माहिती आणि प्रसारण मंत्रालय
कोल्हापूरमधील बहुमाध्यम प्रदर्शनाची सांस्कृतिक कार्यक्रमाने सांगता
महिला उद्योजिकांसाठी कार्यशाळा, कायदेविषयक साक्षरता आणि करियर मार्गदर्शनासारख्या कार्यक्रमांना उत्तम प्रतिसाद
केंद्रीय संचार ब्युरो, कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद कोल्हापूर यांचा संयुक्त उपक्रम
Posted On:
12 MAR 2023 7:57PM by PIB Mumbai
कोल्हापूर, 12 मार्च 2023
पत्रसूचना कार्यालय, मुंबई आणि केंद्रीय संचार ब्युरोने संयुक्तरित्या कोल्हापूर इथे आयोजित केलेल्या मल्टीमीडिया म्हणजेच बहुमाध्यम प्रदर्शनाचा आज शाहीर रंगराव पाटील यांच्या पोवाड्याच्या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाने समारोप झाला.

या पाच दिवसीय कार्यक्रमाला आणि प्रदर्शनाला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी, उद्घाटन सत्रात, माणदेशी फाऊंडेशन च्या कार्यक्रम संचालिका अपर्णा सावंत यांनी वित्तीय आणि डिजिटल साक्षरतेवर एक कार्यशाळा घेतली. माणदेशी फाउंडेशन, उपेक्षित, वंचित महिलांच्या आर्थिक उत्थानासाठी कार्यरत संस्था आहे. माणदेशी फाऊंडेशनच्या या कार्यशाळेत बचत आणि बँकिंग या विषयाचे मूलभूत बारकावे समजावून सांगण्यात आले. महिला उद्योजिकांनी आपले अनुभव यावेळी मांडले आणि प्रदर्शन तसेच प्रशिक्षण बसला भेटही दिली. माणदेशी फाऊंडेशनचे उद्घाटन सत्र आणि प्रशिक्षण कार्यक्रम करण्यासाठी इथे क्लिक करा.

या कार्यक्रमात प्रकाशन विभागाने लावलेल्या पुस्तक प्रदर्शनाला अनेक पुस्तकप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
शालिनी पॅलेस समोर, रंकाळा तलाव इथे हे प्रदर्शन लोकांसाठी 8 मार्च ते 12 मार्च 2023 हे पाच दिवस सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत खुले होते. या प्रदर्शनाचा उद्देश होता भारतातला स्वातंत्र्य लढा, वैज्ञानिक, उद्योजक अशा विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांबद्दल माहिती देऊन प्रेक्षकांना प्रोत्साहित करणे. प्रदर्शनात महिला कल्याणाच्या विविध योजनांबद्दल माहिती देखील देण्यात आली. या प्रदर्शनात ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, डिजिटल क्विझ अशा बहुमाध्यम प्रकारांची रेलचेल होती.
ज्येष्ठ कायदेतज्ञ डॉ संतोष शाह यांनी 9 मार्च रोजी महिलांसाठी कायद्याचा प्रशिक्षण वर्ग घेतला.

प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी, सुप्रसिद्ध आणि जेष्ठ विधिज्ञ, डॉ. संतोष शाह यांनी, संपत्ती आणि वडीलोपार्जित मालमत्तेविषयीचे कायदे यावर मार्गदर्शन केले. या सत्राला समाजातील दुर्लक्षित वर्गाच्या 100 पेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या. मालमत्तेबाबत महिलांचे मूलभूत अधिकार, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांचा वारसाहक्क नेमका कसा असतो, याविषयी महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मृत्यूपत्र तयार करण्याचे महत्त्व आणि त्याची प्रक्रिया देखील सोप्या शब्दांत सांगण्यात आली. तसेच या सत्रात, महिलांच्या संरक्षणासाठी संविधानात असलेल्या तरतुदी आणि POSH सारखे कायदे, यांचीही माहिती देण्यात आली.यानंतर झालेल्या प्रश्नोत्तरे सत्रात, शेतजमीनीवरील अधिकारासंदर्भातले अधिकार तसेच स्वयंसहाय्यता बचत गटांशी संबंधित कायदे अशा विषयावर महिलांनी विचारलेल्या शंकांचे वकिलांनी निरसन केले. या संपूर्ण सत्राद्वारे महिलांना त्यांच्या कौटुंबिक संपत्तीवरील आणि स्वअर्जित मालमत्तेवरील अधिकारांचा दावा कसा करता येईल हे सोप्या पद्धतीने समजून घेण्याची संधी मिळाली.
एकलव्यच्या पुनम ढोबळे यांनी 11 मार्च रोजी विद्यार्थ्यांना ‘व्यावसायिक कारकीर्द (करियर)’ यावर मार्गदर्शन केले आणि या मार्गदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय/ नोकरीच्या अगणित नव्या वाटा उलगडून दाखवल्या . त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला आणि परिचित अशा 3 - 4 क्षेत्रांव्यतिरिक्त इतर अनेक क्षेत्रांची माहिती दिली.
हे सत्र ऑनलाईन बघण्यासाठी इथे क्लिक करा.
रंगराव पाटील यांनी सादर केलेल्या पोवाड्याने आज या प्रदर्शनाची सांगता झाली. या पोवाड्याने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आणि महिला केंद्र विकासाबद्दल जनजागृतीही केली.
* * *
PIB Mumbai | N.Chitale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1906188)