संरक्षण मंत्रालय
दक्षिण कमांडद्वारे सदर्न स्टार आर्मी -शिक्षण -उद्योग सन्मुखता कार्यक्रमाचे 12 मे 2023 रोजी आयोजन
Posted On:
09 MAY 2023 8:23PM by PIB Mumbai
पुणे, 9 मे 2023
दक्षिण कमांड क्षेत्रीय तंत्रज्ञान कक्षाने (आरटीएन) आर्मी इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी , दिघी यांच्या सहकार्याने 12 मे 2023 रोजी पुण्यातील दक्षिण कमांडच्या मुख्यालयात सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या कालावधीत 'सदर्न स्टार आर्मी - शिक्षण -उद्योग सन्मुखता' (S2A2I2) कार्यक्रमाअंतर्गत एक दिवसीय चर्चासत्र आणि प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
‘संरक्षण तंत्रज्ञानात आत्मनिर्भर भारताचे परिवर्तन’ अशी या चर्चासत्राची संकल्पना आहे. या कार्यक्रमात संरक्षण क्षेत्रातील विविध भागधारक, संशोधन आणि विकास संस्था, शैक्षणिक संस्था आणि खाजगी उद्योगांचा सहभाग असेल त्याचप्रमाणे 150 हून अधिक प्रतिनिधी आणि 15 हून अधिक प्रदर्शन स्टॉल मांडले जाणार आहेत . संरक्षण क्षेत्रातील उदयोन्मुख संधींना अधोरेखित करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संरक्षण क्षेत्रातील आगामी तंत्रज्ञान विषयक कल आणि दिशा यांचे अवलोकन केले जाईल आणि एवढेच नव्हे तर स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्याच्या उद्देशाने शिक्षण क्षेत्र, उद्योग जगत/ स्टार्ट अप्स यांच्यात मूर्त संवाद घडून येईल.
लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. या चर्चासत्रात 'उदयोन्मुख तंत्रज्ञान' या विषयावर विविध सत्रांमधून चर्चा होणार असून त्यामध्ये , लेफ्टनंट जनरल एस एस हसबनीस (निवृत्त) , एस पी पी यू, पुणे, येथील तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख, प्राध्यापक डॉ. आदित्य अभ्यंकर, भूमी, शस्त्रे आणि अभियांत्रिकी प्रणालीचे महाव्यवस्थापक सतीश भरथन यांसारखे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. ‘भविष्यातील कृत्रिम बुद्धिमत्तेचे स्वदेशीकरण’ या विषयावर भारत फोर्ज डिफेन्स अँड एरोस्पेसचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच डीआरडीओचे शास्त्रज्ञ एका सत्रात मार्गदर्शन करतील. याशिवाय आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे माजी विद्यार्थी आणि उद्योग प्रतिनिधींच्या सहभागासह नियोजित पॅनेल चर्चेसह एक सत्र देखील आयोजित करण्यात आले आहे .
M.Iyengar/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1922912)
Visitor Counter : 117