अर्थ मंत्रालय
मध्य प्रदेशात ग्वाल्हेर येथे जी-20 संकल्पनेवर आधारित "महिला सक्षमीकरण आणि महिला पोषण" यावर जागरूकता तसेच प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
Posted On:
07 FEB 2023 3:34PM by PIB Mumbai
भारताच्या जी20 अध्यक्षपदाची संकल्पना 'वसुधैव कुटुंबकम' (एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य) आहे. जगाच्या सर्वांगीण शाश्वत विकासासाठी जगाने महिलाभिमुख विकासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हे ठोस आणि शाश्वत स्त्रीपुरुष समानता साध्य करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.
महाराष्ट्रातील पुणे येथील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेने जी20 संकल्पनेअंतर्गत 10 फेब्रुवारी 2023 रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे लक्ष्मीबाई महिला नागरी सहकारी बँकेच्या सहकार्याने "महिला सक्षमीकरण आणि महिला पोषण" या विषयावर जागरूकता आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. महिलांना बचत गटांच्या सक्रिय सदस्य होण्यासाठी आणि नवे नवोन्मेषी आर्थिक उपक्रम सुरू करण्यासाठी प्रेरित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पौष्टिक आहार आणि त्याचे महत्त्व याबद्दल जागरुकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा दुसरा उद्देश होय. यात महिलांना पोषक आहाराची संकल्पना समजावून सांगितली जाणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना उपलब्ध असलेल्या विविध योजनांची माहिती मिळणार आहे.

महिला बचत गट सदस्य, महिला शेतकरी, महिला कृषी-उद्योजक, महिला बँक प्रतिनिधी आणि लक्ष्मीबाई महिला नागरी सहकारी बँकेच्या विविध विभागातील महिला अधिकारी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ग्वाल्हेर येथे होणाऱ्या या कार्यक्रमात सुमारे 100 ते 150 प्रशिक्षणार्थी सहभागी होणार आहेत.

उद्घाटन समारंभानंतर डॉ. वीणा प्रधान महिलांच्या आरोग्याविषयी माहिती देणार आहेत. डॉ. प्रियदर्शिनी श्रीवास्तव महिलांसाठी पौष्टिक आहार आणि पोषणाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करतील आणि अंजली बत्रा महिला सक्षमीकरण आणि महिलांसाठी व्यवसाय संधी याविषयी उदाहरणांसह माहीती देतील. प्रत्येक सत्रानंतर प्रश्नोत्तरे होतील.
कार्यक्रमाची संकल्पना वॅम्निकॉमच्या डॉ. पल्लवी इंगळे (सहयोगी प्राध्यापक) आणि भोपाळ आयसीएमचे डॉ. अमित मुदगल (प्रभारी संचालक) यांची आहे. लक्ष्मीबाई महिला बँकेच्या संस्थापक अध्यक्षा अलका श्रीवास्तव तांत्रिक सत्रासाठी कार्यक्रमास सहकार्य करतील.
***
M.Iyengar/V.Ghode/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1896967)
Visitor Counter : 214