महिला आणि बालविकास मंत्रालय

केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी भारताच्या अध्यक्षतेखालील W20 मधील पाच प्राधान्य क्षेत्रे नमूद केली, तळागाळापर्यंत महिला नेतृत्व, महिलाप्रणित उद्योग आणि कृषी क्षेत्रात महिलांचे कौशल्य , डिजिटल दरी सांधणे , शिक्षण आणि कौशल्य विकास आणि हवामानानुसार कृतीत बदल घडवणाऱ्या महिला आणि मुली यांचा यात समावेश आहे


महिला केवळ लाभार्थी राहू नयेत , महिलांची नेतृत्व क्षमता विकसित करणे ही जागतिक समृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाची दीर्घकालीन गुंतवणूक आहे: जी -20 शेर्पा अमिताभ कांत

W-20 ची दोन दिवसीय प्रारंभिक बैठक छत्रपती संभाजी नगर येथे सुरु

Posted On: 27 FEB 2023 10:50PM by PIB Mumbai

: छत्रपती संभाजी नगर,,  27 फेब्रुवारी , 2023

छत्रपती संभाजी नगर (पूर्वीचे औरंगाबाद) येथे वुमेन -20 (W-20) च्या प्रारंभिक बैठकीत प्रतिनिधींना संबोधित करताना, केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी भारताच्या अध्यक्षतेखाली W20 मधील पाच प्राधान्य क्षेत्रे नमूद केली.  तळागाळापर्यंत  महिला नेतृत्व, कृषी क्षेत्रात महिलाप्रणित उद्योग  आणि  महिलांचे कौशल्य , डिजिटल दरी सांधणे , शिक्षण आणि कौशल्य विकास आणि हवामानानुसार कृतीत बदल घडवणाऱ्या  महिला आणि मुली यांचा यात समावेश आहे

जगाच्या विविध भागांतून आलेल्या  W-20 सदस्य प्रतिनिधींचे स्वागत करताना केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री म्हणाल्या , "W20 चे नेतृत्व आणि योगदान महत्वपूर्ण आहे,  कारण W20 सदस्य प्रतिनिधींच्या आगमनामुळे जगभरातील  महिलांना विविध प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत.

W-20 च्या निमित्ताने जगभरातील सर्वोत्कृष्ट विचारांचे प्रतिनिधी एकत्र आले असून प्रत्येक देशातील सर्वोत्तम पद्धती वापरून अधिकाधिक महिलाप्रणित उद्योग उभारणे , कृषी क्षेत्रातील  महिला, आरोग्य क्षेत्रातील महिलांच्या गरजा आणि  शिक्षण आणि विशेषतः कौशल्य या बाबतीत महिलांना  मार्गदर्शन करू शकतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.   तसेच समानतेसाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.  त्याचबरोबर सरकार आणि इतर भागधारक संघटना यांच्याबरोबर जगभरातील महिलांच्या सहभागाच्या कक्षा कशा विस्तारायच्या  यावर विचारमंथन करण्याचे आवाहन त्यांनी W-20 सदस्यांना केले.

महिलांना दुर्लक्षित  ठेवू नये  , महिलांनी केंद्रस्थानी असायला हवे कारण जगाला विविध समस्यांवर उपाय हवे आहेत अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  G-20 च्या बैठकीत मांडल्याचे स्मरण केंद्रीय मंत्र्यांनी करून दिले.  भारतातील महिलांसाठी हाती घेण्यात आलेल्या  धोरणात्मक कृतींबद्दल बोलताना, त्यांनी सांगितले की जगभरातील तीस लाख  महिला ज्या तळागाळातील राजकीय पदांवर नियुक्त केल्या जातात , त्यापैकी 1.4 दशलक्ष महिला भारतातील आहेत.

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज लाभार्थ्यांमध्ये  230 दशलक्ष महिला आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. भारतातील सुमारे 100 दशलक्ष महिला कृषी क्षेत्रातील कामगार वर्गाचा भाग आहेत, असेही त्या म्हणाल्या. भारताच्या नव्या शैक्षणिक धोरणात लिंग समावेशी निधीची तरतूद करण्यात आली आहे, असे मंत्र्यांनी सांगितले.  पंतप्रधानांनी 2014 मध्ये डिजिटल इंडियासाठी कृती करण्याचे आवाहन केले होते असे सांगत, भारतातील 220 दशलक्ष महिलांची बँक खाती आहेत आणि त्यापैकी बहुतेक महिला स्वतःचे खाते डिजिटल पद्धतीने वापरतात  तर 20 दशलक्षाहून अधिक महिला साक्षर म्हणून डिजिटली  प्रमाणित असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. 

हवामान कृतीसाठी आमूलाग्र बदल घडवण्याच्या दृष्टीने डब्ल्यू-20 महिलांवर लक्ष केंद्रित करत असल्याबद्दल आणि प्राधान्य क्षेत्र म्हणून त्याकडे पाहत असल्याबद्दल केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्र्यांनी प्रशंसा केली. तसेच हवामान कृती आणि हवामान विषयक वित्त पुरवठा हा महिला अजेंडा बनवण्याची गरज अधोरेखित केली.  तसेच हवामान बदलामुळे बाधित महिलांना मदत करण्यासाठी फर्स्ट रिस्पॉन्सर्स फ्रेमवर्क अर्थात सर्वप्रथम प्रतिसाद देणारा आराखडा विकसित करण्यावर विचारमंथन करण्याचे आवाहन देखील केले.

जी -20 शेर्पा अमिताभ कांत, वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, आमदार अतुल सावे, संदीपनराव भुमरे, W20 च्या संस्थापक अध्यक्ष डॉ. गुलदेन तुर्कतान, W-20 च्या अध्यक्ष डॉ. संध्या पुरेचा आणि W-20 च्या मुख्य समन्वयक धरित्री पटनायक यांच्यासह W-20 सदस्य देशांचे सदस्य, अतिथी देशांचे प्रतिनिधी आणि विशेष निमंत्रित यावेळी उपस्थित होते.

कोविड नंतरच्या काळात जग आव्हानात्मक काळातून जात आहे आणि त्याचा विकास, प्रगती तसेच समृद्धीवर परिणाम झाला आहे, असे जी -20 चे भारताचे शेर्पा अमिताभ कांत यावेळी बोलताना म्हणाले. भारताच्या जी -20 अध्यक्षपदाच्या काळात या संदर्भात शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. "महिला आणि मुले गरिबीने सर्वात जास्त पीडित असतात. म्हणूनच, महिलांनी केवळ लाभार्थी राहू नये तर त्यांनी विकास घडवून आणणाऱ्या  नेत्या म्हणून उदयाला यावे हा मुख्य उद्देश असल्याचे अमिताभ कांत म्हणाले. जागतिक समृद्धीसाठी महिलांच्या क्षमता विकसित करण्यासाठी डब्ल्यू 20 कडे मोठ्या स्तरावर आणि महत्त्वाच्या दृष्टीकोनातून पाहिले जात आहे, असे त्यांनी सांगितले. नेत्या म्हणून महिलांच्या क्षमता विकसित करणे ही जागतिक समृद्धीसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दीर्घकालीन गुंतवणूक आहे, असेही ते म्हणाले.

केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत किशनराव कराड यांनी ऐतिहासिक औरंगाबाद शहरात डब्ल्यू -20 सदस्य, अतिथी आणि विशेष निमंत्रितांचे स्वागत केले. केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी महिलांसाठी लाभदायक  प्रधानमंत्री जन धन योजना, मुद्रा योजना यासारख्या केंद्र सरकारच्या योजनांची माहिती दिली.

भारताचे जी -20 अध्यक्षपद हे सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृतीभिमुख असेल या  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेप्रति  डब्ल्यू -20 भारत वचनबद्ध आहे, असे डब्ल्यू 20 च्या अध्यक्ष डॉ. संध्या पुरेचा आपल्या स्वागतपर भाषणात म्हणाल्या. जिथे प्रत्येक महिला सन्मानाने जगेल आणि महिलांच्या नेतृत्वाखाली विकासातील सर्व अडथळे दूर करणे शक्य असेल, असे समानतेचे आणि नि: पक्षपाती जग निर्माण करणे हे डब्ल्यू 20 भारताचे ध्येय आहे, असे त्यांनी सांगितले. डब्ल्यू -20 भारताने आपली ध्येय आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सहयोग, सहकार्य, एकमत निर्माण करण्यासाठी संवाद  आणि कृती करण्याचे आवाहन या 4 धोरणाचा अवलंब केला आहे, असेही त्या म्हणाल्या.

जी -20 नेत्यांचे घोषणापत्र आणि जी 20 संप्रेषणावर प्रभाव टाकणे तसेच महिला उद्योजकांसोबत सक्रिय सहभागॅस सहमती निर्माण करण्यासाठी पावले उचलणे आणि लिंग समानता वाढवणाऱ्या धोरणांप्रति वचनबद्धता आणि  महिला विकासाचा अजेंडा जी-20 च्या केंद्रस्थानी ठेवण्यावर  डब्ल्यू -20 मध्ये भर दिला जाणार आहे.

***

Sushama Kane/Sushama Kane/Shradhha

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1902949) Visitor Counter : 126


Read this release in: English