युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
वर्ल्ड टेबल टेनिस स्टार कंटेंडर गोवा 2023 स्पर्धेच्या समारोप सोहळ्याला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक क्रीडा विश्वात आपला ठसा उमटवत आहे: केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री
Posted On:
05 MAR 2023 7:03PM by PIB Mumbai
पणजी येथे वर्ल्ड टेबल टेनिस स्टार कंटेंडर गोवा 2023 स्पर्धेच्या समारोप सोहळ्याला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर उपस्थित होते. वर्ल्ड टेबल टेनिस गोवा ही भारतात आयोजित केली जाणारी पहिली जागतिक टेबल टेनिस स्पर्धा आहे. पुरुषांच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या फॅन झेंडॉन्गसह अनेक सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाचे अध्यक्ष पेट्रा सोरलिंग देखील उपस्थित होते.
समारोप सोहळ्यात बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, गोवा आणि भारत या दोघांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे कारण देशात प्रथमच जागतिक टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा विश्वात भारताने केलेल्या प्रगतीतील हा आणखी एक मैलाचा दगड असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली क्रीडा विषयक पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षणासाठीच्या तरतुदीत मोठी वाढ झाल्याचा उल्लेख केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला. पालकांनी मुलांना केवळ पाठ्यपुस्तकांच्या जगापुरते सीमित न ठेवता मुलांना खेळण्यासाठी अधिक प्रोत्साहन द्यावे असे सांगत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
वांग यिदी हिला महिला एकेरी अजिंक्यपदाचा पुरस्कार त्यांनी प्रदान केला. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या वांग यिदी या चीनच्या खेळाडूने अंतिम फेरीत चेंग आय-चिंगचा 4-0 असा पराभव केला. या स्पर्धेत अनेक धक्कादायक निकाल पहायला मिळाले. पुरुषांच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या फॅन झेंडॉन्गला 32 व्या फेरीत 193 मानांकित चो देसेओंगकडून पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाचे विद्यमान अध्यक्ष प्रथमच भारतात आले.
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1904443)
Visitor Counter : 231