गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींनी नागरी पुरस्कार प्रदान सोहोळ्यात विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात महाराष्ट्राच्या प्राध्यापक दीपक धर यांना पद्म भूषण सन्मान प्रदान केला


राष्ट्रपतींनी, कला क्षेत्रात डॉ. परशुराम कोमाजी खुणे, सुश्री रविना रवी टंडन, श्रीमती कुमी नरीमन वाडिया आणि सामाजिक कार्य क्षेत्रात श्री गजानन जगन्नाथ माने यांना पद्म श्री सन्मान प्रदान केला

Posted On: 05 APR 2023 8:03PM by PIB Mumbai

मुंबई, 5 एप्रिल 2023

 

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज नागरी पुरस्कार प्रदान सोहोळ्यात महाराष्ट्राच्या प्राध्यापक दीपक धर यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रासाठी पद्म भूषण सन्मान प्रदान केला. राष्ट्रपतींनी, कला क्षेत्रातील योगदानासाठी  डॉ. परशुराम कोमाजी खुणे, सुश्री रविना रवी टंडन, श्रीमती कुमी नरीमन वाडिया यांना  आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील योगदानासाठी श्री गजानन जगन्नाथ माने यांना पद्म श्री सन्मान प्रदान केला.

पुरस्काराने सन्मानित मान्यवरांचा संक्षिप्त जीवनपट आणि कार्य खालील प्रमाणे आहे :

 

1. प्राध्यापक दीपक धर यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानासाठी पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्राध्यापक दीपक धर हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ असून सांख्यिकीय भौतिकशास्त्र क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या ते पुण्यातल्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत प्रतिष्ठीत  प्रोफेसर एमिरेट्स म्हणून कार्यरत  आहेत.

30 ऑक्टोबर 1951 मध्ये जन्मलेल्या प्राध्यापक धर यांनी 1970 मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून बी एस्सी पदवी प्राप्त केली आणि 1972 मध्ये कानपूर इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेतून एम एस्सी (भौतिकशास्त्र) पदवी घेतली. 1978 मध्ये कॅलिफोर्निया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी पॅसेडीना (अमेरिका) इथून त्यांनी पीएचडी पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी मुंबई इथल्या टाटा मुलभूत संशोधन संस्थेत सैद्धांतिक भौतिकशास्त्र विभागात काम सुरु केले, 2016 मध्ये निवृत्त होईपर्यंत ते या विभागाचे सदस्य राहिले.

एबेलीयन सॅन्ड पाईल मॉडेल ऑफ सेल्फ ऑर्गनाइझ क्रिटीकेलिटीचे अचूक निरसन आणि एन्युमरेशन प्रॉब्लेम ऑफ डायरेकटेड साईट अ‍ॅनिमल्स इन लँटीस स्टॅटिकटीक्ससाठी अचूक निरसन, स्लो रीलँक्सेशन इन डिसऑर्डर मटेरियल्स, एक्झाक्ट रीनॉर्मलायझेशन स्टडी ऑन फ्राक्टल्स  आदी. विषयक बहुमोल योगदान त्यांनी दिले आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची रुची वाढावी यासाठी त्यांनी लेख लिहिले आणि महाविद्यालयीन शिक्षकांसाठी प्रशिक्षण शाळाही घेतल्या. विद्यार्थी आणि सहयोगी यांच्यासह काम करत त्यांनी सांख्यिकीय भौतिकशास्त्रामध्ये सक्रीय समुदाय तयार करण्यात योगदान दिले.

प्राध्यापक धर,  हे भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी, नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस ऑफ इंडिया, भारतीय विज्ञान अकादमी आणि थर्ड वर्ल्ड अ‍ॅकाडमी ऑफ सायन्सेस, ट्राएस्टे चे फेलो आहेत. उझबेकिस्तानच्या फिजिकल सोसायटीचे ते मानद सदस्य आहेत. 2007-2017 या काळासाठी भारत सरकारच्या विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाने त्यांना जे सी बोस फेलोशिप बहाल केली होती.

प्राध्यापक धर यांना आय.एन.एस.ए युवा शास्त्रज्ञ पुरस्कार (1983), भौतिकशास्त्रातला एस.एस. भटनागर पुरस्कार (1991), कंडेन्स मॅटर फिजिक्स मध्ये जे.आर. श्रायफर पारितोषिक (1993), आय.एन.एस.ए चे एस.एन.बोस पदक (2001), भौतिकशास्त्रातले थर्ड वर्ल्ड अकाडमी ऑफ सायन्स पारितोषिक (2002), बोल्टझमन पदक (2022), आय आय टी कानपूरचे अद्वितीय माजी विद्यार्थी (2022), इंडियन फिजिक्स असोसिएशन चा आर. डी. बिर्ला स्मृती पुरस्कार (2022) अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

* * *

2 .डॉ.परशुराम कोमाजी खुणे यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्म श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ.परशुराम कोमाजी खुणे हे आदिवासी आणि नक्षल भागातल्या असामान्य कार्यासाठी ओळखले जातात. गेली 50 वर्षे ते झाडीपट्टी रंगभूमीवर नाट्यकलावंत (नाट्य अभिनेते) म्हणून काम करत असून 800 लोक कला प्रकारात आणि नाटकातून त्यांनी सुमारे 5,000हून अधिक अशा  विविध भूमिका साकारल्या आहेत.

महाराष्ट्रातील वनक्षेत्र आणि आदिवासी भागातील  गुरनोली या लहानश्या खेड्यात 22 फेब्रुवारी 1952 ला जन्मलेल्या डॉ. खुणे यांचे प्राथमिक शिक्षण गुरनोली इथल्या जिल्हा परिषद शाळेतून पूर्ण झाले. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातल्या नवरगाव इथून त्यांनी माध्यमिक आणि उच्च शिक्षण घेतले. होमिओपॅथी मेडिसिन अ‍ॅन्ड सर्जरी (डी.एच.एम.एस) ची पदविका त्यांनी नागपूर मधून घेतली.

डॉ. खुणे यांनी, गुरनोली ग्रामपंचायत सरपंच म्हणून 10 वर्षे काम केले. आदिवासी आणि मागास राहिलेल्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात अंधश्रद्धा, जाचक जुन्या रिती आणि परंपरा यांचे बळी ठरणाऱ्या अशिक्षित लोकांना यातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी कार्य केले. त्यांचे जीवन आणि त्यांच्या भूमिका यांचा प्रभाव आगळाच आहे. नाटकाच्या अनुषंगाने त्यांच्या संपर्कात येणारा प्रत्येक जण त्यांच्या कौशल्याने प्रभावित होतो. अनेक युवक त्यांच्या कार्यापासुन स्फूर्ती घेत आत्मनिर्भर झाले आहेत. ज्येष्ठ कलावंतांच्या पेन्शनसाठीही त्यांनी काम केले. पूर्व वैदर्भीय आणि आदिवासी समाजाचा ते आदर्श ठरले आहेत.

कृषी क्षेत्रातल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी महाराष्ट्र सरकारच्या शेतीनिष्ठ पुरस्काराने त्यांना 1991 या वर्षी गौरवण्यात आले. 1993 मध्ये त्यांना कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.मानव मंदिर नागपूर द्वारे त्यांना 1996 मध्ये स्मिता पाटील स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाट्य क्षेत्रातल्या योगदानाबद्दल महाराष्ट्र सरकारने त्यांना 2012 मध्ये कला दान पुरस्कार प्रदान केला.

* * *

3. श्री गजानन जगन्नाथ माने यांना सामाजिक कार्य क्षेत्रातील योगदानासाठी पद्म श्री सन्मान प्रदान करण्यात आला.

श्री गजानन जगन्नाथ माने हे वंचित आणि परिघावरील समाजासाठी, विशेषकरून कुष्ठरोग निर्मुलन आणि कुष्ठ रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी कार्य करत आहेत. 

14 मे 1949 मध्ये जन्मलेल्या श्री माने यांनी आपले मुख्य शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यावसायिक दृष्ट्या सहाय्य व्हावे यासाठी दिलेल्या बॉयलर विषयक परीक्षेत ते यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. भारत-चीन युद्ध आणि सैनिकांच्या बलिदानाने प्रभावित होऊन 16 वर्षाच्या कोवळ्या वयात ते भारतीय नौदलात रुजू झाले. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी भाग घेतला आणि युद्धातल्या सहभागाबद्दल त्यांना ‘संग्राम पदक’ देऊन सन्मानित करण्यात आले.

श्री माने यांनी 1991 मध्ये कुष्ठरुग्ण पुनर्वसनाबाबतचे कार्य सुरु केले .हनुमान नगर, कुष्ठ रुग्ण वसाहत कल्याण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि आताच्या कुष्ठ सेवा संस्था, हनुमान नगर इथे अजूनही त्यांचे कार्य सुरूच आहे. या वसाहतीत 800 हून अधिक रुग्ण  रहिवासी आहेत. या भागात कुष्ठरोगाचा प्रसार त्यांनी नियंत्रणात आणला असून, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि ए.डी.एच.एस महाराष्ट्र शासन यांच्याशी संलग्न इन हाउस दवाखाना चालवून 500 हून अधिक रुग्णांना यातून पूर्णपणे बरे केले आहे. पुनर्वसन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून त्यांनी या वसाहतीत विविध उपक्रम राबवले असून यामुळे रुग्णांना आणि इथल्या रहिवाश्यांना उपजीविकेसाठी मदत होत आहे.

या वसाहत केंद्राला, त्यांच्या दुग्ध व्यवसाय प्रकल्पासाठी जपानमधल्या सासाकावा लेप्रसी फाउंडेशनकडून 2011 मध्ये प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. या वसाहतीत रुग्णांना स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने शिक्षण दिले जाते.

श्री माने यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 1971 च्या भारत- पाकिस्तान युद्धातल्या सहभागाबद्दल संग्राम पदक, महाराष्ट्र शासनाकडून 1993 मध्ये गुणवंत कामगार पुरस्कार, ठाणे जिल्ह्यातल्या माजी सैनिक मंडळाचा कुष्ठ रुग्ण सेवा कार्य पुरस्कार, कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचा कुष्ठ रुग्ण सेवा पुरस्कार, 2018 मध्ये महाराष्ट्र शासनाचा समाज उत्थान पुरस्कार तसेच खाजगी संस्थांकडून महाराष्ट्र आयकॉन, कोकण भूषण, आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार यासारखे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.

* * *

4. श्रीमती रविना टंडन यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्म श्री सन्मानाने गौरवण्यात आले आहे.

श्रीमती रविना टंडन या प्रसिद्ध अष्टपैलू भारतीय अभिनेत्री आहेत.

26 ऑक्टोबर 1972 ला जन्मलेल्या रविना टंडन या सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते रवी टंडन यांच्या कन्या.1991 मध्ये ‘पत्थर के फूल’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि त्यातल्या भूमिकेसाठी आपले पहिले फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड पटकावले. ‘सत्ता’ या चित्रपटातल्या अभिनयाकरिता राष्ट्रीय पुरस्कारासाठी त्यांचे नामांकन झाले होते. शूल या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटातल्या त्यांच्या भूमिकेची जगभरातून वाखाणणी झाली. दिलवाले, मोहरा, दुल्हे राजा, अक्स, गुलाम ए मुस्तफा असे अनेक व्यावसायिक यशस्वी चित्रपट त्यांनी दिले.

मुख्य प्रवाहातली व्यावसायिक अभिनेत्री असतानाही रविना टंडन यांनी महिला सशक्तीकरणासाठी कार्य करत समाजासाठी योगदान देण्याचा निर्णय घेतला. वैवाहिक संबंधातल्या बलात्काराची व्यथा मांडणारा दमन, वास्तव जीवनातल्या धक्कादायक प्रसंगांवर आधारित जागो आणि मातृ यासारख्या चित्रपटातल्या त्यांच्या भूमिकांना समीक्षकांच्या प्रशंसेची पावती मिळाली आणि महिला संघटनांनीही या भूमिका नावाजल्या. केजीएफ 2 या सर्वोच्च तिसऱ्या क्रमांकाची कमाई करणाऱ्या चित्रपटातल्या दमदार अभिनयानंतर अरण्यक या नेटफ्लिक्स वेब मालिकेतून त्यांनी कसदार अभिनयाचे दर्शन घडवले. वर्दीतल्या महिला आणि त्यांचा त्याग याबद्दल भाष्य करणाऱ्या या वेब सिरीजला सामाजिक संदेशाची झालर आहे.

रविना टंडन या परोपकारी, पर्यावरणवादी आणि वन्यजीव छायाचित्रकार आहेत. अवयव दानाला समाजात चालना मिळावी यासाठीच्या त्यांच्या कार्याची माननीय पंतप्रधानांनी प्रशंसा केली आहे. त्यांचे रुद्र फाउंडेशन, मुले, महिला आणि पशु कल्याणासाठी प्रशंसनीय कार्य करत आहे. W20 साठी प्रतिनिधी म्हणून मनोरंजन उद्योगातून जाणाऱ्या पहिल्या सहभागी आहेत. व्यावसायिक चित्रपट ते आर्ट हाउस चित्रपट, मनोरंजक चित्रपट ते सामाजिक आशयघन चित्रपट, महिलांचे प्रश्न हाताळण्यापासून ते वन्यजीव संरक्षणासाठी कार्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अनुकरणीय आणि गौरवास्पद आहे.

रविना टंडन यांना असंख्य पुरस्कार मिळाले आहेत. दमन ए व्हिक्टीम ऑफ मॅरीटल व्हॉयोलन्स या चित्रपटासाठी त्यांना 2001 मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. अक्स चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून समीक्षक पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून स्क्रीन पुरस्कार;; अरण्यक साठी 2022 या वर्षासाठीचा फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. सोसायटी अचीव्हर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार; अरण्यकसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार, आयडब्ल्यूएम डिजिटल पुरस्कार, हिंदुस्तान टाईम्स; नवभारत टाईम्स सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, आनंदलोक, अरण्यक साठी एबीपी पुरस्कार; आयटीए स्पेशल अ‍ॅवॉर्ड स्क्रोल ऑफ ऑनर; स्टारडस्ट पुरस्कार, इंडियन सिनेमाचा रिअल पॉवर वुमेन 2022 हा पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे.

* * *

5. श्रीमती कुमी नरीमन वाडिया यांना कलाक्षेत्रासाठी पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

श्रीमती कुमी नरीमन वाडिया या प्राणज्योती अकादमी कोरसच्या अध्यक्ष आणि संचालक आहेत. कोरल अर्थात गानवृंद संगीताचे संचलन करणाऱ्या त्या भारताच्या पहिल्या महिला कंडक्टर असून नव संगीताचे त्यांच्या सर्वोत्तम प्रथम सादरीकरणासाठी त्या भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात ओळखल्या जातात. गेली 56 वर्षे त्या प्राणज्योती अकादमी कोरसच्या अध्यक्ष आणि संचालक म्हणून काम करत आहेत.

6 ऑगस्ट 1933 मध्ये जन्मलेल्या श्रीमती वाडिया यांनी मुंबईच्या सर जमशेदजी जीजीभॉय कला विद्यालयातून कमर्शियल आर्ट मध्ये पदविका प्राप्त केली. त्याचबरोबर त्यांनी पियानोवादक म्हणून प्रशिक्षण घेतले आणि लंडन इथल्या ट्रिनीटी संगीत महाविद्यालयातून असोसिएट (ATCL) आणि लायसन्ससिएट (LTCL) या दोन्ही पदविकांसाठी पालमकोटे पुरस्काराच्या त्या विजेत्या ठरल्या.

डॉ. व्हिक्टर प्राणज्योती द्वारा स्थापित प्राणज्योती अ‍ॅकेडमी कोरस हा 1961 मध्ये युरोप कॉन्सर्ट दौऱ्यावर जाणारा पहिला भारतीय गानवृंद होता. किशोर वयातच त्या डॉ. प्राणज्योती कोरसमध्ये सोप्रानो म्हणून सहभागी झाल्या. लवकरच त्यांचे अद्वितीय संगीत कौशल्य अंगभूत नेतृत्व गुण यामुळे सहाय्यक संचालकपासून ते मास्टर श्रेणीपर्यंत पोहोचल्या. 1967 मध्ये डॉ प्राणज्योती यांच्या निधनानंतर त्यांनी कोरसची धुरा हाती घेतली आणि आधीच आंतरराष्ट्रीय प्रशंसेला पात्र ठरलेल्या कोरसला नव्या उंचीवर नेले. भारतातल्या मोठ्या शहरांमध्ये सादरीकरण करण्याबरोबरच अमेरिका, मध्य पूर्व देश , जपान, फिलिपिन्स आणि दक्षिण कोरिया मध्ये कॉन्सर्ट, उत्सव, रेडीओ आणि दूरचित्रवाणी यामध्येही आपली कला सादर केली.

शेकडो भारतीय गायक आणि वादकांनी आपले पदार्पणाचे संगीत कार्यक्रम त्यांच्या अधिपत्याखाली सादर केले.

1972 मध्ये श्रीमती वाडिया यांनी वॉशिंग्टन इथले केनेडी सेंटर आणि न्यूयॉर्क इथल्या लिंकन सेंटर मध्ये कोरल समारंभात भारताचे प्रतिनिधित्व केले. 1974 मध्ये पोलंड मधल्या नवव्या आंतरराष्ट्रीय कोरल संगीत महोत्सवात त्यांनी प्रथम पुरस्कार प्राप्त केला. याशिवाय जगभरातील अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये सांगीतिक कार्यक्रमात सादरीकरणासाठी त्यांना आणि त्यांच्या वाद्यवृंदाला निमंत्रित केले होते.

श्रीमती वाडिया यांना 2018 मध्ये लाडली मिडिया अ‍ॅन्ड अ‍ॅडव्हरटायझिंग अ‍ॅवॉर्ड फॉर जेन्डर सेन्सिटीव्हीटी द्वारे लाडली ऑफ द सेंच्युरी पारितोषिकाने गौरवण्यात आले.

 

* * *

PIB Mumbai | Jaydevi P/S.Tupe/N.Chitale/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1914043) Visitor Counter : 322


Read this release in: English