संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सातारा जिल्ह्यातील अपशिंगे येथे शैक्षणिक केंद्र आणि व्यायामशाळेचे उद्घाटन

Posted On: 01 MAY 2023 4:05PM by PIB Mumbai

मुबंई 01 मे 2023

लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह यांनी आज, 1 मे 2023 रोजी सातारा जिल्ह्यातील मिलिटरी अपशिंगे गावाला भेट दिली आणि भारतीय सशस्त्र दलांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी प्रशिक्षणाची सोय तसेच सुलभ भर्ती प्रक्रियेच्या उद्देशाने उभारण्यात आलेले शैक्षणिक केंद्र तसेच व्यायामशाळा यांचे उद्घाटन केले.

राज्यातील सातारा, सांगली, कराड, सोलापूर आणि कोल्हापूर हे जिल्हे भारतीय सेनादलातील भरतीसाठी पारंपारिकरीत्या प्रसिध्द आहेत. सातारा जिल्ह्यातील अपशिंगे या गावाची लोकसंख्या सुमारे 3000 आहे आणि या गावात राहणाऱ्या साडेतीनशे कुटुंबांपैकी प्रत्येक कुटुंबातील किमान एक सदस्य सशस्त्र सेना दलात कार्यरत आहे. या गावातील 46 जवानांनी पहिल्या जागतिक महायुद्धात हौतात्म्य पत्करले आहे. त्यांच्या सेवेचा सन्मान म्हणून ब्रिटीश सरकारने गावाच्या केंद्रस्थानी विजय स्तंभ उभारला आहे. याखेरीज 1962 च्या भारत-चीन युद्धादरम्यान तसेच 1965 आणि 1971 साली पाकिस्तानशी झालेल्या दोन युद्धांमध्ये या गावातील अनेक सैनिकांनी शत्रूशी लढताना प्राणार्पण केले आहे. या गावातील मुलांना लहानपणापासूनच भारतीय सशस्त्र सेनादलांमध्ये कारकीर्द घडविण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन देण्यात येते आणि त्यादृष्टीने प्रशिक्षण देखील देण्यात येते.या गावाने भारतीय सेनेला दिलेल्या अशा प्रकारच्या अद्वितीय योगदानासाठी षण्मुखानंद कला आणि संगीत सभेने अपशिंगे गावाला षण्मुख शौर्य पुरस्कार 2022 देऊन गौरव केला. याप्रसंगी गावातील 75 माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

भारतीय सशस्त्र दलांमध्ये देशातील तरुण मुलामुलींना भर्ती करून घेण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने नुकत्याच सुरु केलेल्या अग्निपथ योजनेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी शारीरिक तंदुरुस्तीसह पात्रतेच्या इतर मापदंडांची पूर्तता होणे अनिवार्य आहे. त्या दृष्टीने या जिल्ह्यांमधील युवावर्गाला प्रेरित करून आवश्यक पात्रता मिळवता यावी या दृष्टीने देशातील माजी सैनिकांच्या विनंतीला मान देऊन, षण्मुखानंद कला आणि संगीत सभा तसेच साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी या संस्थांनी संयुक्तपणे त्यांच्या संस्थात्मक सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमाद्वारे सुमारे 80 लाख रुपये खर्चून अपशिंगे गावात सुविधा केंद्राची उभारणी केली आहे.

महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा विभागाचे कमांडर इन चीफ, लेफ्टनंट जनरलएच.एस.कहलोन आणि एसआयईएस तसेच षण्मुखानंद कला आणि संगीत सभा या संस्थांचे अध्यक्ष डॉ.व्हीशंकर यांच्यासह साताऱ्याच्या अपशिंगे गावातील अनेक नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

***

M.Iyengar/S.Chitnis/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1921192)
Read this release in: English