कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राज्यस्तरीय बँकर्स समिती, महाराष्ट्र यांच्या वतीने पुणे येथे अटल निवृत्तीवेतन योजनेच्या धोरणात्मक आढावा कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 04 JAN 2023 6:05PM by PIB Mumbai

पुणे, 4 जानेवारी 2023

 

अटल निवृत्तीवेतन योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी, राज्यस्तरीय बँकर्स समिती, (एसएलबीसी ) महाराष्ट्र यांच्या वतीने  4 जानेवारी 2023 रोजी पुणे येथे अटल निवृत्तीवेतन योजना जनसंपर्क (आउटरिच) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक ए. बी. विजय कुमार होते आणि निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाचे  (पीएफआरडीए)  कार्यकारी संचालक ए. जी. दास हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्व सभासद बँकांनी अटल निवृत्तीवेतन योजना  राज्याच्या कानाकोपऱ्यात नेण्यासाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन ए. बी. विजय कुमार  यांनी आपल्या भाषणात केले.

ए. जी.  दास यांनी त्यांच्या प्रमुख भाषणात, आपल्या देशात वृद्धावस्थेतील उत्पन्नाची सुरक्षा सुरक्षित करण्यासाठी  निवृत्तीवेतनाच्या गरजेवर भर दिला. उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व बँकर्सचे अभिनंदन करत अटल निवृत्तीवेतन योजनेची व्याप्ती पूर्ण होईपर्यंत चांगले काम सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

यानंतर पीएफआरडीएचे सहाय्यक महाव्यवस्थापक डॉ. आशिष डोंगरे यांनी सादरीकरण करत या  योजनेची वैशिष्ट्ये आणि फायदे यावर विवेचन केले. या योजनेच्या बाबतीत 31 डिसेंबर 2022 पर्यंत सुमारे 38.30 लाखांच्या एकूण नोंदणीसह महाराष्ट्र राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे, मात्र राज्यातील योजनेची व्याप्ती राष्ट्रीय सरासरीपेक्षा किंचित कमी आहे, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमादरम्यान, अटल निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत नावनोंदणीमध्ये अनुकरणीय कामगिरीबद्दल हिंगोली, गोंदिया, जालना, परभणी, नांदेड, बीड, भंडारा, यवतमाळ, वाशीम आणि गडचिरोली येथील बँकांसह  (उदा. विदर्भ कोकण ग्रामीण बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, एमजीबी, युनियन बँक ऑफ इंडिया, धनलक्ष्मी बँक, कर्नाटक बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि कॅनरा बँक)   प्रमुख जिल्हा व्यवस्थापकांचा (एलडीएम)   सत्कार करण्यात आला.

अटल निवृत्तीवेतन  योजना ही भारत सरकारची खात्रीशीर  निवृत्तीवेतन  योजना असून निवृत्तीवेतन निधी   नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे  (पीएफआरडीए )  प्रशासित केली  जाते. 18-40 वर्षे वयोगटातील कोणत्याही भारतीय नागरिकाला स्वतःचे बचत खाते असलेल्या बँक किंवा टपाल कार्यालयाच्या  शाखांद्वारे या योजनेत समाविष्ट होता येते. या योजनेंतर्गत, ग्राहकाला 60 वर्षे वयापासून, त्याच्या योगदानावर आधारित  दरमहा रु. 1000 ते रु. 5000 पर्यंत किमान खात्रीशीर  निवृत्तीवेतन मिळेल. या योजनेच्या सदस्याच्या मृत्यूनंतर त्याच्या जोडीदाराला तसेच पती / पत्नी या दोघांच्या मृत्यूनंतर, सदस्याचे   60 व्या वर्षापर्यंत जमा झालेली   निवृत्तीवेतन  रक्कम नामनिर्देशित केलेल्या वारसदार व्यक्तीला परत केली जाईल.या योजनेअंतर्गत निवृत्तीवेतनाचे  वितरण 266 नोंदणीकृत अटल निवृत्तीवेतन योजना  सेवा-प्रदात्यांद्वारे केले जाते ज्यात बँका आणि टपाल  विभागाच्या विविध श्रेणींचा समावेश आहे. देशभरातील सुमारे 4.95 कोटी सदस्य या योजनेअंतर्गत नोंदणीकृत आहेत.

जोपर्यंत राज्यातील सर्व पात्र नागरिक अटल निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत येत नाहीत आणि भारताला निवृत्तीवेतनधारक  समाज बनवण्यासाठी योगदान देत नाहीत. तोपर्यंत निवृत्तीवेतन निधी   नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे  (पीएफआरडीए ) आणि राज्यस्तरीय बँकर्स समिती (एसएलबीसी ) महाराष्ट्र आपले प्रयत्न चालू ठेवतील, असे दास यांनी सांगितले.

राज्यस्तरीय बँकर्स समिती, महाराष्ट्र चे  उप महाव्यवस्थापक  आणि सदस्य सचिव  आर. डी. देशमुख यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

 

* * *

PIB Pune | S.Patil/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1888629) Visitor Counter : 200
Read this release in: English