अर्थ मंत्रालय
भारतीय महसूल सेवेतील अधिकारी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत- केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांचे प्रतिपादन
एनएडीटी, नागपूर येथे भारतीय महसूल सेवेच्या 75 व्या तुकडीच्या प्रशिक्षणाचा समारोप समारंभ
Posted On:
05 APR 2023 7:08PM by PIB Mumbai
नागपूर, 5 एप्रिल 2023
भारतीय महसूल सेवेतील अधिकारी हे प्रवर्तन निदेशालय, आयकर गुप्तवार्ता संचालनालय इंटेलिजन्स ब्युरो सारख्या महत्त्वपूर्ण विभागांमध्ये आपल्या कामगिरीचा ठसा उमटवत असून केंद्र सरकारच्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये ते महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत . आयआरएस अधिकारी हे नागरिक केंद्रीत करसेवा देण्यामध्ये तसेच तंत्रज्ञान आणि माहिती आधारित तपास यंत्रणा राबवून करदात्यांमध्ये ऐच्छिक कर अनुपालन वाढवण्यामध्ये कर प्रशासकाच्या रूपात आपले कर्तव्य शिस्त, सचोटी, नम्रता, नैतिकता आणि बांधिलकीच्या भावनेने निभावतात, असे प्रतिपादन केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी आज नागपूर मध्ये केले.
नागपुर येथील छिंदवाडा रोड स्थित राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी- एनएडीटी येथे भारतीय महसूल सेवा –आय.आर.एस. च्या 75 व्या तुकडील 47 भारतीय महसूल सेवा-आयआरएस अधिकारी आणि रॉयल भूतान सेवेच्या 02 अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा समारोप आज झाला . त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गुप्ता बोलत होते. याप्रसंगी एनएडीटीचे प्रधान महासंचालक संजय पुरी तसेच आयकर विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
1986 या वर्षी आपण भारतीय महसूल सेवेत दाखल होत असताना जे राजस्व संकलन केवळ 7 हजार कोटी होते ते आज 2022-23 या आर्थिक वर्षात 16 पूर्णांक 61 लाख कोटी असे भारतीय प्राप्तिकर खात्याच्या इतिहासात सर्वात मोठे कर संकलन असल्याची माहिती नितीन गुप्ता यांनी दिली. कर प्रशासनामध्ये ई-प्रशासनाचा अंतर्भाव करून ई-फायलिंग पोर्टल द्वारे करदाते आता कर भरणा (आयकर रिटर्न्स) करत असून 7.5 कोटींपेक्षा जास्त कर भरणा हा या पोर्टल द्वारे केला जात आहे. 31 जुलै 2022 या कर भरणा करण्याच्या शेवटच्या दिवशी 72 लाख आयकर रिटर्न्स हे या पोर्टलवर एकाच दिवसात फाईल करण्यात आले असे देखील त्यांनी सांगितलं.
करचोरी ही अत्यंत गुंतागुंतीची गोष्ट असून विश्वसनीय माहितीच्या आधारे आपण कर अनुपालन सुनिश्चित करू शकतो असे त्यांनी सांगितले. आयकर खाते हे बदलत्या काळानुसार नॉनइनेव्हिसीव तंत्राद्वारे फेसलेस असेसमेंट, करदात्यांची एआयएस- अॅन्युअल इन्फॉर्मेशन सिस्टीम , टीआयएस - टॅक्सपेअर इन्फॉर्मेशन सिस्टीम याद्वारे एक पारदर्शक कर माहिती यंत्रणा विकसित करत असून नागरिक केंद्रित करसेवेला ही व्यवस्था पूरक असणार आहे. अधिकार्यांनी आपल्या क्षमता वाढीकडे लक्ष द्यायला हवे आई-जीओटी प्लॅटफॉर्म वरून नवे नवे प्रशिक्षण कार्यक्रम सुद्धा शिकायला हवे असे आवाहन गुप्ता यांनी केले.
याप्रसंगी 75 व्या तुकडीतील आयआरएस अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्हाचे वितरण करण्यात आले. 75 व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिकारी मेहेक मित्तल यांना सर्वोत्तम कामगिरीसाठी वित्तमंत्री सुवर्णपदकाने नितीन गुप्ता यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले त्याचप्रमाणे 73 व्या तुकड्यातील अधिकारी केशव गोयल यांना सुद्धा वित्तमंत्री सुवर्णपदकांनी सन्मानित करण्यात आले.
एनएडीटीचे प्रधान महासंचालक संजयपुरी यांनी याप्रसंगी 75 व्या तुकडीतील अधिकाऱ्यांना फेसलेस असेसिंग ऑफिसर त्याचप्रमाणे ज्युडीशिअल असेसिंग ऑफिसरची जबाबदारी पहिल्यांदाच देण्यात आल्याची माहिती दिली. ऑन द जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातून या अधिकाऱ्यांना कार्यक्षम अधिकारी बनवण्याचा प्रयत्न आमचा राहील असे देखील त्यांनी सांगितले. एनएडीटीचे अतिरिक्त महासंचालक मनीष कुमार यांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना करप्रशासकाची प्रतिज्ञा दिली. प्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त महासंचालक बी. राव यांनी प्रशिक्षणाची माहिती दिली. या प्रशिक्षणामध्ये अधिकाऱ्यांना 11 विषयांमध्ये उत्तीर्ण व्हावे लागते त्यामध्ये आयकर कायदा, तपासणी तंत्र, आर्थिक पत्रक, सुप्रशासनामधील नैतिकता, राजभाषा अशा विषयांचा समावेश असून वर्ग खोलीतील व्याख्याने, प्रात्यक्षिके, राष्ट्रीय संस्थेचा अभ्यासदौरा याद्वारे त्यांना 16 महिन्याचे प्रशिक्षण दिले जाते.
या कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थी अधिकारी त्यांचे कुटुंबीय त्याचप्रमाणे अधिकारी आयकर विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एनएडीटी आणि 75 व्या आय. आर.एस. बॅचविषयी :
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूर ही केंद्र सरकारच्या भारतीय महसूल सेवा (आयकर) अधिकाऱ्यांसाठी असलेली सर्वोच्च प्रशिक्षण संस्था आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित नागरी सेवा परीक्षा द्वारे आयआरएस अधिकाऱ्यांची निवड केली जाते. थेट निवड झालेले हे अधिकारी प्रत्यक्ष कामावर रुजु होण्यापुर्वी सुमारे 16 महिन्यांचे सेवाअंतर्गत प्रशिक्षण घेतात. भारतीय महसूल सेवेच्या 75 व्या बॅचमध्ये 49 अधिकारी प्रशिक्षणार्थींचा तसेच समावेश आहे भूतान रॉयल सर्व्हिसमधील 2 अधिकारी प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. बॅचचे सरासरी वय 28 आहे. या बॅचमध्ये 15 महिला अधिकारी प्रशिक्षणार्थी आहेत .या बॅचचे प्रतिनिधित्व भारतातील 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश करतात. सर्वाधिक अधिकारी प्रशिक्षणार्थी केरळ (9) आणि त्यानंतर उत्तर प्रदेश (8),झारखंड (6), महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रत्येकी (4) आणि बिहार (3) राज्यातील आहेत. 73 टक्के अधिकारी प्रशिक्षणार्थींना अभियांत्रिकीची पार्श्वभूमी आहे. वैद्यकीय विज्ञान पार्श्वभूमीतून 3 अधिकारी प्रशिक्षणार्थी, वाणिज्य शाखेतील 3 आणि कायद्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले एक अधिकारी प्रशिक्षणार्थी आहेत. 53 टक्के अधिकारी प्रशिक्षणार्थी यांना कामाचा अनुभव आहेत 33 टक्के अधिकारी प्रशिक्षणार्थीं ग्रामीण पार्श्वभूमी आणि बाकीचे शहरी किंवा निम-शहरी प्रदेशातून येतात.अधिकारी प्रशिक्षणार्थींना कर अधिकारी म्हणून काम करण्यासाठी आणि महसूल वाढीसाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्ये यांनी सुसज्जीत केले जाते. 16 महिन्याचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर अधिकारी प्रशिक्षणार्थींना देशभरातील आयकर कार्यालयांमध्ये आयकर विभागाच्या सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्त केले जाते. हे अधिकारी महसूल संकलनाचे संचालन आणि राष्ट्र उभारणीत एक महत्त्वाचा भूमिका बजावतात.
* * *
PIB Nagpur | S.Rai/D.Wankhede/D.Dubey/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1914008)
Visitor Counter : 166