विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

सीएसआयआर–एनसीएल येथे ‘वन वीक वन लॅब’ अभियान

Posted On: 10 MAY 2023 2:14PM by PIB Mumbai

सीएसआयआर-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल),  पुणे, येथे "वन वीक वन लॅब" या कार्यक्रमाचे 22 मे 2023 ते 27 मे 2023 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. सहा दिवसांचा हा कार्यक्रम विशिष्ट थीम वर आधारित असून यामध्ये प्रयोगशाळेचे अत्याधुनिक संशोधन प्रदर्शित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असणाऱ्या प्रदर्शन गॅलरीतून एनसीएलचे तंत्रज्ञान आणि त्याचे सामाजिक महत्व अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न आहे. आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, परिसंवाद, स्टार्ट-अप एक्स्पो, कौशल्य विकास कार्यक्रम, ओपन डे, शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच संशोधन विद्यार्थ्यांचा एक गट “अवेक्षण” नामक एक विशेष कार्यक्रम सादर करणार आहे.

"वन वीक वन लॅब" या कार्यक्रमाची सुरुवात  विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी केली असून याचा उद्देश सीएसआयआरच्या प्रयोगशाळांची तंत्रज्ञानातील प्रगती आणि नवकल्पनांना सर्वांसमोर आणणे हा आहे. यामध्ये मुख्यत्वे एनसीएलच्या रोडमॅप मधील थीमवर प्रकाश टाकला जाणार आहे ज्यामध्ये स्वच्छ ऊर्जा, चक्रीय अर्थव्यवस्था, शाश्वत रासायनिक उद्योग, जैव-उपचार पद्धती, सी1 केमिस्ट्री, बायोमास आणि कृषि तंत्रज्ञान यांचा समावेश आहे.

या अभियानाचे उदघाटन प्रमुख पाहुणे प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि अध्यक्ष, डॉ. प्रमोद चौधरी यांच्या हस्ते 22 मे 2023 रोजी होणार आहे. त्यानंतर पुढील सहा दिवस हायड्रोजनच्या उपयोजनात्मक अडचणी आणि त्यावर मात करण्याचे संभाव्य मार्ग, ऊर्जेचे संक्रमण आणि प्रवास, भारतीय शेतीसमोरील प्रमुख आव्हाने: वर्तमान आणि भविष्य, बायोमास व्हॅलॉरायझेशन, टाकाऊ पासून टिकाऊ इत्यादी सारख्या विषयांवर संबंधित क्षेत्रातील आघाडीच्या तज्ञांद्वारे सखोल चर्चा होणार आहेत, तसेच या व्यासपीठावर विज्ञान व तंत्रज्ञान  क्षेत्रातील आव्हाने आणि संधी यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमा दरम्यान दररोज विविध विषयांवर पॅनेल चर्चा आणि संबंधित विषयासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींद्वारे विशेष व्याख्यानांचे आयोजन केले आहे. व्याख्यात्यांमध्ये शैक्षणिक, उद्योग आणि शासन संस्थेतील तज्ज्ञांचा समावेश असेल. या कार्यक्रमामध्ये भाग घेणाऱ्या अभ्यागतांना संपूर्ण आठवडाभर प्रयोगशाळेचे वेगवेगळे संशोधन प्रकल्प, तंत्रज्ञान आणि त्यांची उपलब्धी दर्शविणारे प्रदर्शन बघण्याची संधी असेल.  ‘वन वीक वन लॅब’ कार्यक्रमात चार कौशल्य विकास कार्यक्रमांचा देखील समावेश असेल, ज्यामध्ये सहभागींना विविध वैज्ञानिक क्षेत्रातील संशोधन तंत्र, त्याच्या कार्यपद्धती, व्यावहारिक अनुभव याबद्दलचे प्रशिक्षण दिले जाईल.

या विषयी अधिक बोलतांना सीएसआयआर-एनसीएलचे संचालक डॉ. आशिष लेले म्हणाले कि, "सीएसआयआरच्या ‘वन वीक वन लॅब’ उपक्रमाचा भाग म्हणून प्रयोगशाळेच्या अलीकडील कामगिरीचा गौरव करण्यासाठी एनसीएल मध्ये आम्ही सर्वांचे स्वागत करतो. या कार्यक्रमातून, समाजाच्या हितासाठी नवीन ज्ञान निर्माण करण्यात आणि विज्ञानाच्या सर्वोत्कृष्ट प्रक्रिया आणि उत्पादन तंत्रज्ञानांमध्ये रूपांतरण करण्यासाठी एनसीएलचे योगदान प्रदर्शित करण्याची आमची योजना आहे. आम्हाला अपेक्षा आहे की हा कार्यक्रम तरुण शास्त्रज्ञांना प्रेरणा देईल आणि आपल्या समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन तसेच विज्ञान व तंत्रज्ञान आधारित संस्कृतीला चालना देईल."

या उपक्रमातील प्रत्येक घडामोडीत सहभागासाठी जागा मर्यादित आहेत, त्यामुळे आपला प्रवेश ऑनलाईन नोंदणीद्वारे त्वरित निश्चित करा. अधिक माहितीसाठी तसेच ऑनलाईन नोंदणीसाठी, कृपया https://owol.ncl.res.in या वेबसाइटला अवश्य भेट द्या.

***

NCL/MI/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1923074) Visitor Counter : 230


Read this release in: English