पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
पाणथळ संवर्धनात भारताची उत्तम कामगिरी, मागील 9 वर्षात 49 नवीन पाणथळ जागा समाविष्ट झाल्याने रामसर यादीत आता देशातील 75 पाणथळ ठिकाणांचा समावेश
महाराष्ट्रातील लोणार सरोवर, नांदुर मधमेश्वर जलाशय आणि ठाणे खाडी यांचा तर गोव्यातील नंदा तलावाचा रामसर यादीत समावेश
Posted On:
27 APR 2023 2:30PM by PIB Mumbai
मुंबई, 27 एप्रिल 2023
भारतात आशियातील रामसर पाणथळ ठिकाणांचे सर्वात मोठे क्षेत्र आहे. पाणथळ जमीन ही जैवविविधता, हवामान अनुकूलन, गोड्या पाण्याची उपलब्धता आणि एकूणच मानवी कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाची परिसंस्था आहे. परिसंस्थेचे रक्षण करण्याच्या समर्पित प्रयत्नांचा एक भाग म्हणून, भारताकडे आता 75 आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या रामसर यादीतील पाणथळ जमिनी आहेत, ज्यांचे क्षेत्र देशभरात 1.33 दशलक्ष हेक्टरावर व्यापलेले आहे.
1982 ते 2013 पर्यंत भारतातील 26 पाणथळ ठिकाणांचा रामसर यादीत समावेश होता. तो पुढे 2014 ते 2023 पर्यंत रामसर स्थळांच्या यादीत 49 नवीन पाणथळ जागा समाविष्ट करण्यात आल्या. एकट्या 2022 मध्येच एकूण 28 पाणथळ ठिकाणांचा रामसर यादीत समावेश करण्यात आला.
भारत सरकार देशभरातील पाणथळ प्रदेशांचे संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी अनेक पावले उचलत आहे, ज्यामुळे पाणथळ प्रदेशांचे पर्यावरणीय स्वरूप जतन आणि व्यवस्थापन केले जात आहे. अशा उपाययोजनांमुळे भारत आपली विकास उद्दिष्टांबरोबरच महत्त्वाकांक्षी हवामान कृती उद्दिष्टांना सोबत घेऊन शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण वाटचाल करत आहे.
महाराष्ट्रातील लोणार सरोवर, नांदूर मधमेश्वर आणि ठाणे खाडी तर गोव्यातील नंदा तलाव यांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश आहे. लोणार सरोवर, ज्याला लोणार विवर म्हणूनही ओळखले जाते, हे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे स्थित एक अधिसूचित राष्ट्रीय भू-वारसा ठिकाण आहे. लोणार सरोवर 113 हेक्टर क्षेत्रावर पसरलेले आहे. नांदूर मधमेश्वर जलाशय हा नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात आहे. हे महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ आहे. पक्षी निरीक्षकांसाठी नंदनवन असल्यामुळे त्याला महाराष्ट्राचे ‘भरतपूर’ असेही म्हणतात. येथील पाणथळ जागेने 1986 मध्ये स्थापन झालेल्या नांदूर मधमेश्वर अभयारण्याच्या 100 चौ.कि.मी.चे क्षेत्र व्यापले आहे. ठाणे जिल्ह्यातील उरण ते ठाणे या क्षेत्रातील भूगर्भीय विशिष्ठ परिस्थितीमुळे ठाणे खाडीची निर्मिती झाली आहे.
गोव्यातील नंदा तलाव हे कुडचडे येथील रामसर ठिकाण आहे. हे 0.42 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापते. गोव्यातील हे पहिले आणि एकमेव रामसर पाणथळ ठिकाण आहे.
* * *
PIB Mumbai | Jaydevi PS/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1920190)
Visitor Counter : 314