संरक्षण मंत्रालय
भारतीय तटरक्षक दलाकडून प्रदूषण प्रतिसादावर चर्चासत्र, कार्यशाळा आणि प्रात्यक्षिकांचे आयोजन
Posted On:
12 MAY 2023 2:29PM by PIB Mumbai
पणजी, 12 मे 2023
भारतीय तटरक्षक दल, जिल्हा मुख्यालय क्रमांक 11 (गोवा) यांनी 11-12 मे 2023 रोजी सागरी प्रदूषणाच्या प्रतिसादावर दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. विविध भागधारकांमधील समन्वय सुधारणे, प्रात्यक्षिके, मानक प्रक्रिया तसेच तटरक्षक दल आणि भागीदार संस्थांची तयारी तपासून पाहणे हा या चर्चासत्राचा उद्देश होता.
उपमहानिरीक्षक अरुणाभ बोस यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात आले. प्रत्येक संस्थांना आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी सुरक्षित किनारे आणि स्वच्छ सागरी पर्यावरण सुनिश्चित करण्यासाठी सर्व भागधारकांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आणि महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
भारतीय तटरक्षक दल हे भारताच्या सागरी क्षेत्रामध्ये तेल गळतीच्या प्रतिसादासाठी केंद्रीय समन्वय प्राधिकरण असल्याने तेल गळतीच्या कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी सर्व महत्त्वाच्या तेल हाताळणी संस्था आणि भागधारकांसोबत एकत्रितपणे काम करण्याची जबाबदारी तटरक्षक दलावर आहे.
कार्यशाळेत राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था, मत्स्य विभाग, मुरगाव बंदर प्राधीकरण, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, कॅप्टन ऑफ पोर्ट आणि मर्केंटाइल मरीन विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व भागधारक आणि संसाधन एजन्सींनी दोन दिवसीय चर्चासत्रात सहभाग घेऊन कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी त्यांच्या क्षमता, समस्या, विश्लेषण आणि सूचना यावर सादरीकरण केले.
SRT/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1923645)
Visitor Counter : 180