पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आदरातिथ्य आणि पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठीचा हा सुवर्णकाळ :केंद्रीय पर्यटन मंत्री जी.किशन रेड्डी


जागतिक पर्यटन क्षेत्रातील गुंतवणूकदारांच्या पहिल्या शिखर परिषदेवर आधारित रोड शोचे आज मुंबईत आयोजन

Posted On: 27 APR 2023 8:51PM by PIB Mumbai

मुंबई, 27 एप्रिल 2023

 

“आदरातिथ्य तसेच पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठीचा हा सुवर्णकाळ आहे!,” असे  केंद्रीय पर्यटन, संस्कृती आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री जी.किशन रेड्डी यांनी सांगितले. या क्षेत्रातील गुंतवणूकदार आणि उद्योजकांशी संपर्क साधण्यासाठी आज मुंबईत आयोजित केलेल्या  कार्यक्रमात ते बोलत होते. येत्या 17 ते 19 मे 2023 या काळात नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक पर्यटन क्षेत्रातील गुंतवणूकदारांच्या पहिल्या शिखर परिषदेबाबत (जीटीआयएस) जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या जनसंपर्क कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पर्यटन क्षेत्रातील भागधारकांनी जीटीआयएस मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करून केंद्रीय मंत्री म्हणाले, “खासगी गुंतवणूकदारांनी पुढे येऊन सहकार्य केल्याशिवाय सरकार पर्यटन उद्योगाचा विकास करू शकत नाही. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रथमच या जागतिक पर्यटन क्षेत्रातील गुंतवणूकदारांच्या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.” पर्यटन क्षेत्राच्या भरभराटीसाठी केंद्र सरकार राज्य सरकारे आणि खासगी क्षेत्र यांच्यासह एकत्र येऊन काम करेल असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात ते पुढे म्हणाले की व्यापक राष्ट्रीय पर्यटन धोरणाचा मसुदा निश्चित करण्यात आला असून त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरी मिळणे बाकी आहे. हे धोरण निश्चित करताना, केंद्र सरकारने ‘संपूर्ण सरकार’ या दृष्टीकोनासह सर्व राज्य सरकारे तसेच केंद्रशासित प्रदेश प्रशासन आणि विविध मंत्रालयांशी देखील चर्चा केली आहे अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली. भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतील सर्व स्मारके पर्यटकांच्या भेटी साठी रात्री 9 वाजेपर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. 

भारताने जगभरातील पहिल्या क्रमांकाचे पर्यटन स्थळ म्हणून यशस्वी झाले पाहिजे आणि त्यासाठी, केंद्र सरकार, सहकार्यात्मक संघराज्यवादाच्या प्रेरणेसह राज्य सरकारांसोबत समन्वयाने काम करत आहे, असे रेड्डी यांनी सांगितले.  पर्यटनाशी संबंधित योजना राबविण्यासाठी केंद्र सरकार सर्व राज्य सरकारांना 100% वित्तपुरवठा करत आहे असे देखील त्यांनी सांगितले. या क्षेत्रातील भागधारकांनी भारतीय पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी सर्व परदेशांसोबत देखील संयुक्त उपक्रमांच्या माध्यमातून काम करायला हवे आणि त्यांच्या आर्थिक संघटनांशी देखील संबंध प्रस्थापित केले पाहिजेत अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी यांनी व्यक्त केली.

विशेषत:एमआयसीई पर्यटन (बैठक, प्रोत्साहन, परिषद आणि पर्यटन प्रदर्शन ) आणि आदरातिथ्य क्षेत्राची  देशात विकासाची मोठी क्षमता असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केले.

खाजगी क्षेत्राशी देखील चर्चा करण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने  चर्चेचे दरवाजे खुले ठेवले आहेत. पर्यटन क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि पर्यटन क्षेत्रातील गुंतवणुकीची संभाव्य क्षेत्रे ओळखण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील, असे ते म्हणाले.

केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी आपल्या भाषणात व्हायब्रंट व्हिलेज योजनेवर प्रकाश टाकला.सीमावर्ती गावांमध्ये साहसी पर्यटनासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी 4000 कोटी रुपयांहून अधिक खर्च केले  जात आहेत, असे त्यांनी सांगितले.

नवी दिल्ली येथे होणाऱ्या जागतिक पर्यटन गुंतवणूकदार  परिषदेच्या  अंतिम बैठकीपूर्वी पर्यटनाच्या सर्व महत्त्वाच्या क्षेत्रात मुंबईत रोड शो आणि गोलमेज बैठकांचे  आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी दिली.

सध्या भारताकडे असलेल्या  जी -20 अध्यक्षपदाच्या  महत्त्वाबाबत बोलताना केंद्रीय पर्यटन मंत्री म्हणाले की, भारताला जगासमोर येण्याची  ही उत्तम  संधी आहे.

यावेळी महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक  आणि पर्यटन विभागाचे  प्रधान  सचिव सौरभ विजय आणि केंद्रीय पर्यटन मंत्रालयातील संचालक प्रशांत रंजन यांच्यासह अन्य  मान्यवर उपस्थित होते.

पहिल्या जागतिक पर्यटन गुंतवणूकदारांच्या शिखर परिषदेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, या  संकेतस्थळाला भेट द्या: https://www.gtistourism.in/

 

* * *

PIB Mumbai | S.Kakade/Sonal C/Sanjana/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai




(Release ID: 1920353) Visitor Counter : 128


Read this release in: English