सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयआयटी मुंबईने आयोजित केला युवा संगम कार्यक्रम; पंजाब मधले 45 विद्यार्थी येणार मुंबई भेटीला



Posted On: 05 MAY 2023 8:00PM by PIB Mumbai

 

एक भारत श्रेष्ठ भारत युवा संगममोहिमे अंतर्गत भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी) द्वारा, पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या युवा संगम कार्यक्रमामध्येसहभागी होण्यासाठी, पंजाब मधील जालंधर इथल्या डॉ. बी. आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेमधील 45 विद्यार्थी मुंबई भेटीसाठी येणार आहेत. हे युवा प्रतिनिधी रविवार, 7 मे रोजी मुंबईत पोहोचतील आणि 7 ते 12 मे 2023 दरम्यान आयआयटी मुंबईच्या परिसरात वास्तव्य करतील. लिंग समानता लक्षात घेता, या तुकडीत 18 ते 30 वर्षे वयोगटामधील 22 मुली आणि 23 मुलांचा समावेश आहे.

मंगळवार 9 मे रोजी राजभवन येथे आयोजित संवाद सत्रादरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस  या युवा प्रतिनिधींना संबोधित करतील. त्याशिवाय, हे विद्यार्थी आपल्या मुंबई भेटी दरम्यान, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गेटवे ऑफ इंडिया, विधानसभा, कान्हेरी गुंफा आणि इतर प्रेक्षणीय स्थळांनाही भेट देतील. ते मुंबई आयआयटी संस्थेच्या परिसरातही फेरफटका मारतील.

भारताच्या पंतप्रधानांनी सुरू केलेल्या युवा संगम कार्यक्रमाचे उद्दिष्ट, जनतेचा परस्पर संपर्क मजबूत करणे आणि देशभरातील तरुणांमध्ये सह-भावना निर्माण करणे, हे आहे. या कार्यक्रमात भारतातील 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 1000 युवा प्रतिनिधींचा सहभाग अपेक्षित आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून, महाराष्ट्र आणि पंजाब या राज्यांना एकत्र जोडले गेले आहे. महाराष्ट्रातील 35 आणि दादरा-नगर हवेली, दमण-दीव इथले 10 युवा प्रतिनिधी, 12 ते 19 मे 2023 या काळात एनआयटी जालंधर (NIT) इथे भेट देणार आहेत.

हा ओळख दौरा, या युवा प्रतिनिधींना, पर्यटन, परंपरा, प्रगती, तंत्रज्ञान, आणि परस्पर संपर्क, या पाच विस्तृत क्षेत्रांचा सर्वांगीण आणि बहु-आयामी अनुभव देईल.

***

S.Patil/R.Agashe/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1922220) Visitor Counter : 152


Read this release in: English