वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
कृषी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने (APEDA) महाराष्ट्रात नाशिक इथे 37 वा स्थापना दिवस केला साजरा
Posted On:
14 FEB 2023 8:58PM by PIB Mumbai
मुंबई, 14 फेब्रुवारी 2023
अपेडा (APEDA), अर्थात कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण या संस्थेची स्थापना 1986 मध्ये झाली असून, ही संस्था वाणिज्य आणि उद्योग मंत्रालया अंतर्गत काम करते. या संस्थेने आपल्या 37 वर्षांच्या यशस्वी प्रवासात कृषी उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यात अभूतपूर्व यश मिळविले आहे.
आपला 37 वा स्थापना दिवस साजरा करण्यासाठी अपेडा (APEDA) च्या मुंबई शाखेने एफपीओ/एफपीसी, सहकारी संस्था, स्टार्टअप्स, महिला उद्योजक आणि निर्यातदार यांच्यासाठी, मेसर्स सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी, दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र इथे क्षमता विकास कार्यक्रम आणि व्यापार बैठकीचे आयोजन केले होते.
या प्रसंगी, मे. सह्याद्री फार्म्सने त्यांच्या सदस्यांसाठी आणि भागधारकांसाठी 19 पेटंट धारक आयात केलेल्या द्राक्षाच्या जाती, यशस्वी अंतर्गत चाचण्यांनंतर जारी केल्या आहेत. हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की मेसर्स सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी ही अपेडा (APEDA) मान्यताप्राप्त निर्यात सुविधा असून, यामध्ये उत्पादनाच्या विक्रीसाठी सुमारे 18000 पेक्षा जास्त शेतकरी जोडले गेले आहेत.
विविध आयातदार देशांद्वारे निर्धारित करण्यात आलेल्या अन्न सुरक्षा आणि त्याचा शोध याबाबतच्या नियमांचे महत्त्व लक्षात घेऊन, जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) करारांमध्ये नमूद केलेल्या वचनबद्धतेनुसार निर्यात बाजारासाठी सुरक्षित अन्न सुनिश्चित करण्यासाठी, भारत सरकारने 1986 मध्ये वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत संसदेच्या कायद्याद्वारे अपेडा (APEDA) ची स्थापना केली. अपेडाने विविध निर्यात प्रक्रिया आणि मानके विकसित केली आहेत.
अपेडाची ची सुरुवात 1987-88 मध्ये केवळ 0.6 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या निर्यातीसह झाली. संस्थेच्या सक्रीय हस्तक्षेपामुळे, एप्रिल-डिसेंबर 2022-23 पर्यंत कृषी उत्पादनांच्या निर्यातीने 19.69 अब्ज अमेरिकी डॉलर्सचा नवीन टप्पा गाठला. निर्यातीचे जाळे (बास्केट) 200 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरले आहे. 2021-22 मध्ये, अपेडाने ने 24.77 अब्ज अमेरिकी डॉलर्स किमतीची कृषी उत्पादने निर्यात केली.
अपेडा आपल्या आदेशानुसार बहुतेक सर्व उपक्रम राबवत आहे आणि त्याच्या 16 उत्पादनांच्या श्रेणींमध्ये वाटप केलेल्या कामा अंतर्गत प्रामुख्याने फळे आणि भाज्या, प्रक्रिया केलेली फळे आणि भाज्या, प्राणी, दुग्धजन्य आणि पोल्ट्री उत्पादने आणि तृणधान्ये यांचा समावेश आहे. अपेडाच्या निर्यात बास्केटमध्ये नुकताच, काजू आणि काजूपासून बनवलेल्या उत्पादनांचा समावेश करण्यात आला आहे. गेली 37 वर्षे, अपेडा 800 पेक्षा जास्त दर आकारणी श्रेणींमध्ये तडजोड करून उत्पादन सुरक्षितता आणि आपल्या सर्व उत्पादन श्रेणींच्या जागतिक जाहिरातीशी संबंधित आंतरराष्ट्रीय समस्या सातत्याने हाताळत आहे.
आतापर्यंत, एकूण 417 नोंदणीकृत जीआय (GI), अर्थात भौगोलिक संकेत धारक उत्पादने आहेत, आणि त्यापैकी सुमारे 150 GI टॅग केलेली उत्पादने कृषी आणि अन्न पदार्थ GI उत्पादने आहेत. त्यापैकी 100 पेक्षा जास्त नोंदणीकृत GI उत्पादने अपेडा अनुसूचित उत्पादनांच्या श्रेणीत येतात (तृणधान्ये, ताजी फळे आणि भाज्या, प्रक्रिया केलेले पदार्थ इ.).
भारतामधून निर्यात होत असलेल्या काही वांशिक आणि GI टॅग केलेल्या उत्पादनांमध्ये, ड्रॅगन फ्रूट, पेटंट धारक ग्रामीण भागातील तांदूळ, फणस, जांभूळ, बर्मीज द्राक्षे, वाळवलेली महुआ फुले आणि कुरमुरे, आंब्याचे GI वाण, GI मानांकित शाही लिची, भालिया गहू, मदुराई मल्ली, किंग चिली, मिहिदाना, सीताभोग, डहाणू घोलवड सापोता, जळगाव केळी, वाझाकुलम अननस, मरूर गूळ, मेघालयातील खासी मंदारिन (GI) या आणि इतर कृषी उत्पादनांचा समावेश आहे.
जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) व्यापार विषयक नोंदीनुसार, 1986 मध्ये भारत 25 व्या क्रमांकावर होता. हा क्रमांक 1987 मध्ये 28 व्या आणि 1988 मध्ये 29 व्या स्थानावर घसरला. तथापि, गेल्या तीन दशकांमध्ये भारताच्या क्रमवारीत लक्षणीय सुधारणा झाली असून, देशाचे स्थान 2019 मध्ये 10 व्या क्रमांकावर, 2020 मध्ये 9 व्या, तर 2021 मध्ये 8 व्या क्रमांकावर आले. अपेडाची 2021-22 मधील निर्यात (24.57 अब्ज अमेरिकी डॉलर्स) ही एकूण कृषी उत्पादनांच्या निर्यातीच्या जवळजवळ 50% इतकी असून, यामध्ये तृणधान्ये आणि ताज्या फळांची 61%, तृणधान्ये आणि विविध प्रक्रिया केलेल्या वस्तू 22% आणि प्राणी जन्य उत्पादनांची 17% निर्यात समाविष्ट आहे. ------------------------------------- कृषीविषयक उत्पादनांच्या निर्यातीला नव्या उंचीवर नेण्याच्या उद्देशाने अपेडा अर्थात कृषी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने भारतातून होणाऱ्या निर्यातीला चालना देऊन अधिक विकास साधण्यासाठी व्यापार करण्यातील सुलभता वाढवण्याच्या दृष्टीने माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संचालित उपक्रमांना प्रोत्साहन दिले आहे.
माहितीजालावर भारतीय भरड धान्यांना प्रोत्साहन देण्याच्या अभियानाचा भाग म्हणून, अपेडाने मिलेट्स पोर्टलची रचना, विकास आणि सुरुवात केली. तसेच भरड धान्यांच्या वापराला चालना देण्यासाठी अपेडाने भारतीय भरड धान्य विनिमय नामक स्वतंत्र पोर्टल देखील सुरु केले आहे. “श्री अन्न” म्हणजेच भारतीय भरड धान्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अपेडाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023 साजरे करताना, या प्राचीन पोषक धान्यांविषयी लोकसहभागाची भावना आणि जागरुकता निर्माण करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून अपेडा देशभरात विविध पूर्वतयारी कार्यक्रम तसेच उपक्रम राबवत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘व्होकल फॉर लोकल’ तसेच ‘आत्मनिर्भर भारत’ यासंदर्भात केलेले आवाहन लक्षात घेऊन, अपेडाने स्थानिक स्त्रोतांकडून निर्मित, भौगोलिक सूचकांक मिळालेल्या तसेच स्वदेशी, पारंपरिक कृषी उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. निर्यातीच्या उद्देशाने नवी उत्पादने आणि नवी निर्यात स्थळे निश्चित करण्यात आली असून त्यानुसार प्रायोगिक तत्वावरील शिपमेंटची सुविधा निर्माण करण्यात आली आहे.
अपेडामध्ये विपणन गुप्तचर कक्षाची स्थापना करण्यात आली आहे आणि माहितीच्या प्रसारणासाठी तपशीलवार बाजार विश्लेषणाचा समावेश असलेला ई-बाजार गुप्तचर अहवाल याआधीच जारी करण्यात आला आहे.
अपेडाने त्यांच्या संकेतस्थळावर शेतकरी संपर्क पोर्टलची देखील स्थापना केली आहे. हे पोर्टल शेतकरी उत्पादक संघटना आणि शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच सहकारी संस्था यांना निर्यातदारांशी संवाद साधण्यासाठीचा मंच उपलब्ध करून देणारा सेतू म्हणून कार्य करते. सुमारे 3,295 शेतकरी उत्पादक संघटना आणि शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच 3,315 निर्यातदारांनी आतापर्यंत या पोर्टलवर नोंदणी केली आहे.
आजच्या कार्यक्रमात बोलताना, अपेडाचे अध्यक्ष डॉ.एम.अंगमुथू म्हणाले, “देशातून दर्जेदार आणि उच्च मूल्ये असलेल्या कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न उत्पादनांची निर्यात केली जाईल याची खात्री होण्यासाठी आम्ही शेतकरी, निर्यातदार, प्रक्रियाकर्ते, आणि भारतीय मोहिमा या सर्व भागधारकांना यात सहभागी करून घेतले आहे.”
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून भारत सरकारने राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रम (एनपीओपी) विकसित करण्याचे काम सुरु केले असून यासाठी केंद्र सरकारने 2 मे 2001रोजी मंजुरी दिली होती. एनपीओपी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सचिवालय म्हणून अपेडाची निवड करण्यात आली.
“शेतकरी उत्पादक संघटना आणि शेतकरी उत्पादक कंपन्या यांचे भरीव योगदान आणि पाठबळामुळे, कृषी तसेच अन्न निर्यातीत चांगला वेग आणि वाढ झाली आहे. या कंपन्या संकलक तसेच थेट स्त्रोत केंद्रे म्हणूनही कार्य करतात. शेतकरी उत्पादक संघटना आणि शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्याकडून थेट उत्पादने मिळण्याच्या क्षमतेमुळे निर्यातदारांची देखील सोय झाली आहे. त्यांना थेट निर्यात प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी अपेडा क्षमता निर्मिती करून त्यांना पाठबळ पुरवत आहे. दूरदर्शी दृष्टीकोन तसेच आग्रही आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्यामुळे अपेडा ही संस्था भारताला कृषी उत्पादनांचा सातत्यपूर्ण आणि दर्जेदार पुरवठादार देश म्हणून स्थापित करू शकली आहे,” अपेडाचे अध्यक्ष डॉ.एम.अंगमुथू यांनी सांगितले.
S.Patil/Rajashree/Sanjana/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1899227)
Visitor Counter : 516