेदवारांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. केंद्रीय ग्रामीण विकास आणि पोलाद राज्यमंत्री फग्गन सिंग कुलस्ते यांच्या हस्ते 36 उमेदवारांना यावेळी प्रत्यक्ष स्वरुपात नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेला रोजगार मेळा हा सरकारचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे, असे केंद्रीय ग्रामीण विकास आणि पोलाद राज्यमंत्री फग्गन सिंग कुलस्ते यांनी यावेळी नमूद केले. युवा वर्गाला त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने रोजगाराच्या संधी या उपक्रमामुळे मोठ्या प्रमाणावर सरकार उपलब्ध करून देत आहे. या उपक्रमाअंतर्गत सुमारे दहा लाख रोजगार देण्याचे सरकारचे उद्दिष्ट असून आगामी काळात हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असे आश्वासन कुलस्ते यांनी यावेळी दिले.

पुण्यातील विमान नगर इथल्या सिंबायोसिस संस्थेत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या रोजगार मेळाव्यात एकंदर 135 उमेदवारांना सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. देशाला आत्मनिर्भर बनवण्याच्या प्रक्रियेत आजच्या तरुणांनी मोलाचे योगदान देण्याचे आवाहन राणे यांनी यावेळी केले. चालू वर्षामध्ये देशभरातील 10 लाख तरुणांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असून आत्तापर्यंत 2 लाख 88 हजार तरुणांना सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे देण्यात आल्याची आकडेवारी देऊन राणे पुढे म्हणाले की, अमृत काळात देशवासीयांना सेवा देण्याची संधी या नवनियुक्त तरुणांना मिळणार आहे.

शिवाय आगामी 5 वर्षांच्या कालावधीत देश जागतिक पातळीवर तिसऱ्या स्थानी नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून त्यात देखील या तरुणाचा सहभाग मोलाचा राहील असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला. भारताची आयात कमी होऊन निर्यात वाढेल अशा पद्धतीचे नवनवीन उद्योग देशात उभे करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू असून तरुणांनी त्यात प्रामाणिक योगदान देण्याचे आवाहन राणे यांनी केले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे देशात नवा औद्योगिक हब उभारण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. कोरोना काळात देशाची अर्थव्यवस्था ढासळू न देण्याची जबाबदारी केंद्र सरकारने यशस्वीरीत्या पार पाडली असून आता आपली अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे त्यात सरकारी नोकरांसह देशभरातील तरुणांनी आपले योगदान द्यावे असे आवाहन राणे यांनी यावेळी केले.

भारतातील युवा वर्ग हीच देशाची खरी संपत्‍ती बनली असल्‍याचे प्रत‍िपादन केंद्रीय रेल्वे राज्‍य मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी नांदेड येथे आयोज‍ित पाचव्‍या रोजगार मेळाव्‍याच्‍या कार्यक्रम प्रसंगी केले. आज जगातल्‍या विविध  क्षेत्रातील मोठ मोठया पदांवर भारतीय तरूण कार्यरत असणे ही आपल्‍यासाठी अभ‍िमानाची गोष्‍ट असल्‍याचे दानवे म्‍हणाले. आपल्‍या देशातील तरूण भारतातच नव्‍हे तर संपुर्ण जगात आपली सेवा देत आहेत ही आपल्‍यासाठी लाख मोलाची गोष्‍ट आहे, असे त्‍यांनी यावेळी तरूणांना संबोधित करताना सांगितले.

नांदेड येथील न‍ियोजन भवनात आयोज‍ित करण्‍यात आलेल्‍या पाचव्‍या रोजगार मेळाव्‍याला केंद्रीय रेल्‍वे कोळसा आण‍ि खन‍िज राज्‍य मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची प्रमुख उपस्‍थीती होती. यावेळी खासदार प्रतापराव पाटील च‍िखलीकर, आमदार राजेश पवार, दक्ष‍िण मध्‍य रेल्‍वेच्‍या व‍िभागीय व्‍यवस्‍थापक न‍िती सरकार, आदींची उपस्थीती होती. पाचव्‍या रोजगार मेळाव्‍याच्‍या माध्‍यमातून नांदेड येथील डाक व‍िभाग आण‍ि  रेल्‍वे व‍िभागाच्‍यावतीने सुमारे 188 युवकांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते न‍ियुक्‍तीपत्र देण्‍यात आले.

रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या माननीय पंतप्रधानांच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्याच्या दिशेचे हा रोजगार मेळा एक पुढचे पाऊल आहे. विविध सरकारी विभागांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या या सर्व कर्मचाऱ्यांसाठी असलेला ऑनलाइन अभिमुखता अभ्यासक्रम 'कर्मयोगी प्रमुख' या मंचाच्या माध्यमातून नव्याने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना स्वतःला प्रशिक्षित करण्याची संधी मिळणार आहे.

या तीनही ठिकाणी आयोजित कार्यक्रमाला विविध मान्यवरांसह नियुक्त उमेदवार, त्यांचे कुटुंबीय मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

MaheshI/Sonal T/Sumeet/ Preeti

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1924477) Visitor Counter : 210


Read this release in: English