विशेष सेवा आणि लेख
azadi ka amrit mahotsav

मे 2023 मध्ये मुंबई भूषवणार तीन जी-20 बैठकांचे यजमानपद


पुढील आठवड्यात मुंबईमध्ये होणार तिसऱ्या ऊर्जा संक्रमण कार्यगटाच्या बैठकीचे आयोजन, त्यानंतर तिसरी पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगट आणि दुसऱ्या आपत्ती जोखीम कपात कार्यगटाच्या बैठकीचे आयोजन

Posted On: 09 MAY 2023 4:10PM by PIB Mumbai

मुंबई, 9 मे 2023

मुंबईमध्ये या महिन्यात तीन जी-20 बैठकांचे आयोजन होणार असून 15 मे ते 25 मे दरम्यान या बैठका  होतील. यामधील पहिली बैठक 15 ते 17 मे दरम्यान होणार असून ही बैठक तिसऱ्या ऊर्जा संक्रमण कार्यगटाची असेल.

भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाचे सचिव आलोक कुमार या बैठकीचे अध्यक्षपद भूषवतील. भारतामधील जागतिक ऊर्जा परिषद, राष्ट्रीय ऊर्जा प्रशिक्षण संस्था(NPTI), आंतरराष्ट्रीय उर्जा संस्था(IEA) आणि USAID यांसारख्या आंतरराष्ट्रीय हितधारक संघटना या कार्यगटाच्या बैठकीला उपस्थित राहतील. खाण मंत्रालय, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा आणि कोळसा मंत्रालयाचे सचिव सोमवारपासून सुरू होणाऱ्या या तीन दिवसीय विचारमंथनासाठी उपस्थित असतील. 

ऊर्जा कार्यक्षमता विभागाचे महासंचालक देखील या कार्यगटाच्या बैठकीला उपस्थित राहतील.

या तीन दिवसात ऊर्जा संक्रमण, जैव-इंधने, किनारपट्टीवरील वारे, कपातीसाठी अवघड क्षेत्रांना कार्बनमुक्त करण्यासाठी जागतिक धोरणे  आणि पद्धतींची देवाणघेवाण, स्वच्छ ऊर्जा संक्रमणासाठी एसएमआर आणि उर्जा कार्यक्षमतेला गती आणि उर्जा कार्यक्षम जीवनाला प्रोत्साहन यांसारख्या विषयांवर अनेक कार्यशाळा आणि परिसंवादांचे आयोजन करण्यात येईल.   

यानंतर  तिसऱ्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाची जी-20 बैठक होणार असून  21 ते 23 मे 2023 दरम्यान तिचे आयोजन होईल. या गटाच्या विचारमंथनाची सुरुवात 21 मे 2023 रोजी जुहू चौपाटीवर किनारपट्टी स्वच्छता मोहिमेने होईल. यानंतर ‘ओशन-20’ संवादाचे आयोजन करण्यात येईल, ज्यामध्ये ‘नील अर्थव्यवस्थे’चे विविध पैलू आणि शाश्वत नील अर्थव्यवस्थेला चालना देण्यामध्ये आंतरराष्ट्रीय गुंतवणूक बँकांची भूमिका यावर चर्चा करण्यात येईल. भारतामधील जी-20 चे अध्यक्षपद भूषवणाऱ्या पर्यावरण, वने आणि हवामान बदल(MOEFCC) मंत्रालयाच्या सचिव  लीना नंदन उद्‌घाटन सत्राचे अध्यक्षपद भूषवतील.

मुंबई येथे या महिन्यात आयोजित होणारी जी-20 गटाची शेवटची बैठक म्हणजे आपत्ती जोखीम कपात कार्यगटाची (डीआरआरडब्ल्यूजी) दुसरी बैठक असेल आणि 23 मे ते 25 मे 2023 या कालावधीत या बैठकीचे आयोजन करण्यात येईल. हा कार्यगट म्हणजे भारताने जी-20  अध्यक्षतेखाली  घेतलेला नवा पुढाकार आहे. डीआरआरडब्ल्यूजी ची पहिली बैठक या वर्षी मार्च ते एप्रिल या कालावधीत गांधीनगर येथे झाली होती.

जी-20 मध्ये भारताने सुरु केलेला हा उपक्रम म्हणजे  सेन्दाई  आपत्ती जोखीम कपात आराखडा 2015 ते 2030 (सेन्दाई आराखडा) चा एक भाग आहे. विकासाच्या लाभांचे  आपत्तीच्या जोखमीपासून संरक्षण करण्यासाठी जी-20 समूहातील सदस्य देशांना ठोस कृती योजना देणारा हा अशा प्रकारचा पहिलाच प्रमुख करार होता. संयुक्त राष्ट्रांच्या आपत्ती जोखीम कपात संबंधी जागतिक परिषदेने देखील, या कराराला मान्यता दिली आहे. हा कार्यक्रम आपत्तीची जोखीम तसेच जीवित, उपजीविका आणि आरोग्य यांची तसेच व्यक्ती, व्यापार, समुदाय आणि राष्ट्रे यांच्या आर्थिक, भौतिक,सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय मालमत्ता यांची हानी लक्षणीय प्रमाणात कमी करणारा आहे असे जागतिक परिषदेने म्हटले आहे. या करारात असे म्हटले आहे की आपत्तीची जोखीम कमी करण्यामध्ये देशाची प्राथमिक भूमिका आहे आणि यासाठीच्या जबाबदाऱ्या स्थानिक सरकार आणि खासगी क्षेत्रासह इतर भागधारकांमध्ये विभागल्या गेल्या पाहिजेत.

 या बैठकीला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (एनडीएमए) सदस्य सचिव कमल किशोर देखील उपस्थित राहणार आहेत. एनडीएमए ही भारतातील आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य करणारी भारताच्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील प्रमुख संस्था आहे.

यावेळी डीआरआरडब्ल्यूजीच्या बैठकीचा भाग म्हणून आपत्ती जोखीम कपात कार्यक्रमाला  वित्तपुरवठा, पायाभूत सुविधाविषयक जोखीम मूल्यमापन साधने आणि माहिती मंच, आर्थिक आपत्ती जोखीम कपातीसंदर्भात खासगी क्षेत्रासोबत गोलमेज परिषद तसेच परिसंस्थेवर आधारित दृष्टीकोन आणि समाजाची भूमिका यांसारख्या मुद्द्यांवर आधारित  विविध  अनुषंगिक कार्यक्रम देखील  होणार आहेत. डीआरआरडब्ल्यूजीच्या बैठकीला उपस्थित राहणाऱ्या प्रतिनिधींना बृहन्मुंबई महानगर पालिकेची (बीएमसी) ऐतिहासिक वारसा इमारत दाखविण्यासाठी नेण्यात येणार आहे.

मुंबईत होणाऱ्या तिन्ही जी-20 बैठकांचे आयोजन बांद्रा कुर्ला संकुलातील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे होणार आहे.

 

 

S.Kane/Shailesh/Sanjana/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1922791)
Read this release in: English