शिक्षण मंत्रालय
पुण्यातील केंद्रीय विद्यालयांमध्ये आयोजित चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
Posted On:
23 JAN 2023 6:25PM by PIB Mumbai
पुणे, 23 जानेवारी 2023
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होत असलेल्या “पराक्रम दिना”निमित्त केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या देशव्यापी चित्रकला स्पर्धा उपक्रमाचा भाग म्हणून आज गणेशखिंड येथील केंद्रीय विद्यालय तसेच लोहगाव येथील एअर फोर्स स्टेशन येथे असलेले केंद्रीय विद्यालय क्र.1 येथे जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. येत्या 27 जानेवारी 2023 रोजी होणार असलेल्या “परीक्षा पे चर्चा” या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेविषयी असलेल्या तणावाचे निवारण करण्यासाठी देखील या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या 200 हून अधिक विद्यार्थ्यांना ई-प्रमाणपत्रे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले “एग्झाम वॉरियर्स” या पुस्तकाच्या प्रती देऊन गौरविण्यात आले.
परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम दर वर्षी आयोजित करण्यात येतो आणि त्यात परीक्षेला सामोरे जाणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांशी पंतप्रधान अर्थपूर्ण संवाद साधतात. परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी आणि परीक्षेत उत्तम दर्जाचे यश मिळविण्यासाठी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना 25 मंत्र दिले आहेत. आजच्या चित्रकला स्पर्धेच्या संकल्पना म्हणून हे 25 मंत्रच देण्यात आले होते. पुणे आणि परिसरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
केंद्रीय विद्यालय क्र.1 एएफएस लोहगाव:
लोहगाव येथील केंद्रीय विद्यालय क्र.1 एएफएस मध्ये पुणे जिल्ह्यातील 21 शाळांमध्ये शिकणाऱ्या 105 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. यामध्ये केंद्रीय विद्यालये, सीबीएसई तसेच राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. परीक्षक मंडळाच्या सदस्यांनी सर्व चित्रांचे बारकाईने परीक्षण करुन अंतिम निकाल घोषित केले. सर्वोत्कृष्ट चित्रासाठी पुढील पाच विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले: 1)भूमी जैवाल (डॉ.मर थिओफिलस शाळा), 2) हर्षल देवकर (एयर फोर्स शाळा, चंदननगर), 3)ओवी यादव (लष्करी शाळा, दिघी), 4)रितेश रोशन (केव्ही1 एएफएस) आणि 5)शिवानी गाडे (जवाहर नवोदय विद्यालय) ग्रुप कॅप्टन संजय पिसे, श्री राजेंद्र वडळकर, श्रीमती प्रफुल्ला शिंदे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
केंद्रीय विद्यालय गणेशखिंड, पुणे
गणेशखिंड येथील केंद्रीय विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत 22 शाळांच्या 100 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यामध्ये केंद्रीय विद्यालये, सीबीएसई शाळा तसेच राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
परीक्षकांनी अंतिम निकाल जाहीर केले. चित्रकला स्पर्धेचे पाच विजेते पुढीलप्रमाणे आहेत:
- अवनी थोरात (डी.ए.व्ही. पब्लिक स्कुल, पुणे),
- श्वेता चव्हाण (केंद्रीय विद्यालय, गणेशखिंड, पुणे)
- सानिका संजय कुमार (केंद्रीय विद्यालय क्र.1 देहू रोड,पुणे)
- मुस्कान सोळंकी (जी.के.गुरुकुल, पिंपळे सौदागर, पुणे)
- उर्जिता राव (डी.ए.व्ही. सरकारी शाळा,औंध, पुणे
विद्यालयाच्या प्राचार्य शबाना खान, श्री उज्ज्वल आवारे यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
* * *
PIB Pune | M.Iyengar/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1893056)
Visitor Counter : 184