सांस्कृतिक मंत्रालय
राष्ट्रीय संस्कृती महोत्सव 2023 - भारतातील कला, पाककृती आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा साजरा करण्याची मुंबईकरांसाठी एक अनोखी संधी
संगीतमय श्रद्धांजलीपर कार्यक्रम 'रिमेम्बरिंग पंचम' आणि नागालँड कंझर्व्हेटरी ऑफ म्युझिक कॉयर आपल्या कलाविष्कारातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज
Posted On:
13 FEB 2023 6:19PM by PIB Mumbai
मुंबई, 13 फेब्रुवारी 2023
आपला देश विविधतेने नटलेला आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचा देश म्हणून ओळखला जातो. या महान भूमीतील कला, हस्तकला आणि पाककृती या संपदेचा आस्वाद घेण्यासाठी उत्सव साजरा करण्याहून अधिक चांगला मार्ग आणखी कोणता आहे ? राष्ट्रीय संस्कृती महोत्सव 2023 च्या रूपाने ही अनोखी संधी मुंबईकरांना प्राप्त झाली आहे.
राष्ट्रीय संस्कृती महोत्सव 2023 चे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते 11 फेब्रुवारी रोजी झाले.मुंबईत चर्चगेट येथील आझाद मैदानात 11 ते 19 फेब्रुवारी दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक देवाणघेवाणीद्वारे राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मतेला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली सर्व सात विभागीय सांस्कृतिक केंद्रे आणि अकादमी या कार्यक्रमात सहभागी होत असून महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित केला आहे.




या महोत्सवात संपूर्ण भारतातील जवळजवळ 350 लोककलाकार आणि आदिवासी कलाकार, जवळजवळ 300 स्थानिक लोक कलाकार, काही ट्रान्स जेंडर कलाकार आणि दिव्यांग कलाकार, ख्यातनाम शास्त्रीय कलाप्रकारांचे सादरकर्ते, यांच्यासह प्रसिद्ध कलाकार आपल्या चित्ताकर्षक सादरीकरणाने प्रेक्षकांचे मनोरंजन करतील आणि त्यांना प्रेरणा देतील. या कलाकारांव्यातिरिक्त, भारतातील सर्व राज्यांमधून आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या सर्व सात विभागीय सांस्कृतिक केंद्रांमधून सुमारे 150 कारागीरांना, ‘आंगन’ अंतर्गत त्यांच्या कला आणि हस्तकला प्रकारांची विक्री- आणि-प्रदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले असून, यासाठी सुमारे 70 स्टॉल उपलब्ध केले आहेत. तसेच, महाराष्ट्र राज्य हातमाग विभाग आणि स्टार्टअप्ससाठी 25 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. मैदानावर फूड कोर्ट उभारली असून त्यामध्ये भारतभरातील खाद्यपदार्थांचे प्रकार, स्थानिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स तसेच भरड धान्यांचे खाद्यपदार्थ सादर करणारे सुमारे 37 स्टॉल सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असतील.
संपूर्ण कार्यक्रमासाठी सर्व नागरिक आणि कलाप्रेमींसाठी प्रवेश विनामूल्य आहे.
या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाची आणि दुसऱ्या दिवशी (12 फेब्रुवारी) च्या कार्यक्रमाची झलक दाखवणारी ही काही छायाचित्रे.











महोत्सवातील प्रत्येक संध्याकाळी शास्त्रीय, लोककला, समकालीन कला प्रकार आणि त्याही पलीकडे भारतभरातील कलाकारांच्या सादरीकरणाने सजलेले कलाविष्कार पाहायला मिळतील. महोत्सवातील आजचे कार्यक्रम संगीतप्रेमींसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरतील.
नागालँड कंझर्व्हेटरी ऑफ म्युझिक कॉयर द्वारे आयोजित लिपोकमार त्झुदिर यांच्या संयोजनाखाली आज संध्याकाळी 7 वाजता पाश्चात्य आणि लोकसंगीताची एक सुंदर मैफल सादर होणार आहे.
सर्व कलाकार त्यांच्या सादरीकरणापूर्वी सराव करताना...


आज रात्री 8 वाजता दिग्गज संगीतकार आर.डी. बर्मन यांना संगीतमय श्रद्धांजली म्हणून राज सोढा, किशोर सोढा आणि सिद्धार्थ एंटरटेनर्स यांनी सादर केलेला कार्यक्रम हे या महोत्सवाचे खास आकर्षण असेल. भारतीय शास्त्रीय संगीत आणि आयकॉनिक बॉलीवूड संगीतासह, विविध परफॉर्मन्स तुम्हाला संगीतमय जगाचा फेरफटका घडवून आणतील.
दैनंदिन कार्यक्रमाचे वेळापत्रक जाणून घेण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा

मग आपण कशाची वाट पाहत आहात? राष्ट्रीय संस्कृती महोत्सव ही सर्वाना एकत्र येण्याची आणि भारताच्या सर्वोत्तम सांस्कृतिक परंपरांचा अनुभव घेण्याची एक उत्कृष्ट संधी आहे. त्याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आपण आहात?
N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1898870)
Visitor Counter : 404