शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

“परीक्षा पे चर्चा” कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील केंद्रीय विद्यालयांमध्ये आयोजित चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

Posted On: 23 JAN 2023 5:45PM by PIB Mumbai

मुंबई, 23 जानेवारी 2023

 

विद्यार्थ्यांना त्यांच्यातील सर्जनशीलतेला वाव देता यावा आणि परीक्षा देण्यापूर्वी वातावरण तणावरहित करता यावे या उद्देशाने “परीक्षा पे चर्चा 2023” कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर “पराक्रम दिना”निमित्त आज एका देशव्यापी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या “एग्झाम वॉरियर्स” या पुस्तकातील संकल्पनांवर  विचार करून विद्यार्थ्यांना परीक्षा योद्धे कसे होता येईल ही या स्पर्धेची मध्यवर्ती कल्पना होती.

महाराष्ट्रातील सर्व केंद्रीय विद्यालयांनी देखील अत्यंत उत्साहाने या स्पर्धेचे आयोजन केले. राज्याच्या विविध भागांतील केंद्रीय विद्यालयाच्या 20 केंद्रांनी या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी परिसरातील शाळांतून 100 विद्यार्थी आमंत्रित केले होते. प्रत्येक केंद्रातील सर्वोत्तम पाच स्पर्धकांना स्वातंत्र्य सैनिक तसेच राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर आधारित पुस्तकांचा संच आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील विविध सीबीएससी शाळा, राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा, नवोदय विद्यालये आणि केंद्रीय विद्यालये यांमध्ये इयत्ता 9 वी ते 12 वी मध्ये शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला.

 

मुंबई तसेच पुणे येथील सहभागी विद्यार्थ्यांची काही छायाचित्रे

   

 

मुंबईत कुलाबा येथे केंद्रीय विद्यालय 3 येथे स्पर्धा परीक्षक म्हणून बोलावण्यात आलेले शिक्षणतज्ञ कॅप्टन ए.के.कुकरेजा या अभिनव उपक्रमाबद्दल बोलताना म्हणाले, “ताणतणावाबद्दल मोकळेपणाने बोलणे अत्यंत आवश्यक आहे. अशा उपक्रमांच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांना कलेच्या माध्यमातून त्यांची भीती आणि चिंता व्यक्त करण्याची संधी मिळते.”

याच शाळेत स्पर्धा परीक्षक म्हणून उपस्थित असलेले अर्जुन माचिवले म्हणाले, “शिक्षण घेताना कलेशी जोडले गेल्यामुळे विद्यार्थ्यांचा समतोल विकास शक्य होतो.” परीक्षांचा कालावधी जवळ येत असताना, शाळा व्यवस्थापनाने दैनंदिन अभ्यासातून थोडी उसंत घेऊन कलेच्या विश्वात हरवून जाण्याची संधी दिल्याबद्दल विद्यार्थी वर्गाने आनंद व्यक्त केला. या चित्रकला स्पर्धेने विद्यार्थ्यांना थोडा विसावा घेण्याची, विश्रांतीची आणि स्वतःच्या भावना कॅनव्हॉस वर रेखाटण्याची संधी दिली.

   

मुंबईत या स्पर्धेसाठीचे जिल्हा पातळीवरील प्रमुख केंद्र असलेल्या केंद्रीय विद्यालय, आय आय टी मुंबई, पवई येथेही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय विद्यालय, आय आय टी मुंबई येथे विविध शाळातील सुमारे 100 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले.

   

केंद्रीय विद्यालय कुलाबा, मुंबई हे देखील मुंबईतील स्पर्धेच्या प्रमुख केंद्रांपैकी एक होते. या स्पर्धेत आजूबाजूच्या परिसरातील केंद्रीय विद्यालय, सीबीएसई आणि राज्य मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला.

नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती या पराक्रम दिनाच्या निमित्तानं देशपातळीवरील केंद्रीय विद्यालय मध्ये  आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेला पुण्यात लोहगाव इथल्या केंद्रीय विद्यालय क्रमांक 1आणि केंद्रीय विद्यालय, गणेशखिंड येथे प्रारंभ झाला. या भागातील  शाळांमधून सुमारे 200 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले.

केंद्रीय विद्यालय वायुसेना नागपूर येथेही “परीक्षा पे चर्चा” या कार्यक्रमापूर्वी आयोजित चित्रकला स्पर्धेत नागपूरच्या 17 शाळांमधील 100 मुले सहभागी झाले आहेत.

केंद्रीय विद्यालय वायुसेना नगरचे प्राचार्य अरविंदसिंह ठाकूर यांनी या संदर्भात  माहिती देताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांसाठी “परीक्षा पे चर्चा” एक "सफल-मंत्र" आहे, ज्यामध्ये विद्यार्थी परीक्षेच्या तणावापासून दूर राहून यश मिळवण्यासाठी प्रेरणा घेतात.

शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालकवर्ग यांच्याशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधानांतर्फे घेण्यात येणाऱ्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचा “परीक्षा पे चर्चा 2023” हा सहावा भाग येत्या 27 जानेवारी 2023 रोजी नवी दिल्ली येथील तालकटोरा इनडोअर स्टेडीयम मध्ये आयोजित होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आजच्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील तसेच परदेशातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याशी परीक्षा आणि शालेय जीवनानंतर आयुष्यात येणाऱ्या ताणतणावाबद्दल चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या संकल्पनेतून ‘परीक्षा पे चर्चा’ हा अभिनव संवादात्मक कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. जीवनाचा उत्सव साजरा करण्यासाठी ताणावर मात करण्यास मदत करता यावी हा या कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे गेली पाच वर्षे या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. “परीक्षा पे चर्चा 2023” बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

“परीक्षा पे चर्चा 2023” मध्ये राज्य शिक्षण मंडळे, सीबीएससी, केंद्रीय विद्यालये तसेच नवोदय विद्यालये यांच्यासह इतर शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जगभरातील दीडशे देशांतील विद्यार्थी, 51 देशांतील शिक्षक तसेच 50 देशांतील पालक या सर्वांनी नोंदणी केली आहे.

 

* * *

PIB Mumbai | S.Tupe/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1893037) Visitor Counter : 387


Read this release in: English