रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांच्या हस्ते पुण्यात ‘पुश अप’ महोत्सवाचे उद्घाटन

Posted On: 15 APR 2023 12:46PM by PIB Mumbai

  पुणे, 15 एप्रिल 2023

21 व्या शतकातील सुदृढ भारत - सशक्त भारत या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला अधिक बळकटी देणाऱ्या पुश अप फेस्टिवल ला आज पुण्यातील बालेवाडी इथल्या शिव छत्रपती क्रीडा संकुलात प्रारंभ झाला. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांच्या हस्ते या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन झाले. पुण्यातील सुमारे 600-पेक्षा अधिक स्पर्धक यात सहभागी झाले होते. मुंबईतील स्वर्गीय राजेंद्र सोमाणी इनिशियटिव्ह तर्फे या उपक्रमाचे देशभर आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना सिंह यांनी नव्या आधुनिक भारताच्या उभारणीमध्ये तरुणाचा सहभाग फार मोलाचा राहणार असल्याचे सांगितले. पुश अप महोत्सव सारख्या उपक्रमामुळे आपण स्वतःबरोबरच समाजातील इतरांना आणि पर्यायाने देशाला सुदृढ आणि सशक्त बनवण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले. सुदृढ शरिरातच चांगले विचार निर्माण होऊ शकतात आणि त्यातूनच शक्तिशाली देश निर्माण होण्यास मदत होईल असा विश्वास सिंह यांनी यावेळी व्यक्त केला. देशाचे भवितव्य युवकांच्या हाती आहे. त्यामुळे अशा उपक्रमांच्या माध्यमातून युवकांमध्ये चैतन्य निर्माण होते, असे व्ही. के. सिंग म्हणाले.

पुण्यातील उद्घाटन कार्यक्रमाला ऑलिंपिक पदक विजेते त्याचबरोबर विविध क्रीडा पुरस्कार विजेते खेळाडू उपस्थित होते. त्यात मुरलिकांत पेटकर , श्रीरंग इनामदार, शकुंतला देवी, गोपाळ देवांग, मनोज पिंगळे आदींचा समावेश होता. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदर्श सोमाणी यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले.

आजपासून पुढील 4 दिवस देश पातळीवर हा महोत्सव राबवला जाणार असून त्यात एकंदर 17 हजार स्पर्धक सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना सुमारे 1 कोटी 15 लाख रुपयांची पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत.

***

PIBPune/S.Thakur/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1916807) Visitor Counter : 169


Read this release in: English