संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्ली कॅंट येथील राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिराला दिली भेट; कॅडेट्सना संरक्षण मंत्री पदक आणि प्रशंसापत्रे केली प्रदान
Posted On:
21 JAN 2023 4:00PM by PIB Mumbai
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 21 जानेवारी 2023 रोजी दिल्ली कॅंट येथील राष्ट्रीय छात्र सेना (NCC) प्रजासत्ताक दिन शिबिराला भेट दिली आणि कॅडेट्सना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तसेच कर्तव्य निष्ठेबद्दल संरक्षण मंत्री पदक आणि प्रशंसापत्रे प्रदान केली. या वर्षासाठीचे संरक्षण मंत्री पदक ईशान्य क्षेत्र संचालनालयाचे अंडर ऑफिसर टिंगगेउचिल न्रिमे आणि राजस्थान संचालनालयाचे कॅडेट अविनाश जांगीर यांना प्रदान करण्यात आले. ओडिशा संचालनालयाचे कॅप्टन प्रताप केशरी हरिचंदन, तामिळनाडू, पुद्दुचेरी तसेच अंदमान आणि निकोबार संचालनालयाच्या कॅडेट अंडर ऑफिसर जेनी फ्रॅन्सिना व्हिक्टर आनंद, जम्मू-काश्मीर आणि लडाख संचालनालयाच्या कॅडेट फिजा शफी आणि उत्तराखंड संचालनालयाच्या कॅडेट सेहवाग राणा यांना संरक्षण मंत्री प्रशंसापत्रे प्रदान करण्यात आली.
यावेळी संरक्षण मंत्र्यांनी सुमारे 2,000 कॅडेट्सना मार्गदर्शन केले. कॅडेट्सनी नवे मार्ग शोधावे तसेच देशाला विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावे यावर संरक्षण मंत्र्यांनी आपल्या मार्गदर्शनात भर दिला. यासोबतच, कॅडेट्सनी आपल्या देशाची जुनी मूल्ये आणि परंपरांचे पालन करत स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात नम्रतेने काम करण्याचे आवाहन संरक्षण मंत्र्यांनी केले.
बदलत्या काळानुसार स्वत:मध्ये परिवर्तन घडवण्याच्या गरजेवर राजनाथ सिंह यांनी भर दिला. वेगाने विकसित होत असलेल्या जागतिक सुरक्षा परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकार देशाला सुसज्ज बनवण्यात कोणतीही कसर सोडणार नाही, असेही त्यांनी सांगितले. काळासोबत बदलणे आवश्यक असले तरी देशाच्या गौरवशाली भूतकाळाशी जोडलेले राहणे देखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. संस्कृती आणि परंपरांमध्ये रुजलेला सशक्त आणि समृद्ध भारत निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे, असे ते म्हणाले.
संरक्षण मंत्र्यांनी तरुणांना ‘युज अँड थ्रो’ ही संकल्पना दूर करण्याचे आवाहन केले. वापरा आणि फेकून द्या या पद्धतीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फटका समाज आणि पर्यावरणाला बसत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पर्यावरणाचा ऱ्हास म्हणजे जीवनाचा नाश, असे सांगून सिंह यांनी तरुणांनी आणि देशवासीयांनी शक्य तितका वस्तूंचा पुनर्वापर करून निसर्ग संवर्धनासाठी काम करण्याचे आवाहन केले. तरुणांनी आपल्या व्यक्तिगत आयुष्यातही ‘युज अँड थ्रो’ संकल्पनचा शिरकाव होऊ देता कामा नये, असे ते म्हणाले. युवा वर्गाने आपली वडीलधारी मंडळी, कुटुंब आणि मित्र यांचा आदर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
***
S.Thakur/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1892674)
Visitor Counter : 207