माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

देशात रेडिओ कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी पंतप्रधानांनी केले देशभरातील 91 एफएम ट्रान्समिटर्सचे उद्घाटन


महाराष्ट्रातील अचलपूर, अहेरी, हिंगोली, नंदुरबार, सटाणा, सिरोंचा आणि वाशिम येथील एफएम ट्रान्समिटर्सचे खासदार आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न; दुर्गम आणि मागास भागाला विकासाच्या प्रक्रियेत आणल्याबद्दल आनंद व्यक्त

या रेडिओ कनेक्टिव्हिटी विस्तारामुळे नागरिकांना मन की बात या कार्यक्रमाचा शंभरावा भाग ऐकता येईल

Posted On: 28 APR 2023 3:52PM by PIB Mumbai

मुंबई, 28 एप्रिल 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातूनन  देशातील 100 व्हॅट क्षमतेच्या  91 एफएम ट्रान्समिटर्सचे उद्घाटन केले. यात महाराष्ट्रातील अचलपूर, अहेरी, हिंगोली, नंदुरबार, सटाणा, सिरोंचा  आणि  वाशिम  येथील  ७ एफएम ट्रान्समिटर्सचा  समावेश आहे. देशातील 18 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 84 जिल्ह्यांमध्ये हे 91 नवीन 100 W एफएम ट्रान्समीटर्स  बसवण्यात आले आहेत.  आकांक्षीत   जिल्ह्यांमध्ये आणि सीमावर्ती भागात व्याप्ती वाढवण्यावर या रेडिओ कनेक्टिव्हिटी विस्ताराचा विशेष भर आहे. यामुळे  देशातील रेडिओ कनेक्टिव्हिटीला आणखी चालना मिळणार आहे.   हिंगोली वाशिम  आणि नंदुरबार हे जिल्हे निती आयोगाकडून  आकांक्षीत जिल्हा  म्हणून जाहीर केले आहेत तर गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी  आणि सिरोंचा हे नक्षल प्रभावित तालुके आहेत आणि  नाशिक जिल्यातील सटाणा हा तालुका आदिवासीबहुल आणि गुजरात सीमेलगत आहे. 

अमरावती जिल्ह्यातील  अचलपूर इथल्या  एफएम  रिले केंद्राच्या  उद्घाटनप्रसंगी राज्यसभा खासदार डॉ.  अनिल बोंडे  उपस्थित होते.   इंटरनेटच्या युगात आकाशवाणी पिछाडीवर जाईल असं वाटत होतं मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आकाशवाणीने अतिशय वेगाने अग्रेसर होत आहे असे  बोंडे म्हणाले.

अचलपूर येथे नव्याने उद्घाटन झालेल्या या एफएम ट्रान्समीटरमुळे मेळघाटातील दुर्गम भागात सुद्धा आता माहिती पोहोचणार असल्याचे सांगत बोंडे  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचे आभार मानले.

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे  एफ एम ट्रान्समीटरच्या  उदघाटन कार्यक्रमाला  गडचिरोलीचे खासदार अशोक नेते उपस्थित होते . गडचिरोली जिल्ह्यातील  अहेरी आणि सिरोंचा या दोन दुर्गम  तालुक्याच्या ठिकाणी एफएम रिले ट्रान्समिटर्स  दिल्याबद्दल नेते यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. या एफ एम केंद्राची रेंज  35 किलोमीटर पर्यंत राहणार असून यामुळे लोकांना रेडियोवरील कार्यक्रम ऐकता येतील असे ते म्हणाले.

गडचिरोली जिल्ह्यातील  सिरोंचा एफएम रिले केंद्राचे  उद्घाटन खासदार अशोक नेते यांनी दूरस्थ पद्धतीने केले, यावेळी  सिरोंचा नगर पंचायतच्या अध्यक्षा फरजाना शेख यांच्यासह  नागरिक उपस्थित होते . या रिले केंद्राचा फायदा जिल्ह्यातील आकाशवाणी केंद्राच्या बातम्यांच्या व कार्यक्रमांच्या चाहत्यांना होणार असुन कोणत्याही एंटीना शिवाय रेडीओ सेटवर तसेच मोबाईलवर आकाशवाणी मुंबई केंद्रावरुन प्रसारीत होणारे विविध भारतीचे कार्यक्रम सुरळीत ऐकावयास मिळणार आहेत. हे रिले केंद्र सुरू होत असल्याबद्दल फरजाना शेख पंतप्रधानाचे  आभार व्यक्त करत या मागास भागाला विकासाच्या प्रक्रियेत आणल्याबद्दल आनंद व्यक्त केला .

हिंगोली येथील एफएम ट्रान्समीटरचे  उद्घाटन कार्यक्रमाला हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत झाले   होते. या ट्रान्समीटरमुळे लवकरच हिंगोलीमध्ये स्वतंत्र प्रसारण यंत्रणा उभी राहील आणि स्थानिक आदिवासी तसेच बंजारा समाजातील कलाकार यांना त्यांच्याशी  संबंधित सांस्कृतिक विषय मांडण्यासाठी स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध होईल असे यावेळी बोलताना खासदार हेमंत पाटील म्हणाले.

या एफ एम केंद्रामुळे हिंगोली परिसरत विविध भारती आणि अस्मिता वाहनीचे कार्यक्रम  श्रोत्यांना ऐकता येतील. या एफएम रिले सेंटरचे स्थानिक रेडियो केंद्रात (लोकल रेडीओ स्टेशन) मध्ये रुपांतरण करुन येथील स्थानिक कलावतांना एक मंच उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नंदुरबार येथे महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित आणि खासदार डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत  100 डब्ल्यू एफएम ट्रान्समिटरचे उदघाटन करण्यात आले. या केंद्रामुळे या भागातल्या कृषी क्षेत्राला चालना मिळेल त्याचबरोबर विद्यार्थी, तरुण, उद्योजक अशा समाजातील सर्वच घटकांना या सेवेचा लाभ मिळेल, असं मत विजयकुमार गावित यांनी व्यक्त केलं.

आज सुरु झालेल्या एफ एम  केंद्रामुळे आकाशवाणीच्या विविध भारतीसह अस्मिता वाहिनीचा लाभ  नंदुरबारकरांना मिळणार आहे. खासदार डॉ हिना गावित यांनी या   केंद्रासाठी  पाठपुरावा केला होते; तो यशस्वी झाला असे सांगत  पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.  या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर  उपस्थित होते.

नाशिक जिल्यातील सटाणा  येथे आमदार दिलीप मंगळू बोरसे  यांच्या उपस्थितीत  100 डब्ल्यू एफएम ट्रान्समिटरचे उदघाटन करण्यात आले. सटाणा येथील आकाशवाणी केंद्रात ट्रान्समीटर्स सुरू झाल्याने, या केंद्रावरुन मनोरंजनासह लोकशिक्षण, समाज प्रबोधन, शेती, उद्योग यांसह आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती प्रसारित केली जाईल. यामुळे स्थानिक नागरिकांचे जीवनमान बदलण्यास निश्चित मदत होईल, त्यांच्या आयुष्यात नक्कीच बदल घडून येईल, असा विश्वास आमदार बोरसे यांनी यावेळी व्यक्त केला.

आकाशवाणी‌ मुंबई केंद्राच्या विविध भारतीचे कार्यक्रम वाशीम जिल्ह्यातील नागरिकांना सुरळीत ऐकावयास मिळावे या उद्देशाने वाशीम येथील दूरदर्शनच्या पुर्व लघु प्रक्षेपण केंद्राच्या परिसरात आकाशवाणीचे एफ.एम.  ट्रान्समीटर (100 वॅट) प्रक्षेपण केंद्र उभारण्यात आले आहे. खासदार भावना गवळी यांच्या उपस्थितीत या  एफएम ट्रान्समिटरचे  उदघाटन करण्यात आले. वाशिम जिल्ह्याचा समावेश, देशातील विकास प्रकल्प राबवताना ज्यांना प्राधान्य दिले जाईल, अशा आकांक्षित जिल्ह्यांमध्ये असल्याने आज नवीन ट्रान्समीटरची भेट आपल्या जिल्ह्याला मिळाली आहे. आता १२ किमी क्षेत्रापर्यंत या केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील. मात्र भविष्यात, संपूर्ण जिल्ह्यात या केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होण्यासाठीची यंत्रणा उभारली जावी, यासाठी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे  गवळी यांनी यावेळी सांगितले . यावेळी आमदार लखन मलिक, शिक्षक आमदार किरण सरनाईक, यांच्यासह आकाशवाणी केंद्र अकोला व वाशीम येथील अधिकारी कर्मचारी तसेच श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.  

 

* * *

PIB Mumbai | Jaydevi PS/D.Wankhede/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1920525) Visitor Counter : 228


Read this release in: English