संरक्षण मंत्रालय
आफ्रिका-भारत संयुक्त सराव AFINDEX पुणे येथे सुरू
Posted On:
21 MAR 2023 2:22PM by PIB Mumbai
पुणे, 21 मार्च 2023
भारत आणि आफ्रिका खंडातील 23 राष्ट्रांच्या दुसऱ्या संयुक्त क्षेत्र प्रशिक्षण (फिल्ड ट्रेनिंग) (AFINDEX- 2023) सरावाला आजपासून पुणे येथील औंध मधील परदेशी प्रशिक्षण विभागात प्रारंभ झाला. या प्रशिक्षण सरावात इथिओपिया, घाना, केनिया, लेसोथो, निजर, सेशेल्स, टांझानिया, युगांडा, झांबिया, बोत्सवाना, कॅमेरून, काँगो, इजिप्त, इस्वाटिनी/स्वाझीलंड, मलावी, नायजेरिया, रवांडा, सेनेगल, झिम्बाब्वे आणि मोरोक्को या राष्ट्रांच्या तुकड्या आणि प्रतिनिधी सहभागी होत आहेत. डेझर्ट कोअरचे कोअर कमांडर लेफ्टनंट जनरल राकेश कपूर यांनी आज त्यांना संबोधित केले.
KSIL.JPG)
हा संयुक्त सराव, भारत आणि आफ्रिका यांच्यात 2008 मध्ये झालेल्या भारत - आफ्रिका शिखर परिषदेनंतर आफ्रिकेशी अधिकाधिक संपर्क कायम राखण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा भाग आहे. 2019 नंतर तो यावर्षी आयोजित करण्यात आला आहे. मानवतावादी दृष्टिकोनातून भुसुरूंग निकामी करणे आणि शांतता प्रस्थापित करणे ही या सरावाची संकल्पना आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता कायम राखण्याच्या कार्यात कार्यक्षमता आणि सज्जता यांच्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने सहभागी राष्ट्रांमधील लष्करी सहकार्य महत्वपूर्ण आहे.

शांतता आणि सुरक्षेत वाढ करण्यासाठी लक्ष केंद्रित करणे, नवनवीन कल्पना आणि अभिनव दृष्टिकोन यांची देवाणघेवाण करणे, सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यातील व्यवस्थापनाविषयी आफ्रिकेच्या अनुभवांचे अवलोकन करणे आणि या उपक्रमांमधून भारत-आफ्रिका यांच्यातील संबंध अधिक मजबूत करणे हा या सरावाचा उद्देश आहे.
हा सराव चार टप्प्यात विभागण्यात आला आहे. आरंभी, प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण दिले गेले. त्यानंतरच्या टप्प्यात आता मानवतावादी दृष्टिकोनातून भुसुरूंग विरोधी कारवाई करणे आणि शांतता प्रस्थापित करणे यासंबंधी प्रशिक्षण दिले जाईल, तर अंतिम टप्प्यात या सर्व प्रशिक्षणाच्या परिणामांची फलनिष्पत्ती समजण्यासाठी मूल्यमापन केले जाईल. सामरिक कवायती आणि कारवाई संयुक्तपणे करण्याची क्षमता हा या संयुक्त सरावाचा केंद्रबिंदू आहे.

याबरोबरच 28 ते 30 मार्च 2023 या कालावधीत लष्कर प्रमुखांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. या दरम्यान हे लष्कर प्रमुख संयुक्त सरावाची पाहणी करतील.

सरावा दरम्यान स्वदेशी उपकरणांचा अधिकाधिक वापर करण्यावर भर दिला जाईल. या सरावात भारतात उत्पादित झालेली अत्याधुनिक उपकरणे प्रदर्शित केली जातील ज्यामुळे सहभागी राष्ट्रांच्या सैन्याला त्यांच्या कार्यक्षमतेचा अनुभव येईल. या सरावामुळे आफ्रिका आणि भारतामधील प्रादेशिक ऐक्य वाढीस लागेल तसेच सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास (SAGAR) हे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले जाईल.
M.Iyengar/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1909077)
Visitor Counter : 133