वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारतीय वेष्टन संस्था अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंगच्या 57 व्या स्थापना दिनी ऐतिहासिक सामंजस्य करांवर स्वाक्षऱ्या
Posted On:
15 MAY 2023 6:00PM by PIB Mumbai
मुंबई, 15 मे 2023
भारतीय वेष्टण संस्था अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंगचा 57 वा स्थापना दिवस काल मुंबईत साजरा करण्यात आला. वस्त्रोद्योग मंत्रालय, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय तसेच अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे मंत्री पीयूष गोयल यांनी दिलेल्या संदेशातून प्रेरणा घेत, ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या आपल्या स्थापना दिनी, संस्थेने विविध प्रतिष्ठित संस्था, विद्यापीठे आणि सरकारी संस्थांसोबत परस्पर सहकार्याशी संबंधित काही अधिकृत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यावेळी भारतीय वेष्टण संस्था अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंगच्या वतीने भारत सरकारच्या एक जिल्हा एक उत्पादन [One District One Product - ओडीओपी] या प्रकल्पाअंतर्गत तयार केलेल्या पॅकेजिंग रचनेसंबंधीच्या विशेष पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.
यानिमीत्त झालेल्या कार्यक्रमात, या उद्योगक्षेत्राशी तसेच संलग्न क्षेत्राचे प्रतिनिधी, भागधारक, प्राध्यापक, माजी विद्यार्थी आणि इतर पाहुणे उपस्थित होते. नवी दिल्लीतल्या गुरु गोविंद सिंह इंद्रप्रस्थ विद्यापीठेचे कुलगुरू प्रा. डॉ. महेश वर्मा या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात हरित भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्याच्या दृष्टीने शाश्वत वेष्टण: आव्हाने आणि अपेक्षा या विषयावर निमंत्रितांचे विशेष चर्चासत्र देखील आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात या उद्योगक्षेत्रातील आघाडीच्या तज्ज्ञांनी आपले विचार आणि दृष्टीकोन मांडले.
'शाश्वत वेष्टण हा शाश्वत उपभोग साखळीचा भाग असून, अगदी पहिल्या टप्प्यापासूनच पर्यावरणीय परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने हा महत्वाचा भाग असल्याचे सांगत डॉ. महेश वर्मा यांनी शाश्वत वेष्टनाचे महत्व अधोरेखीत केले.
या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले सेफपॅक इंडस्ट्रीज लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र तापरिया यांनीही आपली मते मांडली. केवळ 14% प्लास्टिकचा पुनर्वापर केला जाऊ शकतो, पण त्याचवेळी सुमारे 68 टक्के लोखंडाचा पुनर्वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे शाश्वतता हा शब्द केवळ शोभेपुरता न राहता, तो आपल्या मूलभूत कृतींमध्ये समाविष्ट व्हायला हवा असे ते म्हणाले.
जागतिक वेष्टण संस्था अर्थात वर्ल्ड पॅकेजिंग ऑर्गनायझेशनचे जागतिक दूत एव्हीपीएस चक्रवर्ती यांनीही उपस्थितांना संबोधीत केले. वेष्टणाच्या माध्यमातून दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देणे हे जागतिक वेष्टण संस्थेचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगीतले. भारतीय वेष्टण संस्था अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग आपल्यासाठी केवळ एक संस्था नसून, या संस्थेला आपल्या आयुष्यात भावनिक स्थान असल्याचे ते म्हणाले. आहे. कोविड काळात ज्याप्रमाणे आरोग्य सेवा क्षेत्रातले प्रतिनिधी म्हणजे आघाडीवर राहुन काम करत असलेल्या सुरक्षा व्यवस्थेतील पहिली फळी होती, अगदी त्याचप्रमाणे कोविड काळात वेष्टण व्यवसायातील सगळ्यांचे स्थान होते असे ते म्हणाले. मास्क आणि व्हेंटिलेटरसारख्या वैद्यकीय उपकरणांसाठी भारत हे जागतिक केंद्र बनले आहे. आणि आपण जर का बहुपदरी हवाबंद खोक्यांची निर्मिती बंद केली, तर त्यामुळे जग ठप्प होईल असेही ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय पॅकेजिंग संस्थेचे सहाय्यक संचालक शेखर आंबेरकर यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. जागतिक वेष्टण संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या वर्ल्डस्टार पुरस्कारांचा कार्यक्रम पुढच्या वर्षी भारतातच होणार आहे. 2023 साठीच्या वर्ल्डस्टार पुरस्कारांमध्ये भारत पहिल्या तीन क्रमांकामध्ये असल्याचा भारतीय वेष्टण संस्थेला अभिमान वाटत असल्याचे ते म्हणाले.
* * *
PIB Mumbai | S.Kane/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1924257)
Visitor Counter : 116