रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

कर्करोग मुक्त भारतासाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट ही संस्था महत्वाची भूमिका बजावेल : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी


नागपूरातील जामठा येथे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे लोकार्पण

Posted On: 27 APR 2023 2:17PM by PIB Mumbai

नागपूर, 27 एप्रिल 2023

 

संशोधनाच्या जोरावरच आपण कर्करोगासारख्या आजाराला  रोखू शकतो. कर्करोग मुक्त भारतासाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट-एनसीआय ही संस्था महत्वाची भूमिका बजावेल  असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग  मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. नागपूरातील आऊटर रोड जामठा येथे डॉ.आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेच्या  नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट- एनसीआयच्या लोकार्पण सोहळ्याला   ते संबोधित करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत एनसीआयचे अध्यक्ष सुनील मनोहर, उपाध्यक्ष अजय संचेती, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

   

  

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची भेट सर्वसामान्य नागरिकांना दिली त्याच धर्तीवर एनसीआयची सुद्धा सुविधा आता सामान्य नागरिकांना मिळाली आहे त्याबद्दल त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे  आभार मानले.  

   

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या मुख्य इमारतीमध्ये यावेळी  मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट या  संस्थेतून कर्करोगाविषयी प्रतिबंधात्मक उपचार आणि निदान होईल. जागतिक स्तरावरील अद्यावत तंत्रज्ञानासाठी संयुक्त  उपक्रमाच्या माध्यमातून संशोधनाद्वारे कर्करोगाच्या उपचारांमध्ये आपल्याला मदत होईल असे  प्रयत्न करायला हवे असे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले. या संस्थेत थॅलेसेमिया आणि सिकलसेल वर अधिक संशोधन आणि उपचार यासाठी प्रयत्न केले जाणार आहे ही   दिलासादायक  बाब  असून पूर्व विदर्भातील या आजाराच्या  रुग्णांना याचा लाभ होईल असेही त्यांनी सांगितले.

   

 

याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयाच्या बांधकामाची प्रशंसा करत  येथे  सर्व सुविधा उपलब्ध आहेत त्याबद्दल समाधान व्यक्त केले . कर्करोगासारख्या  आजारावर गुणवत्तापूर्ण उपचार उपलब्ध   करून देणे हे एक आव्हान असून या सुविधा किफायतशीरपणे उपलब्ध करून देण्यास  शासन प्रयत्नशील  आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता योजना या योजनांद्वारे सर्वसामान्यांना आधार दिला जात आहे असे शिंदे यांनी सांगितले. कर्करोगासारखा आजार जडल्यास आयुष्यभराची पुंजी द्यावी लागते परंतु एनसीआय सारख्या संस्थेत किफायतशीर दरात हा उपचार उपलब्ध असून त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. 

मुंबईमध्ये टाटा रुग्णालयात रुग्णांचे सोय होते मात्र वाढत्या रुग्न्संख्येमुळे  या रुग्णालयावर प्रचंड असा ताण पडत होता.  मध्य भारतातील कर्करोग रुग्णांची सोय व्हावी यासाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना केली असून यामध्ये बालकांसाठी ‘पेडियाट्रीक वॉर्ड’  मध्ये नि:शुल्क उपचार केले जात  आहेत. कर्करोग उपचार क्षेत्रातील प्रोटोन बिम, कार्बन आयन थेरेपी  सारख्या अत्याधुनिक यंत्रणा  किफायतशीर दरात एनसीआय मध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार  आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले . 

   

 

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट  नागपूर विषयी : 

470 खाटांची क्षमता असणारे हे 25 एकर क्षेत्रावर पसरलेले हे  हॉस्पिटल प्रामुख्याने कर्करोगावरील  उपचारासाठी आहे .  डॉ आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्था या स्वयंसेवी संस्थेद्वारे हे हॉस्पिटल उभारले आहे.  

 

* * *

PIB Nagpur | JPS/ S.Rai/D.Wankhede/D.Dubey

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1920189) Visitor Counter : 199


Read this release in: English