माहिती आणि प्रसारण मंत्रालय
शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाची सांगता
एससीओ चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट गोदावरी ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट
शाओझी राओ यांना चीनी चित्रपट होमकमिंगसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार
Posted On:
31 JAN 2023 7:27PM by PIB Mumbai
मुंबई, 31 जानेवारी 2023
शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाची आज मुंबईत सांगता झाली.एकूण 14 देशांचे 58 चित्रपट प्रदर्शित करणारा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा एससीओ चित्रपट महोत्सव ठरला आहे. सांगता समारंभात विविध स्पर्धा श्रेणींसाठी विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली. गीतकार आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी आणि चित्रपट क्षेत्रातले नामवंत यावेळी उपस्थित होते.
पुरस्कार
स्पर्धा विभागामध्ये एस सी ओ समूह राष्ट्रांसाठी प्रवेश मर्यादित होता, यामध्ये प्रत्येक चित्रपटाने दाखवलेल्या सिनेमॅटिक उत्कृष्टतेच्या सर्वोच्च कलात्मकातेमुळे त्यातून विजेत्यांची निवड करणाऱ्या जुरींसाठी ती तारेवरची कसरत ठरली. निखिल महाजन दिग्दर्शित गोदावरी हा मराठी चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. चीनी चित्रपट होमकमिंगचे दिग्दर्शक शाओझी राओ यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.कझाक अभिनेता अस्कर इल्यासोव्ह याला पॅरालिम्पियनसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला. उझबेकिस्तानच्या रानो शोदियेवा हिला द फेट ऑफ अ वुमन या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
लिउबोव्ह बोरिसोवा दिग्दर्शित रशियन चित्रपट डोन्ट बरी मी विदाऊट इव्हान या चित्रपटाला विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला तर अशांत आणि अस्थिर काळात आपली सांस्कृतिक मूल्ये गमावण्याच्या धोक्याबद्दल वाच्यता करणारा तसेच त्यादृष्टीने आशेचा किरण दाखवून सावधानतेचा संदेश देणारा बाकित मुकुल आणि दास्तान झापर दिग्दर्शित किरगिझ चित्रपट द रोड टू एडनचा ज्युरींकडून विशेष उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आला आहे. खऱ्या मैत्रीचे मूल्य अनुभवण्यासाठी प्रेक्षकांना खिळवून टाकणाऱ्या उल्लेखनीय अभिनेत्याच्या जोडीसाठी मुहिद्दीन मुझफ्फर दिग्दर्शित ताजिक चित्रपट फॉर्च्यूनची ज्युरींनी विशेष उल्लेखनीय कामगिरीसाठीच्या पारितोषिकासाठी निवड केली.
सत्कार
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) चे व्यवस्थापकीय संचालक आणि केंद्र सरकारचे सहसचिव (चित्रपट), प्रितुल कुमार यांनी केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (सीबीएफसी) अध्यक्ष प्रसून जोशी यांचा सत्कार केला.अभिनेते आर. माधवन, गायिका श्रेया घोषाल आणि चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा सत्कार प्रसून जोशी आणि प्रितुल कुमार यांनी केला.
व्हिडिओ संदेशाद्वारे प्रेक्षकांना संबोधित करताना, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी, या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व सहभागीचे आणि परीक्षकांचे अभिनंदन केले.या महोत्सवात झालेल्या विचारविनिमयामुळे शांघाय सहकार्य संघटना क्षेत्रातील चित्रपट क्षेत्रात अधिक सहकार्य, सहनिर्मिती होईल,असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.या क्षेत्रातील सामाजिक सांस्कृतिक प्रगतीचा, चित्रपट हा कशाप्रकारे मजबूत संवाहक आहे आणि या पुढेही राहील हे देखील त्यांनी नमूद केले.
आभार प्रदर्शन करताना, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रितुल कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचे उत्कृष्ट नेतृत्व आणि मार्गदर्शनाबद्दल आभार मानले.प्रोत्साहन आणि पाठबळ दिल्याबद्दल त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकार्यांचे, प्रसारमाध्यम क्षेत्रातले सदस्य आणि ज्यांच्या सहभागामुळे हा महोत्सव मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला त्या प्रतिनिधींचे आभार मानले. तौफिक कुरेशी आणि अनिर्बन रॉय आणि कैलाश खेर यांच्या शानदार सादरीकरणाने सोहळ्याचा समारोप झाला. या सोहळ्यानंतर गोदावरी हा पुरस्कार विजेता चित्रपट महोत्सवातील सर्व स्क्रीनिग स्थळांवर प्रदर्शित करण्यात आला.
* * *
PIB Mumbai | N.Chitale/S.Chavan/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1895121)
Visitor Counter : 177