गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींनी नागरी पुरस्कारांच्या औपचारिक सोहळ्यात व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातून, महाराष्ट्रातील कुमार मंगलम बिर्ला आणि कला क्षेत्रातून ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले


सामाजिक कार्य क्षेत्रात भीकू रामजी इदाते, उद्योग-व्यवसाय क्षेत्रात राकेश राधेश्याम झुनझुनवाला (मरणोत्तर) ,डॉ. प्रभाकर भानुदास मांडे आणि रमेश रघुनाथ पतंगे यांचा साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान

Posted On: 22 MAR 2023 7:59PM by PIB Mumbai

22 मार्च 2023 

 

नवी दिल्लीत आज झालेल्या नागरी पुरस्कार वितरण समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील कार्याबद्दल महाराष्ट्रातील कुमार मंगलम बिर्ला यांना तसेच कला क्षेत्रातील कार्याबद्दल जेष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यासोबतच, सामाजिक कार्य या क्षेत्रात, ज्येष्ठ कार्यकर्ते, भिकू रामजी इदाते यांना, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात, डॉ. प्रभाकर भानुदास मांडे आणि रमेश रघुनाथ पतंगे यांना आणि उद्योग-व्यवसाय क्षेत्रात राकेश राधेश्याम झुनझुनवाला यांना (मरणोत्तर) पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.   

या सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे जीवनकार्य विशद करणारी सन्मानपत्रे खालीलप्रमाणे:- 

1) श्री कुमार मंगलम बिर्ला यांना व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

श्री कुमार  मंगलम बिर्ला, हे प्रतिष्ठित भारतीय बहुराष्ट्रीय उद्योग समूह आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष आहेत. 
या उद्योग समूहाला शतकाहून जास्त परंपरा आहे आणि परदेशात पदार्पण करणारा हा पहिला भारतीय उद्योग समूह आहे. आज या समूहाचा उद्योग 36 देशांत पसरलेला आहे आणि जवळपास 60 अब्ज अमेरिकन डॉलरची त्याची उलाढाल आहे. 
श्री बिर्ला यांचा जन्म 14 जून, 1967 रोजी झाला. ते समूहाच्या भारतातील आणि जगातील सर्व मोठ्या कंपन्यांचे अध्यक्ष आहेत. गेले 27 वर्षांपेक्षा जास्त काळ ते समूहाची धुरा सांभाळत आहेत, या काळात त्यांनी समूहाच्या  विकासाला वेग दिला आहे आणि समूहाची उलाढाल 30 पटींनी वाढविली आहे. त्यांनी भारतात आणि जगभरात 40 कंपन्या विकत घेतल्या आहेत, जे कुठल्याही भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तुलनेत  सर्वाधिक आहे. 

बिर्ला यांच्या नेतृत्वात आदित्य बिर्ला समूह सिमेंट पासून रसायनांपर्यंत, धातूंपासून वस्त्रोद्योगापर्यंत आणि तयार कपड्यांपासून आर्थिक सेवा क्षेत्रापर्यंत, सर्व महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये मग अग्रगण्य बनलेला आहे. या काळात त्यांनी एक अतिशय यशस्वी आणि गुणवत्ता पूर्ण संस्था उभी केली  या संस्थेत100 देशांमध्ये एक लाख 40 हजार कर्मचारी काम करतात.

आपल्या समूहाव्यतिरिक्त बिर्ला यांनी अनेक  मंडळात महत्त्वाच्या जागी काम केले आहे. भारतीय रिझर्व बँकेच्या संचालक मंडळावर त्यांनी संचालक म्हणून काम केले आहे. शेअर बाजार नियमक मंडळ म्हणजेच सेबीवर उद्योग क्षेत्राचे पहिले प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले आहे. सेबीच्या कॉर्पोरेट नियमक समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कॉर्पोरेट भारता साठीची पहिली संहिता बनवली आहे. भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने बनवलेल्या तसेच त्यांनी पंतप्रधानांच्या व्यापार आणि उद्योग सल्लागार समितीवर देखील काम केले आहे. भारताच्या कंपनी सचिव संस्थेतर्फे मानद पदवीने सन्मानित होणारे ते पहिले भारतीय उद्योगपती आहेत. 

बिर्ला अनेक शैक्षणिक संस्थांशी संबंधित आहेत. बिर्ला तंत्रज्ञान आणि विज्ञान संस्था (BITS), पिलानी, गोवा, हैद्राबाद आणी दुबई चे ते कुलगुरू आहेत. भारताच्या अग्रगण्य व्यवस्थापन संस्था - भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद तसेच भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्लीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम बघितले आहे. जागतिक स्तरावर, ते लंडन बिझनेस स्कूलचे मानद फेलो आहेत. त्यांनी वर्ष 2019 मध्ये आपल्या आजोबा श्री बी के बिर्ला यांच्या स्मरणार्थ लंडन बिझनेस स्कूलनाध्ये 15 दशलक्ष पाउंडचा शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरु केला. ही शिष्यवृत्ती दर वर्षी दहा विद्यार्थ्यांना दिली जाते, ज्यापैकी पाच भारतीय विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. 

बिर्ला यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. वर्ष 2021 मध्ये त्यांना उद्योग परिवर्तनासाठीचा टीआयई जागतिक उद्योजकता पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय उद्योगपती आहेत. वर्ष 2019 मध्ये त्यांना एबीएलएफ ग्लोबल आशियन पुरस्कार देण्यात आला. कॉर्पोरेट उत्कृष्टतेसाठीचा ईकॉनॉमिक टाईम्सचा बिझनेस लीडर ऑफ द इअर हा  पुरस्कार देखील मिळाला आहे. या व्यतिरिक्त त्यांना अर्नेस्ट अंड यंग .फोर्ब्स, सीएनबीसी, सीएनएन - न्यूज 18 या सारख्या अग्रगण्य संस्थांचे अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत.

*****

2) श्रीमती सुमन कल्याणपूर, यांना कला क्षेत्रातील पद्मभूषण प्रदान करण्यात आले आहे.  

श्रीमती सुमन कल्याणपूर या नावाजलेल्या भारतीय पार्श्वगायिका आहेत. भारतीय संगीताच्या सुवर्ण काळातील तीन अग्रगण्य महिला पार्श्वगायिकांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या मधुर आवाजाने संगीत क्षेत्राला जवळपास चार दशके भुरळ घातली आहे. त्यांनी हिंदी, मराठी आणि इतर 11 भाषांमध्ये अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत. आजही, वयाच्या 86 व्या वर्षी त्यांच्या आवाजात तजेला आणि तारुण्य आहे. त्यांची गाणी ऐकणे आजही सांगितीक मेजवानी असते. 

श्रीमती कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी, 1937 रोजी झाला. त्यांनी संगीत क्षेत्रातील कारकीर्द 1952 मध्ये आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेल्या एका कार्यक्रमाने सुरु केली. प्रभात चित्र संस्थेचे संगीत दिग्दर्शक आणि संगीत तज्ञ केशवराव भोळे यांच्याकडून त्यांना मुलभूत संगीताबद्दल मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्यांनी उस्ताद अब्दुल रेहमान खान, तावडे बाबा, नवरंग नागपूरकर आणि यशवंत देव यांच्यासारख्या गुरूंकडून शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम संगीताचे प्रशिक्षण घेतले. आपल्या काळातील तलत महमूद, मन्ना डे, मोहम्मद रफी, मुकेश, किशोर कुमार, परवीन सुलताना, लता मंगेशकर आणि अशा भोसले या सर्व आघाडीच्या गायाकांसोबत आणि चित्रपट क्षेत्रातील (1952-1986) एस डी  बर्मन, रोशन, शंकर – जयकिशन, नौशाद, खय्याम, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, उषा खन्ना, राजेश रोशन, रॉबिन बॅनर्जी, दत्ताराम आणि इतर अनेक प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकांच्या हाताखाली त्यांनी गाणी गायली आहेत. अनेक टीकाकार आणि संवेदनशील मर्मज्ञांच्या मते, त्यांची चित्रपट गाणी, भजन, उपशास्त्रीय संगीत आणि बिगर चित्रपट गाणी सदर करण्याची अद्वितीय शैली आहे. श्रीमती कल्याणपूर यांची उर्दू गझल गायकी देखील त्यांच्या शैलीशी सुसंगत अद्वितीय आहे. त्यांनी गायलेल्या सर्वात प्रसिद्ध गाण्यांपैकी एक, ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे...’ या गाण्याला विशेष स्थान आहे. हे आजही प्रसिद्ध आहे, अनेक गायकांनी सदर केले आहे आणि या गाण्याचे रिमिक्स देखील झाले आहे. 

श्रीमती कल्याणपूर यांनी अनेक गोष्टी ‘पहिल्यांदा’ करण्याचा मान मिळवला आहे. परदेशात कार्यक्रम करणाऱ्या आणि अमेरिका, इंग्लंड (वेम्बली स्टेडियम), दक्षिण अमेरिका, वेस्ट इंडीज आणि कॅनडा इथे नृत्य आणि गायनाचा भारतीय सांस्कृतिक कार्यक्रम करणाऱ्या  त्या पहिल्या भारतीय गायिका आहेत. बीबीसी, लंडन या चॅनलवरील कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या त्या पहिल्या  भारतीय  गायिका होत्या. महाराष्ट्र सरकारने अल्पबचतीचा प्रसार करण्यासाठी आयोजित केलेल्या 25 सांस्कृतिक कार्यक्रमात त्या गायल्या आहेत. भारत सरकारने सैनिकांच्या विधवांच्या मदतीसाठी आयोजित केलेल्या पाच कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी एकतेचा परिचय दिला. श्रीमती कल्याणपूर यांना बालपणापासूनच अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळविण्याचे दुर्मिळ भाग्य लाभले आहे. रसरंग, नाशिक यांच्यावतीने दिला जाणारा  सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा फाळके पुरस्कर, मियां तानसेन पुरस्कार, गुजरात राज्य चित्रपट पुरस्कार 1970-73 सलग तीन वर्षे, पंजाब चित्रपट आणि नाट्य पुरस्कार,  भोजपुरी चित्रपट पुरस्कार, सांस्कृतिक सेवेसाठी महाराष्ट्र राज्याचे सुवर्ण पदक, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा लता मंगेशकर पुरस्कार तसेच इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 

*****

3) श्री भिकू रामजी इदाते यांना समाज सेवेसाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला  आहे.  

भारत सरकारच्या, भटक्या आणि विमुक्त जाती जमाती विकास आणि कल्याण  मंडळाचे माजी अध्यक्ष श्री भिकू रामजी इदाते, हे ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि समाजच्या वंचित घटकांच्या विकासात लक्षणीय योगदानासाठी प्रसिद्ध आहेत. 
यांचा जन्म 2 जून, 1949 रोजी महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यात एका लहानशा खेड्यात झाला. श्री इदाते यांनी शिक्षक म्हणून आपली कारकीर्द सुरु केली. मात्र गरीब भटक्या विमुक्त जमातींवद्दल त्यांना असलेला कळवला येवून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. तेव्हापासून गेली 53 वर्षे ते सामाजिक – आर्थिक दृष्ट्या वंचित लोकांच्या कल्याणासाठी काम करत आहेत. त्यांनी 1992 मध्ये ‘सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ’ स्थापन केले. यामुळे मंडणगड तालुक्यातील गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाने मंडणगड आणि दापोली तालुक्यांत महाविद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये, उच्च माध्यमिक शाळा, इतर मागासवर्गीय वर्गासाठी वसतिगृह आणि आश्रम शाळा सुरु केल्या आहेत. भटके विमुक्त विकास परिषद आणि त्याच्याशी संलग्न, विशेषतः भटक्या विमुक्त समाजासाठी काम करणाऱ्या,  इतर आठ संस्थांना आर्थिक मदत केली आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे, श्री इदाते, यांनी 1990 मध्ये ‘फुले - आंबेडकर संदेश यात्रा’ काढली होती, आणि 47 दिवसांत महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांतून 7,000 किमी प्रवास केला. त्यानंतर त्यांनी समरसता यात्रा (2005) आयोजित केली आणि 8,000 किमी प्रवास केला. जळगाव इथे पहिले वहिले ‘सामाजिक समरसता साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. त्यांनी रत्नागिरी, तुळजापूर आणि महाराष्ट्रातील इतर अनेक ठिकाणी भटक्या जमातींसाठी अनेक कल्याणकारी प्रकल्प सुरु केले. महाराष्ट्र सरकारने (1999) मध्ये स्थापन केलेल्या इदाते समितीचे ते अध्यक्ष होते. भारत सरकारच्या, भटक्या आणि विमुक्त जमाती विकास आणि कल्याण मंडळाचे अध्यक्ष (2005) म्हणून काम करताना त्यांनी या जमातींच्या उत्थानासाठी अनेक उपयुक्त उपाययोजना सुचविल्या आहेत. 

श्री इदाते हे विचारवंत, वक्ते, लेखक आणि नेते आहेत. त्यांनी अनेक प्रोत्साहनपर व्याखाने दिली असून सात पुस्तके तसेच राष्ट्रीय आणि समाजिक विषयांवर अनेक लेख लिहिले आहेत. त्यांनी अनेक संस्था स्थापन केल्या आहेत आणि इतर संस्थांवर महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. समाजातील वंचित आणि शोषित घटकांना पुढे आणण्यात त्यांनी महत्वाचे योगदान दिले आहे. श्री इदाते यांचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कामासारखेच आहे. अनेक महत्वाच्या संस्था आणि संघटनांनी श्री इदाते यांना अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार दिले आहेत. यात मधुकरराव देवल सामाजिक पुरस्कर (1991), स्वामी विवेकानंद सेवा सन्मान सामाजिक पुरस्कार (2005), कर्मवीर (2006), डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन पुरस्कार (2010), राष्ट्रीय गर्व पुरस्कार, गुणवंत नागरिक पुरस्कार, भारतरत्न डॉ एपीजेअब्दुल कलाम उत्कृष्टता पुरस्कार, डॉ बाबासाहेब आंबेडकर रत्न पुरस्कार, भारताचे सर्वोत्तम नागरिक, भारताचा गौरव पुरस्कार, बाबा आमटे प्रेरणा पुरस्कार, सामाजिक पुरस्कार, अटल समाज भूषण पुरस्कार, जैन गौरव पुरस्कार, महात्मा फुले पुरस्कार, सेवा रत्न राष्ट्र गौरव पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कार आहेत. 

*****

4) श्री राकेश राधेश्याम झुनझुनवाला (मरणोत्तर) यांना व्यवसाय आणि उद्योग शेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.

श्री राकेश राधेश्याम  झुनझुनवाला हे एक मोठे गुंतवणूकदार, व्यापारी आणि सहृदयी व्यक्ती होते. जगातील अत्यंत यशस्वी गुंतवणूकदार म्हणून ते ओळखले जात. 

पाच जुलै 1960, रोजी जन्मलेले राकेश झुनझुनवाला सनदी लेखापाल होते, तसेच मुंबईच्या सिडनेहम महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य शाखेची पदवीही घेतली होती. त्यांनी 1985 साली आपल्या कारकिर्दची सुरुवात केली आणि केवळ 5,000 रुपयांच्या प्रारंभिक गुंतवणुकीतून, त्यांनी शेअर बाजारात  व्यवहार करायला सुरुवात केली. 30 वर्षांच्या आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत, त्यांनी या छोट्याशा गुंतवणुकीतून एक मोठे गुंतवणूकदार म्हणून आपला दबदबा निर्माण केला. त्यांची ही यशोगाथा अनेक उदयोन्मुख गुंतवणूकदारांसाठी प्रेरणादायक ठरली आहे.  

राकेश झुनझुनवाला यांनी अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली, ज्यांच्यात वाढीची क्षमता होती, उत्तम व्यवस्थापन कौशल्ये होती आणि त्यांच्याशी सबंधित उद्योगांमध्ये असलेल्या स्पर्धात्मक वातावरणाचा त्यांना लाभ होत होता. त्यांच्या गुंतवणुकी कोणत्या विशिष्ट क्षेत्रापुरत्या मर्यादित नव्हत्या, तर, बँकिंग, औषधनिर्माण, आणि ग्राहकोपयोगी वस्तू अशा विविध क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये ते गुंतवणूक करत असत.  

सर्वात महत्वाचे म्हणजे, झुनझुनवाला यांचा भारतावर विश्वास होता आणि या विश्वासानेच  गुंतवणुकीच्या क्षेत्रात त्यांची कारकीर्द घडवली. त्यांनी भारताची क्षमता ओळखली होती. इथले लोक, संस्था आणि सांस्कृतिक मूल्यांवर त्यांचा अतूट विश्वास होता. 21व्या शतकातील जगाचे आर्थिक शक्तीस्थान म्हणून उदयाला येण्यासाठी आवश्यक सर्व क्षमता भारतात आहेत, असा त्यांचा विश्वास होता.

शेअर बाजारातील आपल्या यशस्वी कारकिर्दीसोबतच, झुनझुनवाला अनेक सामाजिक कार्यातही सहभागी होते. अनेक सामाजिक कार्यांसाठी त्यांनी सढळ हस्ते देणग्या दिल्या.  सर्व भारतीयांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळायला हवे, आरोग्य सुविधा मिळायला हव्यात, यावर त्यांचा विश्वास होता. यातूनच त्यांनी अशोका विद्यापीठ आणि शंकर नेत्रालय आणि अगस्त्य अशा अनेक संस्थांना त्यांनी पाठबळ दिले होते. 

श्री झुनझुनवाला हे त्यांच्या अद्वितीय गुंतवणूक पद्धत आणि बाजाराबद्दल चाणाक्ष भाकीत वर्तविण्याची हातोटी, यासाठी भारतीय शेयर बाजारातील आदर्श समजले जातात. त्यांची यशोगाथा ही भारतातील आणि जगभरातील अनेक इच्छुक गुंतवणूकदारांसाठी प्रेरणादायी आहे. श्री झुनझुनवाला यांचे 14 ऑगस्ट, 2022 रोजी निधन झाले. 

*****

5) डॉ प्रभाकर भानुसाद मांडे यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.  

डॉ प्रभाकर भानुदास मांडे हे लोककथा, लोक संस्कृती आणि साहित्यातील आघाडीचे  विद्वान समजले जातात. 

यांचा जन्म 16 डिसेंबर, 1933, रोजी झाला. डॉ मांडे यांनी 1967 मध्ये लोककथांचा तौलनिक अभ्यास या विषयात पीएच. डी. पूर्ण केली. त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील पिशूर इथे सरकारी शाळेत शिक्षक म्हणून 1961 मध्ये आपली कारकीर्द सुरु केली. त्यानंतर 1961 मध्ये परभणीच्या श्री शिवाजी महाविद्यालयात रुजू झाले. मराठवाडा विद्यापीठात त्यांनी 17 वर्षे रीडर म्हणून काम केले आणि 1993 मध्ये वरिष्ठ प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. त्यांनी लिहिलेल्या काही महत्वाच्या पुस्तकांपैकी ‘गावगाड्या बाहेर’, ‘रामकथेची मौखिक परंपरा’, ‘लोकरंगभूमी’, ‘मागणी त्याची मागते’ ही आहेत, ज्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुरस्कार पारपत झाले आहेत.  त्यांनी हैद्राबाद, म्हैसूर, कोलकाता, मदुराई, नवी दिल्ली, कटक, आणि हिडेलबर्ग विद्यापीठ, पश्चिम जर्मनी तसेच अरिझोना विद्यापीठ, अमेरिका इथे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये 25 पेक्षा जास्त शोध प्रबंध सदर केले आहेत. 

डॉ मांडे यांनी लोककथा आणि लोक कलाकार यांचा अभ्यास देखील सुरु केला. या अभ्यासात शेकडो लोकगीते आणि लोक कथा संकलित करण्यावर त्यांचा विशेष भर होता. त्यांनी विविध लोक कला, लोक कलाकारांची जीवनशैली आणि त्यांचे संस्कृती आणि परंपरांचे सादरीकरण यावर लिखाण केले आहे. त्यांच्या कार्याची विविध विद्यापीठांनी प्रशंसा केली आहे. विद्यापीठ स्तरावर पदव्युत्तर अभ्यासक्रमात लोक साहित्य समाविष्ट नव्हते. या लोकांच्या जीवनशैलीचे समजासाठी असलेले महत्व लक्षात घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 1973 मध्ये हे विषय पदव्युत्तर अभ्यासक्रमात सामील केले. 

डॉ मांडे यांनी या विषयाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम तयार केला, विद्यार्थ्यांसाठी पुस्तके लिहिली जी विद्यापीठांनी या विषयासाठी अभ्यासक्रमात सामील केली. महाराष्ट्राच्या इतर विद्यापीठांनी हा विषय पदव्युत्तर अभ्यासक्रमात सामील करून घेतला. त्यांनी ‘लोकसाहित्य संशोधन केंद्र’ स्थापन केले, जो, तरुण पिढीसाठी लोक कथा अभ्यास आणि संशोधन यासाठी एक महत्वाचा मंच आहे. त्यांनी महारष्ट्र आणि गोवा इथे जवळपास 50 वार्षिक चर्चासत्रे आयोजित केली आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांचे हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. 

डॉ मांडे यांना अनेक राज्य आणि राष्ट्रीय  चर्चासत्रांचे आयोजन केले आहे. त्यांच्या ‘गावगाड्या बाहेर’ आणि ‘सांकेतिक गुप्त भाषा: परमार आणि स्वरूप’ या पुस्तकांसाठी त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 1991 मध्ये डी. लिट. देऊन सन्मान केला. त्यांना स्व यशवंतराव चव्हाण पुरस्कर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक, डॉ मोहनजी भागवत, यांच्या हस्ते भूषण पुरस्कार आणि लोक महर्षी ही पदवी प्रदान करण्यात आली आहे, महाराष्ट्र सरकारच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद जीवन गौरव पुरस्कार, भारत सरकारचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 

*****

6) श्री रमेश रघुनाथ पतंगे यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार प्रदान 

श्री रमेश रघुनाथ पतंगे हे नामवंत लेखक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते मुंबईतील हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्याशिवाय, सामाजिक समरसता मंच, भटके विमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद आणि समरसता अध्ययन केंद्र आणि विवेक व्यासपीठ अशा संस्थांचेही ते सहसंस्थापक आहेत. 

9 ऑगस्ट, 1944 साली जन्मलेल्या पतंगे यांनी 1972 साली मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली. आणीबाणीच्या काळात, ते भूमिगत होऊन कार्य करत होते, त्यानंतर, 1976 साली अखिल भारतीय जनसंघर्ष समितीचे सरचिटणीस श्री रविंद्र वर्मा यांच्यासह पतंगे यांनाही अटक झाली. त्यांना मिसा (अंतर्गत सुरक्षा व्यवस्थापन कायदा)  अंतर्गत ठाण्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते, तिथे ते 14 महीने राहिले.  1977 ते 1985 या काळात, त्यांनी उद्योग कृषी विकास मंडळ या युवकांमध्ये उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कार्यरत स्वयंसेवी संस्थेचे संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली. 

1985 साली, श्री पतंगे यांनी साप्ताहिक विवेकचे सहसंपादक म्हणून जबाबदारी स्वीकारली, नंतर ते या साप्ताहिकाचे मुख्य संपादकही झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली, विवेक सप्ताहिक महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यात पोहोचले.  त्यांच्याच संपादकपदाच्या कार्यकाळात, अनेक पुस्तकांचे खंड विवेकतर्फे प्रकाशित करण्यात आले. यात, गो-विज्ञान, राष्ट्र रत्न अटलजी, कृतिरूप समरसता, राष्ट्र ऋषि श्री गुरुजी, कृतिरूप विवेकानंद, पंडीत दीनदयाल उपाध्याय आणि लोकनेता-विश्वनेता अशा पुस्तकांचा समावेश आहे. 

श्री पतंगे यांनी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अनेक लेख लिहिले आहेत.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर त्यांनी लिहिलेली पुस्तके, संघर्ष महामानवाचे, सामाजिक न्याय आणि डॉ. आंबेडकर, आंबेडकर आणि विवेकानंद, डॉ. आंबेडकर एक राष्ट्रनिर्माता, ही पुस्तके  अतिशय लोकप्रिय ठरली आहेत. त्यांनी भारतीय राज्यघटनेविषयी चार पुस्तके लिहिली आहेत. तर अमेरिका, ब्रिटन, फ्रांस आणि रशियाच्या संविधानांवरही त्यांनी चार पुस्तके लिहिली आहेत. तसेच, त्यांनी डॉ. बी. आर. आंबेडकर, समरसता आणि भारताच्या संविधानाविषयी भारतातल्या अनेक विद्यापीठांमध्ये, विविध महाविद्यालये आणि अनेक वैचारिक मंचांवर भाषणेही दिली आहेत. इंडिया बुक ट्रस्ट, भारत भवन भोपाळ, राजा राममोहन रॉय फाऊंदेशन आणि केंद्रीय चित्रपण प्रमाण मंडळ इथे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांची तीन पुस्तके, ‘मी, मनु आणि संघ’, ‘अंगुस्तान ते लेखणी’ आणि ‘समरसतेचा वाटसरु’ त्यांच्या वैयक्तिक विचारप्रवाहाची स्पंदने मांडणारी पुस्तके आहेत. ही पुस्तके, मराठी साहित्यात अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वाची भर घालणारी पुस्तके मानली जातात. 

पतंगे यांनी आपल्या आयुष्याचा मोठा काळ हिंदू समाजातील जातीय उतरंडीचे निर्मूलन, अस्पृश्यता प्रथा आणि सामाजिक अन्याय दूर करण्यासाठी वाहून घेतला आहे. त्यांच्या पालकत्वाखाली भटक्या जमातींच्या मुला-मुलींसाठीमहाराष्ट्रात चिंचवड (पुणे) आणि यमगरवाडी [धाराशिव जिल्हा] इथे आश्रमशाळा चालवल्या जातात, या शाळांमध्ये जवळपास 900 भटक्या जमातींचे विद्यार्थी इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेत आहेत. समरसतेविषयी जनजागृती करण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली अस्पृश्यता, जातिभेद आणि भारतीय राज्यघटनेतील महत्वाच्या बाबी या विषयांवर विविध परिसंवाद, परिषदा आयोजित केल्या जातात.

श्री पतंगे यांना  अनेक पुरस्कार आणि सन्मान देऊन गौरवण्यात आले आहे.. मध्य प्रदेश सरकारने त्यांना माणिकचंद वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार, महाराष्ट्र सरकारने त्यांना लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी न्यास यांनी त्यांना बौद्ध योद्ध सन्मानाने सन्मानित केले आहे. दिवंगत पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते त्यांना ‘पांचजन्य नचिकेता’ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि संपादकीय कार्याची यथोचित दखल घेत, अनेक स्थानिक संस्थांनी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. 

 

* * *

PIB Mumbai | JPS/R.Aghor/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1909692) Visitor Counter : 634


Read this release in: English