नौवहन मंत्रालय
महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे 60 व्या मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उद्घाटन
Posted On:
31 MAR 2023 9:18PM by PIB Mumbai
महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज (31 मार्च) मुंबईत राजभवन येथे मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. नौवहन महासंचालनालयाचे महासंचालक आणि एनएमडीसी (मध्य) समितीचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी मर्चंट नेव्ही सप्ताहाच्या हीरक महोत्सवाच्या उद्घाटनानिमित्त राज्यपालांच्या पोशाखावर मर्चंट नेव्ही दिनाचा लघु ध्वज लावला.

यावेळी उपस्थित प्रतिनिधींना संबोधित करताना राज्यपालांनी भारताच्या प्रदीर्घ सागरी इतिहासाचा उल्लेख करत भारताच्या आर्थिक विकासासाठी मर्चंट नेव्हीच्या महत्त्वावर भर दिला. मुंबई सभोवतालच्या समुद्रात प्रवासी वाहतूक सेवांच्या विकासासाठीच्या शक्यता तपासून पाहता येतील असे मत त्यांनी व्यक्त केले.आपले शेजारील देश आर्थिक समस्यांमधून जात असताना भारतीय अर्थव्यवस्था बहुतांशी स्थिर आहे आणि ती अधिक स्थिर होण्यासाठी सागरी व्यापार आवश्यक सहाय्य प्रदान करेल यावर त्यांनी भर दिला.भारतात सागरी प्रशिक्षण संस्थांची संख्या वाढवून त्यांना अधिक बळकट करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
नौवहन महासंचालनालयाच्या महासंचालकानी राष्ट्रीय सागरी दिनाचे महत्त्व आणि भारत सरकारच्या नौवहन महासंचालनाच्या आणि सागरी क्षेत्रातील इतर संबंधित संस्थांच्या घडामोडींबाबत माहिती दिली.
राष्ट्रीय सागरी दिनापूर्वीचा आठवडा मर्चंट नेव्ही सप्ताह म्हणून साजरा केला जातो. ‘ नौवहन क्षेत्रातील अमृत काळ’ ही यावर्षीची संकल्पना आहे.
मर्चंट नेव्ही सप्ताह साजरा करताना, प्रकाशने आणि/किंवा वृत्तपत्रे, नियतकालिके , बैठका, चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा, प्रदर्शन, स्पर्धा इत्यादींद्वारे ज्ञान आणि माहितीची देवाणघेवाण करून नौवहन उद्योगाची भूमिका सर्व पैलूंच्या माध्यमातून प्रदर्शित केली जाईल. तसेच भारतीय नौवहन क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल निवडक दिग्गजांना सागर सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

भारताला 7500 किलोमीटरचा मोठा किनारा लाभला असून जवळपास 14,500 किलोमीटरचे देशांतर्गत जलमार्ग, 200 हून अधिक मोठी आणि लहान बंदरे आहेत. भारतीय व्यापारी सागरी ताफ्यात आज 13.7 दशलक्ष जीटी भार वाहक क्षमता असलेली 1526 जहाजे आहेत, अशी माहिती नौवहन महासंचालकांनी दिली. भारताच्या परदेशी व्यापारापैकी 95% तर मूल्यानुसार 75% व्यापार सागरी वाहतुकीद्वारे होतो आणि यापैकी सुमारे 92% माल परदेशी ध्वजांकित जहाजांद्वारे वाहून नेला जातो अशी माहिती त्यांनी दिली. नौवहन व्यवसायात महिलांच्या प्रवेशासाठी प्रोत्साहन.देण्यासाठी भारतीय सागरी प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असलेल्या लिंग समानतेसाठी नौवहन संचालनालय पावले उचलत आहे.
***
N.Chitale/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1912722)
Visitor Counter : 219