संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सदर्न स्टार आर्मी अॅकेडेमिया इंडस्ट्री इंटरफेस (S2A212)

Posted On: 13 MAY 2023 7:10PM by PIB Mumbai

पुणे, 13 मे 2023

 

भारतीय लष्कराच्या दक्षिण विभाग म्हणजेच सदर्न कमांड मुख्यालयाच्या  क्षेत्रीय तंत्रज्ञान कक्षाने  दिघी येथील आर्मी इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (लष्करी तंत्रज्ञान संस्था) सहकार्याने 12 मे 2023  रोजी सदर्न स्टार आर्मी ऍकेडेमिया इंडस्ट्री इंटरफेस अर्थात 'सदर्न स्टार आर्मी - शिक्षण -उद्योग क्षेत्र यांच्यातील चर्चा' (S2A2I2) या  एक दिवसीय चर्चासत्र आणि प्रदर्शनाचे आयोजन केले होते.

'संरक्षण तंत्रज्ञानातील आत्मनिर्भर भारताचे परिवर्तन' ही कार्यक्रमाची मुख्य संकल्पना होती. S2A212 हा संरक्षण क्षेत्रातील आगामी तंत्रज्ञानविषयक कल दाखवण्याचा आणि स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी शैक्षणिक आणि उद्योग/स्टार्ट अप क्षेत्राशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचा प्रयत्न होता.

लेफ्टनंट जनरल ए के सिंग, एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएम, जीओसी-इन-सी, सदर्न कमांड हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.2022 साली लष्कराचे उपप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झालेले अनुभवी आणि कुशल जनरल ऑफिसर लेफ्टनंट जनरल एसएस हसबनीस (निवृत्त) हे देखील प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या बीजभाषणात संरक्षण तंत्रज्ञानात स्वयंपूर्ण होण्यावर भर दिला. आत्मनिर्भर भारताच्या प्रवासात संरक्षण उत्पादकांना आत्तापर्यंत आलेल्या अडचणी, आव्हाने त्यांनी सांगितलीआणि त्यावर मात करण्यासाठी पुढील मार्गही सुचवला. या कार्यक्रमात संरक्षण क्षेत्रातील विविध हितसंबंधी  संशोधन आणि विकास संस्था, शैक्षणिक संस्था आणि खाजगी उद्योगांचा मोठा सहभाग होता. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 50 हून अधिक प्रतिनिधी आणि 18 प्रदर्शन स्टॉल मांडण्यात आले होते. 

प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात आत्मनिर्भर भारताचे महत्त्व सांगितले. त्यांनी संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला आणि युद्धसामुग्रीच्या महागड्या आणि  फारशा विश्वासार्ह नसलेल्या उपकरणांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यावर भर दिला. प्रगत देशांतील शैक्षणिक संस्था अद्ययावत संरक्षक तंत्रज्ञान विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात आणि भारतानेही त्याचे अनुकरण केले पाहिजे असे प्रमुख पाहुण्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमाचे महत्व अधोरेखित करताना सांगितले. संरक्षण तंत्रज्ञानातील आत्मनिर्भर भारताचे आपले ध्येय साध्य करण्यासाठी वैज्ञानिक शोध, तांत्रिक आविष्कार आणि नवकल्पना यांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांच्या कथाही त्यांनी या वेळी विषद केल्या.

परिसंवादाच्या दुसऱ्या भागात, आत्मनिर्भर भारतासाठी योगदान देणाऱ्या उद्योग तज्ञांच्या तांत्रिक चर्चेवर भर देण्यात आला. जी ब्लॉक्स, लँड वेपन अँड इंजीनियरिंग सिस्टीम एल अँड टी लिमिटेड, पारस एरोस्पेस, ऑटोमेशन ए आय इन्फो सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड, फिनिक्स ग्रुप, झ्युस न्यूमरिक्स पुणे आणि ॲकोप्स सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड मधील प्रख्यात वक्ते आणि प्रतिनिधींनी या चर्चासत्रात आपले विचार मांडले आणि आज विकसित होत असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावरही त्यांनी प्रकाश टाकला. तज्ञ वक्त्यांच्या तांत्रिक चर्चा सत्रानंतर लष्कराच्या विविध उपक्रमांना पाठिंबा देणारे उद्योग, शैक्षणिक संस्था आणि सशस्त्र दल यांच्यात चर्चा झाली. 

 

* * *

PIB Pune | R.Aghor/Sushma/Shraddha/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1923921)
Read this release in: English