माहिती आणि प्रसारण मंत्रालय
गोव्याचे सागर मुळे “मन की बात@100” राष्ट्रीय संमेलनात होणार सहभागी
Posted On:
25 APR 2023 7:22PM by PIB Mumbai
पणजी, 25 एप्रिल 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या देशवासीयांशी संवादात्मक मासिक कार्यक्रमाच्या शतक पूर्तीनिमित्त केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय 26 एप्रिल 2023 रोजी नवी दिल्ली येथे "मन की बात@100" वर राष्ट्रीय संमेलन आयोजित करत आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आणि माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या उपस्थितीत या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. गोव्याचे रहिवासी सागर नाईक मुळे यांचा या राष्ट्रीय संमेलनातील निवडक निमंत्रितांमध्ये समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात च्या पूर्वीच्या भागांमध्ये ज्या नागरिकांच्या नावांचा उल्लेख केला आहे, असे देशभरातील विविध भागातील 100 आदरणीय नागरिक या राष्ट्रीय संमेलनाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. या व्यक्तींनी राष्ट्र उभारणीत आपले मोलाचे योगदान दिल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी त्यांच्या मासिक कार्यक्रमात वेळोवेळी केला आहे. पोंडा, गोवा येथील तरुण कावी कलाकार सागर नाईक मुळे या संमेलनात सहभागी होणार आहेत. या गोव्याच्या चित्रकाराने कावी कला जोपासण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख पंतप्रधानांनी डिसेंबर 2021 च्या मन की बात कार्यक्रमात केला होता.

मन की बातच्या 84 व्या आवृत्तीत, कला प्रकाराचा इतिहास जाणून घेताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या श्रोत्यांना सांगितले की 'कावा' म्हणजे लाल माती आणि प्राचीन काळी, चित्र साकारताना लाल मातीचा वापर केला जात असे. मात्र काळानुरूप लोक चित्रकलेचे महत्त्व विसरले आहेत आणि हा कलाप्रकार नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, असे पंतप्रधान म्हणाले. या युवा चित्रकाराने हा कलाप्रकार जोपासून त्याला नवसंजीवनी दिल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांच्या कामाची प्रशंसा केली होती. प्राचीन कलांचे जतन करण्यासाठी देशवासीयांनी छोटे छोटे प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
उद्घाटन सत्रादरम्यान उपराष्ट्रपतींच्या हस्ते दोन पुस्तकांचे प्रकाशन होईल. पहिले पुस्तक म्हणजे मन की बात @100 हे कॉफी टेबल बुक असून त्यामध्ये या कार्यक्रमाचा प्रवास आणि पंतप्रधान आणि नागरिक यांच्यात थेट संवाद वाढीला लागण्यासाठी झालेला परिवर्तनीय प्रभाव यावर प्रकाशझोत असेल. तर दुसरे पुस्तक आहे प्रसार भारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी एस एस वेम्पत्ती यांनी लिहिलेले "कलेक्टिव्ह स्पिरिट, काँक्रीट ऍक्शन" . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या संवादात्मक कार्यक्रमात अंतर्भूत केलेल्या सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय, सांस्कृतिक, आरोग्य आणि शारीरिक तंदुरुस्ती अशा विविध विषयांवरील संकल्पना ज्या देशाच्या हृदयाशी प्रतिध्वनित होतात, त्याविषयी या पुस्तकात लेखन केले आहे.
या राष्ट्रीय संमेलनांत चार सत्रे होणार असून मन की बात कार्यक्रमाच्या दरम्यान पंतप्रधानांनी उल्लेखिलेल्या विविध संकल्पनांवर आधारित विस्तृत चर्चा हे या सत्रांचे वैशिष्ट्य असेल. या सत्रांमध्ये अनेक तज्ञ आणि मान्यवरांची पथके सहभागी होणार असून नागरिकांना थेट पंतप्रधानांशी जोडण्यासाठी आणि त्यांना बदलाचे प्रणेते होण्यासाठी प्रेरित करण्यासाठी 'मन की बात' या कार्यक्रमाचा प्रभाव याद्वारे अधोरेखित केला जाईल.

G.Chippalkatti/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1919577)
Visitor Counter : 375