पर्यटन मंत्रालय

गोवा येथे होणाऱ्या आगामी जी-20 बैठकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यटन विभागाने पर्यटक मार्गदर्शकांसाठी कार्यशाळेचे केले आयोजन

Posted On: 20 APR 2023 5:04PM by PIB Mumbai

 

पणजी, 20 एप्रिल 2023

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या गोव्यातील प्रादेशिक कार्यालयाने बुधवार,19 एप्रिल 2023 रोजी, पणजी येथील पर्यटन भवनात भारत सरकारद्वारा मान्यताप्राप्त, प्रादेशिक पातळीवरील पर्यटक मार्गदर्शकांसाठी(टुरिस्ट गाईड ), कार्यशाळेचे आयोजन केले होते. प्रादेशिक स्तरावरील सुमारे 30 मार्गदर्शक या कार्यशाळेत सहभागी झाले.

गोवा येथे येत्या 19 आणि 22 जून 2023 दरम्यान  जी-20 पर्यटन कार्यगटाच्या  चौथ्या बैठकीचे तसेच जी-20  समूहाच्या पर्यटन विषयक  मंत्रीस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या दृष्टीकोनातून, पर्यटक मार्गदर्शकांना  विशेष प्रकारचे प्रशिक्षण देण्यात यावे तसेच  गोव्याचे सांस्कृतिक राजदूत म्हणून स्वतःला सादर करण्यात मदत करावी या हेतूने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेत, गोव्याची कला, संस्कृती आणि इतिहास; पर्यटक मार्गदर्शक म्हणून वर्तणुकीच्या पद्धती, शिष्टाचार तसेच व्यक्तित्वविकास आणि गोव्यातील चर्च तसेच ख्रिस्ती मठ यांचा इतिहास या तीन विभागांमध्ये विषय तज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

पेर्नेम येथील संत सोहिरोबानाथ आंबिये शासकीय कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील इतिहास विषयाचे प्राध्यापक रोहित फालेगावकर यांनी गोव्याची कला, संस्कृती आणि इतिहास या विषयावरील सत्रामध्ये मार्गदर्शन केले. त्यांनी गोवा येथील सांगेम तसेच बिचोलिम तालुक्यांमध्ये आढळणारी मेगालिथिक कालखंडातील दगडी लेणी, नैसर्गिक तसेच मानवनिर्मित गुहा, विविध मंदिरे, लोकसंगीत संकृती आणि इतर विविध कलाविष्कार यांच्या संदर्भात गोव्याच्या इतिहासाचे विवेचन केले.

पर्यटक मार्गदर्शक म्हणून वर्तणुकीच्या पद्धती, शिष्टाचार तसेच व्यक्तित्वविकासविषयक सत्रामध्ये पोर्वोरीम येथील हॉटेल व्यवस्थापन संस्थेतील शिक्षक पंकज कुमार सिंग आणि स्वाती शर्मा यांनी बहुमूल्य माहिती दिली तर  गोव्यातील चर्च तसेच ख्रिस्ती मठ यांचा इतिहास या विषयावरी सत्राला, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेच्या गोवा मंडळातील सहाय्यक अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ किशोर रघुवंश तसेच सहाय्यक पुरातत्वशास्त्रज्ञ तरंग घारपुरे यांनी मार्गदर्शन केले.

गोवा येथे आयोजित जी-20  बैठकांचा भाग म्हणून, मंत्री तसेच प्रतिनिधी यांच्यासाठी गोव्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिकदृष्ट्या लोकप्रिय स्थानांचे अभ्यासदौरे आणि सहली आयोजित करण्यात येणार आहेत आणि या उपक्रमात स्थानिक पर्यटक मार्गदर्शकांना सहभागी करून घेतले जाण्याची शक्यता आहे. म्हणूनच, संबंधित परदेशाने निश्चित केलेल्या सांस्कृतिक वैशिष्ठ्यांनुसार   जी-20 प्रतिनिधींसाठी सर्वोत्तम प्रकारे सुलभता प्रदान करता यावी  या दृष्टीने मार्गदर्शकांना  सुसज्ज करणे हे या कार्यशाळेचे उद्दिष्ट होते.

 

  

S.Kakade/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1918290) Visitor Counter : 194


Read this release in: English