ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
सेलिब्रिटी – सुप्रसिद्ध व्यक्तीआणि समाज माध्यमांवरील प्रभावशाली व्यक्तींसाठी केंद्र सरकारने जाहिरातविषयक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली
एखाद्या उत्पादनाची जाहिरात त्याची माहिती ठळकपणे आणि स्पष्टपणे देणे आवश्यक आहे
मार्गदर्शक तत्वानुसार जाहिरातींसाठी 'जाहिरात', 'प्रायोजित' किंवा 'पेड प्रमोशन : सशुल्क जाहिरात' या शब्दांचा वापर करा
Posted On:
20 JAN 2023 9:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जानेवारी 2023
ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत ग्राहक व्यवहार विभागाने आज समाज माध्यमांवरील मान्यवर अथवा सेलिब्रिटी, प्रभावशाली व्यक्ती आणि आभासी पद्धतीने प्रभावित करणाऱ्यांसाठी ‘एन्डोर्समेंट्स नो-हाऊ!’ म्हणजेच जाहिरातींविषयीच्या सविस्तर माहिती संदर्भात मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केली. या व्यक्तींनी एखाद्या उत्पादन किंवा सेवेचे समर्थन करताना आपल्या प्रेक्षकांची दिशाभूल करू नये आणि ते ग्राहक संरक्षण कायदा आणि संबंधित नियम किंवा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतात की नाही यावर देखरेख ठेवणे हा यामागचा उद्देश आहे.
जाहिराती आता केवळ मुद्रित, दूरचित्रवाणी, किंवा रेडिओसारख्या पारंपारिक माध्यमांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत त्यामुळे झपाट्याने विकसित होणाऱ्या डिजिटल जगाला प्रतिसाद म्हणून, ‘एन्डोर्समेंट्स नो-हाऊ! तयार केले आहे. ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी ते जारी केले. फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्म आणि समाज माध्यमांची व्याप्ती जसजशी वाढत आहे, तसतसे सेलिब्रिटी आणि प्रभावशाली व्यक्ती यांच्याबरोबरच आभासी पद्धतीने प्रभावित करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. यामुळे जाहिरातींच्या माध्यमातून ग्राहकांची दिशाभूल होण्याचा धोका तर वाढला आहेच त्यासोबत समाज माध्यमांवर अशा व्यक्तींकडून अनुचित व्यापार पद्धतींचं प्रमाण देखील वाढलं आहे.
"एन्डोर्समेंट्स नो-हाऊ!" मध्ये असे निर्देश दिले आहेत की जाहिरातींमध्ये उत्पादन किंवा सेवांविषयीचे केलेले प्रकटीकरण ठळकपणे आणि स्पष्टपणे प्रदर्शित करणे आवश्यक आहे, जेणेकरून ते दुर्लक्षित केले जाऊ शकणार नाही. ज्यांना प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभतो आणि जे प्रेक्षकांच्या खरेदीच्या निर्णयांवर किंवा उत्पादन, सेवा, ब्रँड किंवा अनुभवाबद्दलच्या मतांवर प्रभाव टाकू शकतात, अशा कोणत्याही सेलिब्रेटी, प्रभावशाली किंवा आभासी प्रभावकर्त्याने त्यांचे जाहिरातदाराशी असलेले व्यावहारिक बंध उघड करणे आवश्यक आहे. यामध्ये केवळ लाभ आणि प्रोत्साहन यांचाच समावेश नसून आर्थिक किंवा इतर भरपाई, सहल किंवा हॉटेल मधील वास्तव्य, माध्यम भागीदार, कव्हरेज आणि पुरस्कार, अटींसह किंवा त्याशिवाय विनामूल्य उत्पादने, सूट, भेटवस्तू आणि कोणतेही कौटुंबिक किंवा वैयक्तिक किंवा रोजगार विषयक संबंध यांचा अंतर्भाव आहे.
जाहिराती सोप्या, स्पष्ट भाषेत केल्या पाहिजेत आणि "जाहिरात," "प्रायोजित," किंवा "सशुल्क जाहिरात" यासारख्या संज्ञा वापरल्या जाव्यात. त्यांनी अशा कोणत्याही उत्पादन किंवा सेवेचे समर्थन करू नये ज्यामध्ये त्यांनी योग्य परीक्षण केलेलं नाही किंवा त्यांनी ते वैयक्तिकरित्या वापरलेले किंवा अनुभवलेले नाही.
2019 च्या ग्राहक संरक्षण कायद्याने निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही नियमावली जारी केली आहे. अनुचित व्यापार पद्धती आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी या कायद्यानुसार मार्गदर्शक तत्त्वे स्थापित केली आहेत. ग्राहक व्यवहार विभागाने 9 जून 2022 रोजी फसव्या जाहिरातींवर प्रतिबंध आणि भ्रामक जाहिरातींसाठी समर्थन-२०२२ अंतर्गत, मार्गदर्शक तत्त्वे प्रकाशित केली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे वैध जाहिरातींचे निकष आणि उत्पादक, सेवा प्रदाते, जाहिरातदार आणि जाहिरात एजन्सी यांच्या जबाबदाऱ्यांची रूपरेषा दर्शवितात. ही मार्गदर्शक तत्त्वे सेलिब्रिटी आणि पुरस्कर्त्यांना देखील लागू होतात. कोणत्याही स्वरूपात, स्वरूपातील किंवा माध्यमात दिशाभूल करणारी जाहिरात कायद्याने प्रतिबंधित आहे, असे यात म्हटले आहे.
मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेत समाज माध्यमांवरील अनेक प्रभावशाली व्यक्ती आणि एजन्सींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाग घेतला होता.
R.Aghor/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1892603)
Visitor Counter : 385