अर्थ मंत्रालय
महसूल गुप्तचर संचालनालयाने न्हावा शेवा बंदरात अवैध पदार्थांसह एक कंटेनर पकडला
Posted On:
14 MAY 2023 12:43PM by PIB Mumbai
गुप्तचर विभागाच्या विशिष्ट माहितीच्या आधारे, मुंबईच्या महसूल गुप्तचर विभागाने न्हावा शेवा बंदरात अवैध पदार्थांची वाहतूक करणारा एक कंटेनर पकडला. हा कंटेनर पुढील मंजुरीसाठी अर्शिया फ्री ट्रेड वेअरहाऊसिंग झोनमध्ये उतरवला जाणार होता. या कंटेनरच्या हालचालींवर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी बारीक लक्ष ठेवून होते. कंटेनरने बंदर सोडल्यानंतर, गंतव्यस्थानी पोहोचण्याऐवजी तो अर्शिया एफटीडब्ल्यूझेडकडे जात असताना एका खाजगी गोदामाकडे वळवण्यात आला होता.
या कंटेनरच्या हालचालीवर लक्ष ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना लगेच संशयास्पद हालचाली जाणवल्या आणि त्यांनी गोदामात कंटेनर अडवला. या 40 फूट लांब कंटेनरमध्ये परदेशी कंपनीच्या सिगारेट्स भरलेल्या होत्या आणि भारतीय मानकांचे पालन न केल्यामुळे भारतात त्यांची आयात करण्यास बंदी आहे. सीमाशुल्क अधिकाऱ्यांना फसवण्यासाठी त्या सिगारेट्स कंटेनरमधून काढून आयात दस्तावेजांमध्ये घोषित केलेल्या वस्तूंजागी ठेवून त्यांची तस्करी करण्याची योजना आखण्यात आली होती. हा कंटेनर अर्शिया एफटीझेडमध्ये नेण्यापूर्वी, सिगारेट्स काढून टाकल्यानंतर कंटेनरमध्ये भरावयाच्या आयात मालाचा गोदामात आधीच साठा केलेला होता.
आयात करण्यात आलेल्या कंटेनरमधून Esse, Dunhill, Mond आणि Gudang Garam या परदेशी ब्रँडच्या 1.07 कोटी सिगारेटी जप्त करण्यात आल्या. त्याचा पाठपुरावा करताना त्याच टोळीकडून यापूर्वी तस्करी करण्यात आलेल्या Esse Lights, Mond सारख्या विविध परदेशी ब्रँडच्या 13 लाख सिगारेटी दुसऱ्या एका गोदामातून जप्त करण्यात आल्या.
महसूल गुप्तचर विभागाने जप्त केलेल्या या परदेशी 1.2 कोटी सिगारेटचे एकूण बाजार मूल्य सुमारे 24 कोटी रुपये आहे.
आयातदारासह पाच जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर विभाग सातत्याने तस्करी करणाऱ्या टोळीच्या अशा योजना उघडकीस आणत आहे जे सेझ आणि एफटीडब्ल्यूझेड योजनांचा गैरवापर करून प्रतिबंधित मालाची तस्करी करत आहेत. महसूल गुप्तचर विभागाच्या या कारवाईमुळे सरकारी महसुलाचे संरक्षण होत आहे तसेच अवैध तंबाखूच्या हानिकारक परिणामांपासून समाजाचे संरक्षण होत आहे.
या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
***
R.Aghor/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1924074)
Visitor Counter : 128