सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाअंतर्गत, विविध कायदे, नियम आणि शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या दोन दिवसीय कार्यशाळेचे पुण्यात आयोजन


समाजातील दुर्बल घटकांच्या पुनरुत्थानासाठी असलेल्या योजनांच्या यशस्वी अंमलबजावणी साठी राज्य सरकारे आणि स्वयंसेवी संस्था यांचे सहकार्य आवश्यक- सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री, डॉ वीरेन्द्र कुमार यांचे उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन

Posted On: 28 FEB 2023 6:00PM by PIB Mumbai

मुंबई/पुणे, 28 फेब्रुवारी 2023

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाशी संबंधित कायदे, नियम आणि योजनांची माहिती लोकांना देण्यासाठी, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने,  महाराष्ट्र राज्य सरकारच्या सहकार्याने पुण्यात आजपासून म्हणजेच 28 फेब्रुवारी 2023 ते 1 मार्च 2023 पर्यंत  दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत देशभरातील 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते आज  दूरदृश्यप्रणालीद्वारे कार्यशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आणि सहभागी राज्य सरकारांचे विविध मंत्री उपस्थित होते.

यावेळी डॉ. वीरेंद्र कुमार म्हणाले,“सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागामार्फत अनुसूचित जाती, मागासवर्गीय, ज्येष्ठ नागरिक आणि समाजातील अशा इतर वंचित घटकांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. या सर्व योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारे आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे सहकार्यही तेवढेच आवश्यक आहे.” स्वच्छ आणि सुदृढ भारताच्या उभारणीसाठी प्रत्येकाने एकत्रित जबाबदारी उचलायला हवी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.देशातील सर्व नागरिकांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी काम करण्याचा निश्चय त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, “या कार्यशाळेच्या आयोजनामागचा उद्देश, अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीयांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे हा आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना आणि अभियानांवर चर्चा करून त्याद्वारे  ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य सुखकर करणे हा  या कार्यशाळेचा उद्देश आहे.”

शिष्यवृत्तीच्या मदतीने परदेशात शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरण आठवले यांनी यावेळी दिले. ते म्हणाले, “छत्रपती शाहू महाराज आणि सयाजी गायकवाड महाराज यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीच्या आधारावर, वयाच्या एकविसाव्या वर्षी बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी जाऊ शकले. तिथल्या लेहमन वाचनालयात ते 18 तास तास अभ्यास करत असत. आज त्याच लेहमन वाचनालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. ज्ञान मिळवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी कठीण परिश्रम केले. त्याचप्रमाणे, आपल्या कुटुंबाच्या समृद्धीसाठी आणि देशाच्याही विकासासाठी आपण देखील शिक्षणावर भर द्यायला हवा,” असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला.

विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून या कार्यशाळेसाठी आलेले प्रतिनिधी इथे योजनांच्या अंमलबजावणीशी संबंधित विविध मुद्यांवर सखोल आणि सविस्तर चर्चा करतील, ज्यामुळे योजनांची अधिक चांगली अंमलबजावणी होऊ शकेल, अशी आशा आठवले यांनी यावेळी व्यक्त केली. “या चर्चेनंतर प्रतिनिधींनी दिलेल्या सूचना आणि शिफारसीचे स्वागत केले जाईल” असेही ते पुढे म्हणाले.

या दोन दिवसीय कार्यशाळेत भारत सरकारच्या विविध योजना,  प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना (PM-AJAY), अटल वयो- अभ्युदय योजना, नमस्ते योजना, अनुसूचित जातींसाठी मॅट्रिकपूर्व आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, अंमली पदार्थांची मागणी घटावी यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा आणि नशामुक्त भारत अभियान आणि इतर योजनांवर मंत्रालयाचे अधिकारी सादरीकरण करणार आहेत.  त्याशिवाय, ज्येष्ठ नागरिक, हाताने मैला उचलणारे कामगार , तृतीयपंथी आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यासारख्या दुर्बल  घटकांच्या कल्याणासाठी सरकारने केलेल्या कायद्यांविषयी देखील कार्यशाळेत चर्चासत्रे होणार आहेत.या सर्व दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी,  विविध राज्यांत वापरल्या जाणाऱ्या उत्तम पद्धतींची देवघेव इथे होईल, ज्याचा फायदा इतर राज्यांनाही होऊ शकेल. या कार्यशाळेत सांस्कृतिक मेजवानी आणि शेवटी समारोप सत्र होईल.

ही कार्यशाळा विविध राज्य सरकारे आणि संलग्न संस्थांना, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या विविध योजना आणि कार्यक्रम उत्तम प्रकारे समजून घेण्यासाठी आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल, अशी अपेक्षा आहे.

 


N.Chitale/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai
   


(Release ID: 1903112) Visitor Counter : 515


Read this release in: English