युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते 4 मार्च 2023 रोजी युवा उत्सव-इंडिया@2047 चा होणार प्रारंभ
देशभरातील 12 ठिकाणांसह महाराष्ट्रातील जळगाव येथे 4 मार्च 2023 रोजी युवा उत्सवाचे आयोजन
नेहरू युवा केंद्र संघटना 24 फेब्रुवारी ते 31 मे 2023 दरम्यान आयोजित करणार ‘युवा उत्सव’ आणि ‘युवा संवाद’
महाराष्ट्रातील सोळा जिल्ह्यांमध्ये कार्यक्रमाचा पहिला टप्पा 4 ते 31 मार्च 2023 दरम्यान करणार आयोजित
Posted On:
03 MAR 2023 5:47PM by PIB Mumbai
युवा शक्तीच्या चैतन्यातून 'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव' साजरा करण्यासाठी, नेहरू युवा केंद्र संघटना (एनवायकेएस), केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, 24 फेब्रुवारी 2023 ते 31 मे 2023 दरम्यान 'युवा उत्सव' आणि 'युवा संवाद' आयोजित करत आहे. नेहरू युवा केंद्र संघटनेच्या वार्षिक कृती योजनेच्या सहा युवा केंद्रीत कार्यक्रमांना एकत्रित करणारा अधिक विस्तारित एकछत्री कार्यक्रम आहेत. युवा उत्सव-इंडिया@2047 चा औपचारिक प्रारंभ 4 मार्च 2023 रोजी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा व माहिती आणि प्रसारण मंत्री, अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते, पंजाबमधल्या रोपर येथून केला जाईल. त्याचबरोबर, महाराष्ट्रातील जळगावसह इतर बारा ठिकाणी 4 मार्च 2023 रोजी युवा उत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. केंद्रीय मंत्री युवा उत्सवाच्या डॅशबोर्डचाही प्रारंभ करतील.
युवा उत्सवाच्या पहिल्या टप्प्याची ही सुरुवात आहे. या अंतर्गत देशभरातील 150 जिल्हे 4 मार्च ते 31 मार्च 2023 या कालावधीत युवा शक्तीचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि भारताच्या वसुधैव-कुटुंबकम या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा भाग बनण्यासाठी युवा उत्सव आयोजित करतील.
युवा उत्सवाचा एक भाग म्हणून, तरुण कलाकार, लेखक, छायाचित्रकार, वक्ते, पारंपरिक कलाप्रकारांचे अभ्यासक आणि सक्रिय क्लब सदस्य भारताचा समृद्ध वारसा, संस्कृती आणि मूल्ये सार्वजनिक प्रवाहाच्या केंद्रस्थानी आणून तळागाळापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत चळवळीचे नेतृत्व करतील. 15 ते 29 वयोगटातील युवक जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होऊन प्रत्येक स्तरावरील विजेते पुढील स्तरात प्रवेश करतील. जिल्हास्तरावरील विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. जिल्हा स्तरावरील विजेते युवा उत्सवाच्या राज्य स्तरात सहभागी होतील. हा दोन दिवसांचा कार्यक्रम राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी, ऑगस्ट ते सप्टेंबर 2023 दरम्यान नियोजित आहे सर्व राज्यस्तरीय कार्यक्रमांचे विजेते दिल्ली येथे ऑक्टोबर 2023 च्या 3ऱ्या किंवा 4 थ्या आठवड्यात नियोजित राष्ट्रीय स्तरावरील युवा उत्सवात सहभागी होतील.
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय युवा दिन समारंभाचा एक भाग म्हणून 12 ऑगस्ट 2022 रोजी राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या युवा संवादाच्या धर्तीवर, युवा संवाद- भारत @ 2047 देशभरात आयोजित केला जात आहे. 'संवाद' ही प्रतिष्ठित व्यक्तींच्या नेतृत्वाखालील तरुणांमध्ये घडवण्यात येणारी असंरचित चर्चा असेल. चर्चेनंतर प्रश्नोत्तराचे सत्र होईल. प्रत्येक जिल्ह्यात जास्तीत जास्त तीन कार्यक्रम आयोजित केले जातील आणि प्रत्येक कार्यक्रमात सुमारे 500 सहभागी असतील. युवा संवादाची एका वाक्यात व्याख्या सांगायची तर ती अशी - “युवकांसाठी, युवकांकडून, युवकांचा”. अशी केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2022 रोजी लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान घोषित केलेल्या पंचप्राण (पाच संकल्प) या संकल्पनेवर युवा संवाद भारत @ 2047 मधील संवाद आणि चर्चा आधारित असेल. हे पंचप्राण आहेत - (1) विकसित भारताचे ध्येय (2) राष्ट्रीय एकता आणि एकजूट (3) वसाहतवादी मानसिकतेची कोणतही खूण राहू देऊ नका (4) नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना (5) आपल्या वारशाचा आणि संस्कृतीचा अभिमान बाळगा.
महाराष्ट्रातील युवा उत्सव सोहळ्याचे उद्घाटन जळगाव जिल्ह्यात 4 मार्च 2023 रोजी होणार आहे. या कार्यक्रमाला खासदार उन्मेष पाटील हे प्रमुख पाहुणे असतील.
मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 5 मार्च 2023 रोजी युवा महोत्सवाला सुरुवात होणार आहे. मुंबईत हा कार्यक्रम बोरिवलीतील नामदार गोपाळ कृष्ण गोखले विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे होणार आहे. बोरिवली सांस्कृतिक केन्द्र आणि पार्थ इंडिया स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नेहरू युवा केंद्र, मुंबई, केन्द्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. केंद्रीय दळणवळण विभाग, प्रादेशिक कार्यालय, पुणे, माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांच्यातर्फे, या ठिकाणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि बदलत्या भारताची आठ वर्षे या विषयावर प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. यावेळी जिल्हास्तरीय युवा उत्सवातील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर होणार आहेत. या कार्यक्रमाला खासदार गोपाळ शेट्टी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यामधे मार्च महिन्यात पहिल्या टप्प्यातील युवा उत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. जळगाव, सोलापूर, मुंबई, सिंधुदुर्ग, अमरावती, बीड, जालना, नागपूर, धाराशिव, रत्नागिरी, सांगली, सातारा, परभणी, गोंदिया, हिंगोली आणि ठाणे या जिल्ह्यांचा यात सामावेश आहे. आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, खादी आणि ग्रामोद्योग आयोग, नाबार्ड, कृषी विज्ञान केंद्रे आणि इतर सार्वजनिक तसेच खाजगी भागधारक यांच्या सहकार्याने कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात त्यांचे स्टॉल देखील लावण्यात येणार आहेत.
विविध कार्यक्रमांमध्ये तरुणांना सहभागी करून देशभक्ती आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची मूल्ये पुन्हा जागृत करणे हा युवा उत्सव आणि युवा संवाद उपक्रमांचा उद्देश आहे. ‘युवा शक्ती’चे दर्शन घडवण्यात आणि देशातील तरुणांमध्ये ‘पंच प्राण’ या पाच संकल्पांना बळकट करण्यास यामुळे मदत होईल. भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनाच्या या भव्य सोहळ्यासाठी “युवा शक्तीतून जनभागीदारी” ही प्रेरक शक्ती असेल.
***
S.Bedekar/S.Kakade/V.Ghode/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1903947)
Visitor Counter : 381