नौवहन मंत्रालय
ग्रीन टग ट्रान्झिशन प्रोग्राम (GTTP) या उपक्रमाच्या माध्यमातून 2030 पर्यंत हरित अर्थात पर्यावरण-स्नेही जहाज निर्मितीचं जागतिक महा केंद्र बनण्याचं भारताचे उद्दिष्ट आहे: सर्वानंद सोनोवाल
Posted On:
22 MAR 2023 7:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मार्च 2023
ग्रीन टग ट्रान्झिशन प्रोग्राम (GTTP), हा यांत्रिक नौकांचं परिवर्तन हरित म्हणजेच पर्यावरणपूरक यांत्रिक नौकांमध्ये अर्थात पर्यावरण पूरक इंधनावर चालणाऱ्या नौकांमध्ये करण्याचा उपक्रम सुरु करुन, त्या माध्यमातून 2030 पर्यंत हरीत अर्थात पर्यावरण-स्नेही जहाज बांधणीचं जागतिक महाकेंद्र बनण्याचं भारताचे उद्दिष्ट आहे, असं केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे.
हरयाणात गुरुग्राम इथे भारतातील पहिल्या नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इन ग्रीन पोर्ट अँड शिपिंग, या हरीत म्हणजेच पर्यावरण पूरक बंदर आणि नौवहन राष्ट्रीय सर्वोत्कृष्टता केंद्राचं उद्घाटन करताना ते म्हणाले की हा कार्यक्रम, ग्रीन हायब्रीड प्रोपल्शन प्रणाली, म्हणजेच दोन्ही प्रकारच्या इंधनांवर चालणाऱ्या 'ग्रीन हायब्रिड टग्स' ने सुरू होईल आणि दुसऱ्या प्रकारचं इंधन म्हणून मिथेनॉल, अमोनिया, हायड्रोजन यासारख्या जीवाश्मेतर इंधनांचा उपयोग करता येईल.
सर्व प्रमुख बंदरांमध्ये या ग्रीन टगचा वापर 2025 पर्यंत सुरु करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती सोनोवाल यांनी दिली. सर्व टग्जपैकी किमान 50 टक्के टग्ज, 2030 पर्यंत ग्रीन टग्ज मध्ये परिवर्तीत होणं अपेक्षित आहे, त्यामुळे देश शाश्वत विकास साधण्याच्या दिशेनं वाटचाल करत असताना, त्यासाठी पूरक ठरणाऱ्या कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट होईल, असही ते म्हणाले.
भारत G20 चं अध्यक्षपद भूषवत असतानाच, स्वच्छ, हरित पर्यावरणाच्या दिशेनं सरकारचा एक प्रमुख प्रयत्न म्हणून या उपक्रमांची घोषणा करताना आपल्याला खूप आनंद होत आहे असं सोनोवाल म्हणाले. आपल्याकडे प्रचंड व्यावसायिक क्षमता असल्यामुळे, 2030 पर्यंत पर्यावरण स्नेही जहाज बांधणीचं जागतिक केंद्र बनण्याची आशा आपण बाळगतो आणि असं करत असतानाच दुसरीकडे त्याचवेळी प्रदूषण मुक्त हरीत जग निर्माण करण्याच्या ध्येयाप्रती आपण पूर्णपणे वाहून घेतलं आहे, असही सोनोवाल यांनी स्पष्ट केलं.
* * *
S.Kane/A.Save/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1909676)
Visitor Counter : 242