अणुऊर्जा विभाग
स्टार्ट अप उद्योजकांसाठी ‘विचार व विकासार्थ- सुका आणि ओला कचरा व्यवस्थापन तंत्रज्ञान’ या विषयावर अटल इन्क्युबेशन सेंटर, बी ए आर सी ने आयोजित केली कार्यशाळा
Posted On:
13 MAR 2023 7:28PM by PIB Mumbai
मुंबई, 13 मार्च 2023
अटल इन्क्युबेशन सेंटर(AIC) -भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) तर्फे डी ए इ कन्व्हेंशन सेंटर, अणुशक्तीनगर, मुंबई - 400094 येथे स्टार्ट अप उद्योजकांसाठी शुक्रवार,10 मार्च 2023 रोजी एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. AIC-BARC ची स्थापना अटल इनोव्हेशन मिशन (AIM), नीती आयोग च्या अंतर्गत करण्यात आली असून, अणुऊर्जा विभागाने शोधलेल्या तंत्रज्ञानाच्या आधारे स्टार्ट अप परिसंस्थेच्या विकासासाठी पोषक वातावरण तयार करणे, हा त्यामागचा हेतू आहे. ए आय सी - बी ए आर सी चे कामकाज 22 डिसेम्बर 2022 रोजी सुरु झाले. त्या दिवशी भाभा अणु संशोधन केंद्र(BARC)च्या स्पिन ऑफ तंत्रज्ञानाच्या विचार व विकासासाठी (incubation)चार उद्योगांसोबत करार करण्यात आले.

पंतप्रधानांनी घोषित केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाच्या अंतर्गत व त्यानंतर अर्थमंत्र्यांनी 17 मे 2020 रोजी घोषित केलेल्या अणुऊर्जा क्षेत्रातील सुधारणांच्या अनुषंगाने ए आय सी - बी ए आर सी ची स्थापना करण्यात आली. तंत्रज्ञान विषयातील उद्योजक व सरकारी संशोधन संस्था यांच्यात समन्वय साधण्याच्या हेतूने अणुऊर्जा विभागाने स्थापन केलेल्या इन्क्युबेशन केंद्रांपैकी ए आय सी - बी ए आर सी हे एक केंद्र आहे.
विज्ञान/अभियांत्रिकी/वाणिज्य शाखेत अंतिम वर्षाला असलेल्या किंवा पदवीपूर्व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. सहभागासाठी उत्तम प्रतिसाद मिळाला आणि 150 विद्यार्थी या कार्यशाळेत प्रत्यक्ष सहभागी झाले होते. या कार्यशाळेत ओल्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी ‘शेष’या नावाचे तंत्रज्ञान , तर सुक्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी त्वरित बायो कंपोस्टिंग तंत्रज्ञानाची ओळख बी ए आर सी च्या विशेषज्ञांनी करून दिली, तसेच त्यांचे उद्योग प्रारूपही सादर केले. अणुशक्तीनगर परिसरात ‘शेष’ व ‘त्वरित बायो कंपोस्टिंग’ या दोन्ही तंत्रज्ञानाचा वापर करून चालवली जाणारी कचरा व्यवस्थापन केंद्रे पाहण्याची संधी या सहभागींना मिळाली. भारत सरकारच्या 'स्वच्छ भारत मिशन' मध्ये योगदान देणे हा या तंत्रज्ञानाच्या विकासामागील मुख्य उद्देश आहे. याशिवाय, या तंत्रज्ञानाद्वारे कचऱ्याचे विघटन होताना निसर्गाचा जैव- भू -रासायनिक समतोल राखला जातो, तसेच मातीतील पोषक द्रव्ये पुन्हा मातीत मिसळली जातील यावर भर दिला जातो.

‘शेष’ ही एक छोटेखानी सर्पाकार कचरा व्यवस्थापन प्रणाली आहे. छोट्या गृहनिर्माण संस्था अथवा उपाहारगृहात तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट तिथेच स्वयंपूर्ण पद्धतीने लावली जाऊ शकते. यामुळे कचरा व्यवस्थापन यंत्रणेचे विकेंद्रीकरण होईल. या यंत्रणेत कचऱ्याच्या उत्तम व्यवस्थापनाबरोबरच चांगल्या प्रतीचे इंधन व मातीची प्रत सुधारणारे खत मिळण्याची क्षमता आहे. या यंत्रणेच्या सर्पासारख्या आकारामुळे याला ‘शेष’ असे नाव दिले गेले आहे. याशिवाय संस्कृत भाषेत ‘शेष’ या शब्दाचा अर्थ उरले-सुरले असाही होतो.

त्वरित कंपोस्ट करणारे तंत्रज्ञान Trichoderma Koningiopsis नावाच्या एका बुरशीवर आधारित आहे. हि बुरशी झाडाच्या सालीपासून मिळते. मानवी हाताळणीसाठी व पर्यावरणासाठी ती सुरक्षित आहे. या तंत्रज्ञानाद्वारे स्वयंपाकघरातील ओला कचरा, बागेतील, देवळातील तसेच कृषिजन्य कचऱ्यावर प्रक्रिया करता येईल. ही पद्धत पूर्णतः वायुजीवी (एरोबिक )असल्यामुळे दुर्गंधीमुक्त आहे, त्यामुळे सर्व ठिकाणी वापरण्यायोग्य आहे.
कार्यशाळेच्या शेवटी झालेल्या प्रश्नोत्तराच्या तासात उदयोन्मुख उद्योजकांनी बी ए आर सी च्या तज्ज्ञांशी उत्तम रित्या संवाद साधला. या कार्यशाळेच्या यशामुळे येत्या काही वर्षांत अनेक स्टार्ट अप पुढे येतील अशी अपेक्षा आहे.
S.Kane/U.Raikar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1906556)
Visitor Counter : 205