संरक्षण मंत्रालय
पुणे येथे लष्कराच्या दक्षिण विभागामध्ये ‘कार्डिओ पल्मोनरी रिहॅबिलिटेशन’ केंद्राचे उद्घाटन
Posted On:
13 APR 2023 5:30PM by PIB Mumbai
पुणे, 13 एप्रिल 2023
पुणे येथे आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस (एआयसीटीएस) येथे ‘कार्डिओ पल्मोनरी रिहॅबिलिटेशन’ केंद्राचे लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल ए के सिंग यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले.
हृदय आणि फुफ्फुसाचे आजार असलेल्या रूग्णांसाठी सर्वंकष ‘कार्डिओपल्मोनरी रिहॅबिलिटेशन प्रोग्राम’ देणार्या लष्करी वैद्यकीय रूग्णालयात विकसित केलेली ही अशी पहिली सुविधा आहे. यामध्ये वैद्यकीयदृष्ट्या परीक्षण केले जाते. तसेच रूग्णाच्या आवश्यकतेनुसार वैयक्तिकरित्या उपचार कार्यक्रम तयार केला जातो. त्यामुळे अशा व्यक्तींच्या एकूण जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी, तसेच त्यांच्यामध्ये सहनशक्ती निर्माण होण्यासाठी व्यायाम, ध्यान, योग आणि शिक्षण यांचा समावेश केला जातो.
ह्रदय किंवा फुफ्फुसाच्या शस्त्रक्रियेनंतर बरे होणार्या किंवा ह्रदयाच्या किंवा फुफ्फुसाच्या शस्त्रक्रियेनंतर बरे होत असलेल्या रूग्णांला दिल्या जाणा-या या उपचारांमध्ये फिजिओथेरपिस्ट, आहारतज्ञ, योग शिक्षक, डॉक्टर आणि परिचारिका यांचा समावेश असलेली एक बहुविद्याशाखीय समग्र आरोग्य सेवा टीम कार्यरत आहे. ह्रदयाचे आणि/किंवा फुफ्फुसाचे वेगवेगळे विकार असलेल्या या रूग्णांवर उपचार करण्यासाठी ही टीम मदत करणार आहे. फुफ्फुसाचे आणि हृदयाचे आजार असलेल्या रुग्णांना उपचारानंतरही त्यांच्या आजाराचे मानसिक दडपण सहन करावे लागते, त्यांना पूर्वीप्रमाणे तंदुरूस्तीच्या स्तरावर परत आणण्यासाठी सर्वांगीण काळजी घेण्याची आवश्यकता असते.
अशा प्रकारचे पुनर्वसन कार्यक्रम त्यांच्या पुनर्प्राप्तीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. यावेळी अधिकारी वर्गाने अत्याधुनिक ‘व्हर्च्युअल रिॲलिटी लॅब’ला भेट दिली. अशा प्रकारची प्रयोगशाळा लष्कराच्या वैद्यकीय संस्थेत प्रथमच तयार करण्यात आली आहे.
M.Iyengar/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1916276)
Visitor Counter : 172