युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
चौदाव्या राष्ट्रीय आदिवासी युवा आदानप्रदान कार्यक्रमाला मुंबईत प्रारंभ
Posted On:
23 FEB 2023 7:24PM by PIB Mumbai
मुंबई, 23 फेब्रुवारी 2023
मुंबईत 21 फेब्रुवारी 2023 ते 27 फेब्रुवारी 2023 दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुल आणि आंतरराष्ट्रीय वसतिगृह येथे चौदाव्या राष्ट्रीय आदिवासी युवा आदानप्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नेहरू युवा केंद्र संघटना (एनवायकेएस), महाराष्ट्र आणि गोवा राज्य यांनी याचे आयोजन केले आहे.
केन्द्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय तसेच गृह मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने, सीआरपीएफ/एनडीआरएफ/आयटीबीपी/एसएसबी आणि एनवायकेएसचे 20 अधिकारी यांच्यासह भारतातील सहा आदिवासी बहुल राज्यांतील नऊ जिल्ह्यांमधले 200 आदिवासी युवक कार्यक्रमात सहभागी होत आहेत.
निवडक राज्ये आणि जिल्ह्यांतील आदिवासी युवकांना आपल्या देशातील विविधतेत एकता दर्शविणाऱ्या लोकांचे सांस्कृतिक आचार, भाषा आणि जीवनशैली समजून घेण्यासाठी विविध ठिकाणी भेट देण्याची संधी उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. देशाच्या विविध भागांमध्ये झालेल्या तंत्रज्ञान आणि औद्योगिक प्रगतीची माहिती युवकांना मिळवून देणे हे देखील त्याचे उद्दिष्ट आहे. शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधींबाबत जागरूकता निर्माण करण्यावर या कार्यक्रमाचा भर आहे.
मुंबई मुख्यालयाच्या डब्ल्यूएस कमांडंट इंद्राणी यादव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता रामभाई पाल, मुंबई विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाच्या प्राध्यापक आणि प्रमुख डॉ. वासंती खडीरावन, आणि महाराष्ट्र – गोवा एनकेवायएसचे राज्य संचालक प्रकाश कुमार मनुरे यांच्या हस्ते 22 फेब्रुवारी 2022 रोजी कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
सात दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात सहभागींना तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक सत्र आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. याशिवाय आदिवासी तरुणांना विधानसभा, विधान परिषद सचिवालय, मध्यवर्ती सभागृह, मंत्रालय, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, जहांगीर कलादालन, गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट, गिरगाव चौपाटी आदी महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.


देशभरातील आदिवासी युवक यात सहभागी होत आहेत, यामधे छत्तीसगड राज्यातील नारायणपूर, कांकेर, गुमला, गिरिध, छत्रा, झारखंड राज्यातील पश्चिम सिंहभूमी, तेलंगणा राज्यातील भद्राडी, कोठागुडेम, बिहारमधील जमुई आणि मध्य प्रदेशातील बालाघाट या प्रदेशातील युवकांचा समावेश आहे. या जिल्ह्यांतील कलाकार दररोज आपल्या समृद्ध प्रदेशातील पारंपरिक लोककलांवर आधारित सांस्कृतिक सादरीकरण करणार आहेत.
आपल्या मुक्कामादरम्यान युवकांनी राजभवनात महाराष्ट्राच्या राज्यपालांशी संवादही साधला. मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुल इथे 27 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
S.Kane/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1901820)
Visitor Counter : 197