माहिती आणि प्रसारण मंत्रालय
मन की बात @100 ह्या नवी दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्रातील सात जण होणार सहभागी
Posted On:
25 APR 2023 6:43PM by PIB Mumbai
मुंबई, 25 एप्रिल 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 100 व्या भागाचे औचित्य साधून, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, उद्या म्हणजेच 26 एप्रिल 2023 पासून ‘मन की बात@100’ या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करणार आहे. या परिषदेत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर या परिषदेत सहभागी होतील. पंतप्रधानांनी ‘मन की बात’ च्या विविध भागांमध्ये ज्यांचा उल्लेख केला, असे महराष्ट्रातील, सात जण या कार्यक्रमात विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहतील. यात, चंद्रकांत दामोदर कुलकर्णी, बंडू सीताराम धोत्रे, सोनाली हेलवी, राजेंद्र यादव, डॉक्टर बोरसे, चंद्रकिशोर पाटील आणि शर्मिला ओसवाल यांचा समावेश आहे.
या राष्ट्रीय परिषदेत, देशाच्या विविध भागातील 100 सन्माननीय नागरिक सहभागी होणार आहेत. या सर्वांचा पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ च्या विविध भागांमधे उल्लेख केला आहे. या व्यक्तींनी देशउभारणीत दिलेल्या विशेष योगदानाची पंतप्रधानांनी आपल्या मासिक संवाद कार्यक्रमातून वेळोवेळी घेतली आहे. पुण्याच्या चंद्रकांत कुलकर्णी यांनी, आपल्या 16,000 रुपयांच्या मासिक निवृत्तीवेतनातून दरमहा 5,000 रुपये, स्वच्छता मोहिमेसाठी देण्याचा संकल्प केला आहे. चंद्रपुरचे बंडू सीताराम धोत्रे, ‘पर्यावरण संरक्षण संघटना’ या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष असून, त्यांच्या संस्थेने, चंद्रपूरचा किल्ला आणि आसपास स्वच्छता मोहीम राबवली. साताऱ्याची सोनाली हेळवी ही महाराष्ट्राच्या 21 वर्षांखालील महिला कबड्डी संघाची कर्णधार आहे.राजेंद्र यादव हे प्रयोगशील शेतकरी असून त्यांनी कोविड-19 महामारीच्या काळात त्यांच्या ट्रॅक्टरचा वापर करुन लसीकरणासाठी उपयुक्त वाहन तयार केले. पुण्याचे डॉ.बोरसे हे कोविड योद्धा आहेत. चंद्रकिशोर पाटील यांच्या नाशिकमध्ये गोदावरी नदीचे पात्र स्वच्छ करण्यासाठीच्या प्रयत्नांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला होता. अलिबागजवळील केनाड येथील रहिवासी असलेल्या शर्मिला ओस्वाल गेल्या 20 वर्षांपासून अनोख्या पद्धतीने भरड धान्यांचे उत्पादन करत असून त्यांना मिलेट्स वुमन असे नामाभिधान मिळाले आहे.
उद्घाटन पर सत्रात उपराष्ट्रपतींच्या हस्ते दोन पुस्तकांचे अनावरण होणार आहे. त्यापैकी पहिले पुस्तक “मन की बात @100” हे कॉफीटेबल पुस्तक आहे आणि यामध्ये या कार्यक्रमाची आतापर्यंतची वाटचाल तसेच या कार्यक्रमामुळे पंतप्रधान आणि सामान्य नागरिक यांच्या दरम्यानच्या थेट संवादाला उत्तेजन देण्याचे परिवर्तनकारी परिणाम अधोरेखित करण्यात आले आहेत.
दुसरे पुस्तक आहे प्रसार भारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस.वेम्पती यांनी लिहिलेले “कलेक्टिव्ह स्पिरीट, काँक्रीट ॲक्शन.” मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांच्या हृदयात असलेल्या ज्या सामाजिक, आर्थिक, पर्यावरणविषयक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक तसेच तंदुरुस्तीविषयक समस्यांसह विविध संकल्पनांवर चर्चा केली त्यांची माहिती या पुस्तकामध्ये देण्यात आली आहे.
या राष्ट्रीय परिषदेमध्ये चार सत्रे देखील आयोजित करण्यात आली आहेत आणि त्यापैकी प्रत्येक सत्रामध्ये मन की बात कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी ज्या विस्तृत श्रेणीतील विषयांवर नागरिकांशी संवाद साधला त्यावर भर देण्यात येणार आहे. या सत्रांमध्ये सुप्रसिद्ध तज्ञांचे पथक सहभागी होणार असून नागरिकांना थेट पंतप्रधानांशी जोडण्यात आणि परिवर्तनाचे दूत होण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात मन की बात कार्यक्रमाने टाकलेल्या सशक्त प्रभावाचे दर्शन घडविण्यात येईल.

Jaydevi PS/Radhika/Sanjana/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1919559)
Visitor Counter : 252