संरक्षण मंत्रालय
लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह यांच्या हस्ते खडकी येथे लष्करी रुग्णालयात पाठीच्या कण्याला दुखापत झालेल्या रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधांचे लोकार्पण
Posted On:
03 MAY 2023 5:49PM by PIB Mumbai
पुणे, 3 मे 2023
पुण्यातील खडकी येथील लष्करी रुग्णालयात, पाठीच्या कण्याला झालेल्या दुखापतींवर उपचार करणारे सर्वात मोठे केंद्र आहे. पाठीच्या कण्याला दुखापत झालेल्या पॅराप्लेजिक आणि टेट्राप्लेजिक सैनिकांना सेवा देणारे हे केंद्र आता रूग्णांना अद्ययावत सेवा देत आधुनिकीकरणाच्या नवीन टप्प्यात दाखल झाले आहे. लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख (जीओसी-इन-सी सदर्न कमांड) लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह एव्हीएसएम,वायएसएम, एसएम, व्हीएसएम यांनी आज एका विशेष सोलर वॉटर हीटिंग प्लांटचे आणि संगणकीकृत डायनॅमिक स्टेअर ट्रेनरचे उद्घाटन केले.
या केंद्रासाठी विशेष सोलर वॉटर हीटिंग प्लांटची संकल्पना सोल्जर्स इंडिपेंडेंट रिहॅबिलिटेशन फाऊंडेशन (सिर्फ) या अग्रगण्य स्वयंसेवी आणि कल्याणकारी संस्थेची आहे.सैनिकांचे अधिकाधिक हित साधण्यासाठी उभ्या राहिलेल्या या संस्थारूपी चळवळीचे नेतृत्व सिर्फच्या सह-संस्थापक सुमेधा चिथडे अव्यहतपणे करत आहेत. त्यांचे पती दिवंगत योगेश चिथडे हे माजी सैनिक होते. त्यांनीच सुरू केलेल्या या भव्य कल्याणकारी कार्याला सुमेधा यांनी तितक्याच दूरदर्शीपणे आणि उत्कृष्टपणे पुढे नेले आहे. पाठीच्या कण्याला झालेल्या दुखापतीमुळे आयुष्य आमूलाग्र बदलून गेलेल्या शूर सैनिकांच्या जीवनात पुन्हा आनंद यावा आणि त्यांना आराम मिळावा यासाठी सुमेधा यांनी खर्च केलेली शक्ती आणि त्यांचा दृढनिश्चय त्यांच्याशी संवाद साधताना दिसून येतो. विशेष वॉटर प्लांटच्या उभारणीमुळे रुग्णांच्या या विशेष गटासाठी रुग्ण सेवेचा एक नवीन टप्पा सुरू झाला आहे.
सिर्फ टीमचा लक्ष केंद्रित दृष्टिकोन आणि अथक समर्पणाची भावना याची प्रशंसा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह यांनी केली. त्यांनी पॅराप्लेजिक सैनिकांना कॉम्प्युटराइज्ड डायनॅमिक स्टेअर ट्रेनर समर्पित केले. या ट्रेनरमुळे गंभीर अपंगत्व आलेल्या रूग्णांना पुन्हा उभे राहण्याचे आणि चालण्याचे प्रशिक्षण देणे शक्य होईल. अत्याधुनिक उपकरणे पॅराप्लेजिक रूग्णांच्या कमकुवत झालेल्या स्नायूंची क्षमता वाढवतात. त्यामुळे त्यांना पायऱ्या चढणे, उतारावर चालणे आणि कमीतकमी आधार घेत उभे राहणे यासारख्या क्रिया पुन्हा सुरू करता येतात.संगणकीकृत स्टेअर ट्रेनर अनेक महिने रुग्णामध्ये झालेल्या सुधारणेचे वस्तुनिष्ठपणे निरीक्षण करून प्रशिक्षण आणि मूल्यांकन करतो. या केंद्रात दाखल असलेल्या रुग्णांना अद्ययावत आणि सर्वोत्तम आधुनिक सुविधा पुरविण्याच्या गरजेचा सिंह यांनी पुनरुच्चार केला. सुमेधा चिथडे आणि सिर्फच्या टीमचा त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल आणि सैनिकांच्या कल्याणासाठी त्यांनी केलेल्या समर्पणाबद्दल सिंह यांच्या हस्ते यावेळी सत्कार झाला.
भारतीय सशस्त्र दले युद्ध आणि शांतता या दोन्ही काळात स्वतःची काळजी स्वतः घेतात. पुण्यातील खडकी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये पाठीच्या कण्याला दुखापत झालेल्या सैनिकांवर उपचार केले जातात आणि स्पाइनल कॉर्ड इज्युरी सेंटरमध्ये त्यांचे पुनर्वसन केले जाते. जखमी आणि त्यांची काळजी घेणाऱ्या सर्वांसाठी ही प्रक्रिया वेदनादायक आणि निराशाजनक असते, पण हळूहळू का होईना त्यांना त्यांच्या चिकाटीचे फळ मिळते. रुग्णांच्या जीवनात नवीन आशा निर्माण करून त्यांच्या जीवनाला नवा अर्थ देण्यासाठी या अत्याधुनिक केंद्रातील समर्पित चिकित्सक, नर्सिंग कर्मचारी, पुनर्वसन तज्ञ चोवीस तास काम करतात. या रूग्णांसाठी अत्यावश्यक असलेले पुनर्वसन करून त्यांना समाजाचा पुन्हा एक भाग बनवणे यासाठी हे केंद्र प्रयत्नशील आहे. हे दृढनिश्चयी सैनिक रूग्ण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पॅरा-ऍथलेटिक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.
M.Iyengar/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1921720)
Visitor Counter : 164