संरक्षण मंत्रालय
यंदाचा सैन्य दिन साजरा करण्यासाठी भारतीय सेनेतर्फे वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन
Posted On:
12 JAN 2023 3:13PM by PIB Mumbai
पुणे , 12 जानेवारी 2023
बंगळुरू येथे प्रथमच मुख्यालय दक्षिण कमांडच्या नेतृत्वाखाली सैन्य दिन 15 जानेवारी 2023 रोजी साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त होणाऱ्या संचलनाबरोबरच भारतीय लष्कराच्या पर्यावरणीय जबाबदाऱ्यांप्रती असलेल्या बांधिलकीच्या अनुषंगाने भारतीय लष्कर "गो ग्रीन" मोहीम राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत 14 जानेवारी 2023 रोजी दक्षिण कमांड परिसरामध्ये 75 हजार रोपे लावण्यासाठी लष्कर प्रयत्नशील असेल.
ही वृक्षारोपण मोहीम लष्करी तसेच नागरी भागात राबवली जाईल. लष्कराचे कर्मचारी, वन विभाग, शाळकरी मुले, टेरिटोरियल आर्मी इकोलॉजिकल बटालियन आणि इतर सरकारी संस्था या मोहिमेत सहभागी होतील.या रोपांमध्ये सावली देणारी झाडे, फळझाडे, औषधी वनस्पती आणि इतर वनस्पतींचा समावेश असेल.
पुणे येथे मुख्यालय , दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा उपक्षेत्र अंतर्गत वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे. लष्करी आणि नागरी आस्थापनांमध्ये 3000 रोपे लावण्याचे प्रस्तावित आहे. केवळ वृक्षारोपण करून ही पृथ्वी हरित करणे हेच या मोहिमेचे ध्येय नसून पृथ्वी हरित आणि स्वच्छ ठेवण्याच्या महत्त्वाबाबत तरुणांमध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची एक संधी म्हणून या मोहिमेकडे पाहिले जात आहे.
जागरूकता निर्माण करण्याचा हा उपक्रम आर्मी डे परेड 2023 आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित अनेक कार्यक्रमांपैकी एक आहे. केवळ पुणे येथेच नाही तर दक्षिण कमांडच्या कार्यक्षेत्रातील 11 राज्यांमध्ये हा उपक्रम राबवला जात आहे. भारतीय सैन्याच्या “सेवा परमो धर्म” या ब्रीदवाक्याला जागण्याचा तसेच सामंजस्य आणि समृद्धीचा संदेश हा उपक्रम देत आहे.
S.Kane/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1890697)
Visitor Counter : 140