सांस्कृतिक मंत्रालय
मुंबईतील बालविज्ञान उद्यानात मुलांसाठीच्या तीन नव्या आकर्षणांचे उद्घाटन
Posted On:
22 APR 2023 5:35PM by PIB Mumbai
मुंबई, 22 एप्रिल2023
जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने आज, मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्राच्या परिसरात असलेल्या विज्ञान उद्यानात लहान मुलांसाठी आणखी तीन वैज्ञानिक आकर्षणांची सुरुवात करण्यात आली. या प्रदर्शनांमध्ये, एक जायंट लीव्हर म्हणजे अतिविशाल तराजू, एक अतिविशाल आकाराच्या नाकतोड्याची ज्याला प्रार्थना कीटक म्हणूनही ओळखले जाते, त्याची प्रतिमा आणि विशेष प्रकारे डिझाईन केलेले चकवा देणारे भुलभुलय्या घर, ज्यात डोळ्यांना दिसतं, तसं नसतं.
माजी अणुशास्त्रज्ञ आणि राष्ट्रीय विज्ञान संवादक केंद्राचे अध्यक्ष, डॉ. ए. पी. जयरामन यांच्या हस्ते ह्या वैज्ञानिक खेळांचे उद्घाटन करण्यात आले.
डॉ. जयरामन यांनी यावेळी, नेहरू विज्ञान केंद्राच्या प्रयत्नांचे कौतुक केले. आज उद्घाटन झालेली वैज्ञानिक खेळणी म्हणजे अभियांत्रिकीचा चमत्कारच आहेत, असे ते म्हणाले. या खेळण्यांचा संदर्भ त्यांनी, आपल्या वास्तव आयुष्यातील परिस्थितीशी जोडला. आयुष्यात जेव्हा तुम्ही अशा टोकावर उभे असता, जिथे तुम्हाला काही निर्णय घ्यावे लागतात, तेव्हा, त्यात समतोल कसा साधायचा यांची शिकवण हे जायंट लिव्हर आपल्याला देते, असं सांगत, विद्यार्थ्यांनी कायम योग्य बाजू निवडावी, असा सल्ला त्यांनी दिला. ‘द पर्स्पेक्तिव्ह हाऊस’ म्हणजे वेगळा दृष्टिकोन देणारे भूलभुलैय्या घर हे कला आणि विज्ञान यांचा संगम असलेली कलाकृती आहे, असे वर्णन त्यांनी केले. तसेच, अतिविशाल प्रार्थना किटकाची प्रतिमा बघून, त्यांनी त्याची वैशिष्ट्ये आणि , निसर्गातील त्याचे स्थान तसेच, त्याच्याकडून मिळणारी शिकवण मुलांना सांगितली.
या तीन आकर्षणांची भर घालत नेहरू विज्ञान केंद्राने मुलांना नवनवीन शिकण्याचा अनुभव मिळावा आणि त्यातून, त्यांची वैज्ञानिक जिज्ञासा सतत वाढत राहावी, यासाठी, विज्ञान शिकणे सहज आणि रोचक करण्याच्या उद्देशाने आणखी काही उपक्रम सुरु केले आहेत. त्यातील काही उद्दिष्टे खालीलप्रमाणे:
या जायंट लिव्हरमुळे मुलांना लिव्हरचा भौतिकशास्त्रातील सिद्धांत आणि त्याचे उपयोग सहजपणे समजून घेता येईल. तसेच मोठमोठ्या अवजड वस्तू समतोल साधून उचलण्यासाठी लिव्हर आणि त्याला आधार देणारा दांडा म्हणजे फुलक्रम यांचा उपयोग आणि त्यामागील विज्ञान त्यांना हसत खेळत समजून घेता येईल.
अठरा फुट उंचीची प्रार्थना किटकाची विशाल प्रतिमा, त्यांची विशिष्ट रचना आणि लवचिकता विशद करणारी आहे. हा कीटक त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण शरीररचनेसाठी आणि शिकारी वृत्तीसाठी ओळखला जातो.
तर, भूलभुलैय्या घर ही भ्रम आणि दृष्टीपटलाला चकवा देणाऱ्या बांधकामावर आधारित कलाकृती आहे. इथे अर्धवट बांधलेले हे घर आपल्याला एक संपूर्ण त्रिमीतीय घर म्हणून दिसते, म्हणजे आपल्या डोळ्यांना तसा भास होतो. जिथे अद्भुतरम्य कल्पना आणि विज्ञान यांचा संगम होतो, तिथे कशी कलाकृती साकार होऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
विज्ञानासारखा क्लिष्ट आणि गंभीर विषय लोकांना रोचक पद्धतीने समजून घेता यावा, यासाठी नेहरू विज्ञान केंद्रात 20 विविध सुविधा आणि गॅलरी आहेत. होळी आणि दिवाळी वगळता सर्व दिवस हे विज्ञान केंद्र लोकांसाठी सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6.00 पर्यंत खुले असते. केंद्राच्या वेबसाइटवरून तुम्ही तुमची तिकिटे ऑनलाइन बुक करू शकता. तसेच सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील केंद्राची माहिती उपलब्ध आहे. विज्ञान केंद्राचे कार्यक्रम आणि सुविधांचा तपशील जलद आणि सहज मिळवण्यासाठी आपण या प्लॅटफॉर्मवर सहभागी होऊ शकता. इतर तपशिलांसाठी, कृपया विज्ञान केंद्राच्या https://www.nehrusciencecentre.gov.in/ वेबसाइटला भेट द्या किंवा 022-24920482 वर चौकशी केंद्राशी संपर्क साधा.
***
S.Kane/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1918814)
Visitor Counter : 173