सांस्कृतिक मंत्रालय
नऊ दिवस मुंबईकरांना देशाची समृद्ध संस्कृती आणि परंपरांचे विलोभनीय दर्शन घडवणाऱ्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाची आज सांगता
महोत्सवाच्या सांगता समारंभाला महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती
नीतीन मुकेश यांनी राष्ट्रीय संस्कृती महोत्सव 2023 च्या सांगता समारंभात आपले पिता, सुप्रसिद्ध गायक मुकेश यांना गायनातून वाहिली श्रद्धांजली
मुंबईत नऊ दिवस चाललेल्या या कार्यक्रमात, देशभरातील 350 लोककलाकार आणि आदिवासी कलाकारांनी आणि 300 स्थानिक लोककलावंतांनी विविध कलांच्या सादरीकरणातून रसिक प्रेक्षकांचे केले मनोरंजन
Posted On:
19 FEB 2023 9:19PM by PIB Mumbai
मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेल्या आझाद मैदानात, गेले नऊ दिवस चाललेल्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाची (RSM) आज सुप्रसिद्ध गायक नितीन मुकेश यांच्या गायनाने सांगता झाली. अत्यंत हृदयस्पर्शी अशा या गीतगायनातून त्यांनी आपले पिता, सुप्रसिद्ध गायक मुकेश यांना, त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष श्रद्धांजली वाहिली.
आजच्या समारोप समारंभाला महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 11 फेब्रुवारी, 2023 रोजी आझाद मैदानावर महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले होते.
देशभरातले सुमारे 350 लोककलावंत आणि आदिवासी कलाकारांसह सुमारे 300 स्थानिक लोककलाकार, काही तृतीयपंथी आणि दिव्यांग कलाकार यांच्यासह, प्रख्यात शास्त्रीय गायक-कलावंत आणि नामवंत सेलिब्रिटी कलाकारांनी गेल्या नऊ दिवसांत आपल्या प्रेरणादायी कला सादरीकरणाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या कलाकारांव्यतिरिक्त, देशभरातल्या सर्व राज्यांमधले 150 कारागीर आणि केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या सर्व सात क्षेत्रीय कला केंद्रातील कलाकारांनाही या महोत्सवात ‘आंगन’ या उपक्रमाअंतर्गत, त्यांची कला आणि हस्तकौशल्याच्या वस्तूंचे प्रदर्शन करण्यासाठी आमंत्रण देण्यात आले होते. या कलाकारांचे 70 स्टॉल्स प्रदर्शनात होते. तसेच महाराष्ट्र हातमाग विभाग आणि स्टार्टअपचे ही 25 स्टॉल या प्रदर्शनात होते.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय जनसंपर्क विभागाने देखील या महोत्सवात आपला एक स्टॉल लावला होता, यात, स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या अज्ञात नायकांची माहिती देण्यात आली होती.
महोत्सवात, आझाद मैदानावर फूड कोर्टही सुरु होते. इथे देशभरातील विविध खाद्यपदार्थांचे सुमारे 37 स्टॉल्स, स्थानिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स तसेच भरड धान्याचे खाद्यपदार्थ सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते.
महोत्सवाच्या रंगतदार उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय सांस्कृतिक कार्य आणि पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी होते तसेच राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पर्यटन, कौशल्य विकास, मंत्री मंगल प्रभात लोढा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील आणि केंद्रीय सांस्कृतिक व परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनीही या महोत्सवाला भेट दिली.
रोज संध्याकाळी शास्त्रीय, लोककला, समकालीन कला प्रकार आणि भारतभरातील कलाकारांचे कलाविष्कार सादर केले जात.
उद्घाटन समारंभात तेजस्विनी साठे आणि त्यांच्या पथकाच्या शास्त्रीय कथ्थक सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. ख्यातनाम गायक मोहित चौहान याने ‘तुमसे ही, 25 साल का सुरिला सफर’ हा कार्यक्रम सादर केला.
नागालँड कंझर्व्हेटरी ऑफ म्युझिक कॉयरच्या लिपोकमार त्झुदिर यांनी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पाश्चात्य आणि लोकसंगीताच्या सुंदर सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली.
दिग्गज संगीतकार आर.डी. बर्मन यांना संगीतमय श्रद्धांजली वाहणारा राज सोढा, किशोर सोढा आणि सिद्धार्थ एंटरटेनर्स यांनी सादर केलेला कार्यक्रम हे देखील महोत्सवाचे वैशिष्ट्य होते. प्रेक्षकांनी यावेळी भारतीय शास्त्रीय तसेच लोकप्रिय बॉलीवूड संगीताच्या हृदयस्पर्शी सादरीकरणाचा आनंद लुटला.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध गायक आनंद भाटे यांनी सुरेल गाण्यांच्या सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. शास्त्रीय आणि भक्तिसंगीताचा अप्रतिम संगम असलेले मराठी अभंग त्यांनी सादर केले. आपल्या दमदार आवाजाने आणि मोहित करणाऱ्या मंचावरील सादरीकरणाने आनंद भाटे यांनी प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली.
प्रसिद्ध अभिनेते अन्नू कपूर यांनी आपल्या भावस्पर्शी आवाजाने आणि नाविन्यपूर्ण शैलीने महोत्सवाच्या एका दिवशी भारतीय लोक संगीत आणि चित्रपट संगीताचे मर्म प्रेक्षकांपुढे उलगडले.
शिजीथ कृष्णा आणि चेन्नईच्या कलाक्षेत्र फाउंडेशन चमू यांच्या भरतनाट्यम सादरीकरणाला शास्त्रीय नृत्याच्या रसिकांनी मनापासून दाद दिली.
राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव 2023 च्या मंचावर सुप्रसिद्ध संगीतकार आणि लेखक डॉ. सलील कुलकर्णी हे देखील "माझे जगणे होते गाणे" या कार्यक्रमासाठी आले होते.
सांस्कृतिक देवाणघेवाणीद्वारे राष्ट्रीय एकता आणि अखंडतेला चालना देण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने नऊ दिवसीय राष्ट्रीय संस्कृती महोत्सव 2023 आयोजित केला होता. या रंगतदार सांस्कृतिक महोत्सवाने, भाषा आणि सांस्कृतिक अभिव्यक्तींमध्ये विविधता असूनही भारत एकसंध आणि एक आहे हे दर्शविणारा 'एक भारत श्रेष्ठ भारत' हा चिरस्थायी संदेश कायम ठेवला. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालया अंतर्गत सर्व सात विभागीय सांस्कृतिक केंद्रे आणि अकादमी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.
***
N.Chitale/R.Aghor/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1900638)
Visitor Counter : 140