माहिती आणि प्रसारण मंत्रालय
राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने स्वच्छता मोहीम, सांस्कृतिक कार्यक्रम, जनजागृती सत्रांचे आयोजन
राष्ट्रीय युवा दिन : स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त केंद्रीय संचार ब्युरो, गोवा द्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन
Posted On:
13 JAN 2023 5:43PM by PIB Mumbai
गोवा, 13 जानेवारी 2023
राष्ट्रीय युवा दिनानिमित्त गोवा येथील केंद्रीय संचार ब्युरोने राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता मोहीम, जनजागृती सत्र आणि विविध स्पर्धा घेण्यात आल्या. स्वामी विवेकानंद यांची जयंती दरवर्षी 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन म्हणून केंद्र सरकार साजरी करते.
या कार्यक्रमाचा भाग म्हणून काल, 12 जानेवारी रोजी 1 गोवा बटालियन एनसीसी पणजी यांच्या सहकार्याने मिरामार चौपाटीवर भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या कार्यक्रमात 100 हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते. या मोहिमेदरम्यान 250 किलो पेक्षा जास्त प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. तसेच मडगाव मधील रवींद्र केळेकर ज्ञानमंदिर येथे सीबीसी गोवाच्या कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले.

बांबोळी मधील अंजुमन नुरुल इस्लाम हायस्कूल येथे आज झालेल्या दुसर्या कार्यक्रमात गोवा लाइव्हलीहुड्स फोरमच्या निकिता गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जनजागृती सत्र पार पडले. प्रख्यात विद्यार्थी समुपदेशक आणि प्रशिक्षक अमीना बुखारी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना संबोधित करताना अमीना यांनी जीवनात स्वामी विवेकानंदांची शिकवण आत्मसात करण्याचे आवाहन केले. “तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनापासून सुरुवात करावी लागेल, तुमच्या दैनंदिन वेळापत्रकावर काम करावे लागेल. तरच तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकाल "असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांसाठी पोट्रेट ड्रॉइंग, पोस्टर मेकिंग, निबंध लेखन आणि घोषवाक्य लेखन अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमात विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. सीबीसी गोवाच्या कलाकारांनी आणि विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून युवा दिवस साजरा केला.

राष्ट्रीय युवा दिनाविषयी:
तरुणांच्या सामर्थ्यावर दृढ विश्वास असलेल्या स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते. देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वक्तृत्व , संगीत, चर्चासत्रे, मिरवणुका, खेळ, स्पर्धा आणि इतर अनेक कार्यक्रमांच्या आयोजनाद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
* * *
PIB Panaji | N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1891040)
Visitor Counter : 182