संरक्षण मंत्रालय
ग्राम सेवा देश सेवा
Posted On:
30 DEC 2022 9:34PM by PIB Mumbai
‘सेना दिवस 2023’ साजरा करण्याचा एक भाग म्हणून आणि आपल्या गावांबरोबर भारतीय सैन्याचे बंध अधिक दृढ करण्यासाठी, 75 अविकसित आणि सीमावर्ती गावांमध्ये आज, 30 डिसेंबर 2022 लष्कराच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सैन्याच्या ग्राम सेवा कार्यक्रमासाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थानच्या विविध भागांमध्ये तुकड्या तैनात करण्यात आल्या. यानिमित्त मोठ्या प्रमाणात ग्रामसेवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्र उभारणीच्या कार्यक्रमामध्ये भारतीय सैन्याच्या दक्षिण कमांड क्षेत्रामधील 75 गावांमध्ये हे सेवा अभियान हाती घेतले आहे. ज्यामध्ये गावकऱ्यांना सैन्य सामान्य नागरिकांविषयी वचनबद्ध असल्याबद्दल आश्वस्त करण्यात आले.
"ग्रामसेवा - देश सेवा" या संकल्पने अंतर्गत दिवसभर सुरू असलेल्या मोहिमेमध्ये लष्कराचे कर्मचारी आणि गावातील रहिवासी यांनी संयुक्तपणे मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबविले. लष्कराकडून प्राथमिक तपासणीसाठी वैद्यकीय शिबिरेही आयोजित करण्यात आली होती. यामध्ये दुर्गम भागात 15 लाख रुपयांची मोफत औषध वितरित करण्यात आले. गावातील तरुणांना अग्निवीर योजनेबद्दल प्रबोधन करून सशस्त्र दलामध्ये करिअर घडविण्यासाठी सामील व्हावे, यासाठी माहिती देण्यात आली. गावातील तरुण आणि लष्कराचे जवान यांच्यात झालेल्या क्रीडा स्पर्धांमुळे त्यांच्यामध्ये मजबूत मैत्री निर्माण झाली. लष्कराच्या तुकड्यांनी गावातील तरुणांना 10 लाख रुपयांचे क्रीडा साहित्य देणगी स्वरूपात दिले. आणि त्यांना जीवनात खिलाडू वृत्ती जोपासण्याचे आवाहन केले.
परिसरातील वीर नारींचा यावेळी सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या तक्रारी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. युवक आणि विद्यार्थ्यांना फायदा व्हावा म्हणून भारतीय सैन्याने व्हॉलीबॉल/खो खो/कबड्डी यासारख्या मैदानी खेळ प्रकारांसाठी क्रीडा सुविधा निर्माण केल्या आणि मैत्रीपूर्ण सामने आयोजित केले. अधिकारी आणि सैनिकांनी स्थानिक नागरिकांबरोबर भोजन केले आणि अनौपचारिक पद्धतीने एकतेचा संदेश दिला आणि राष्ट्राविषयी आपलेपणाची भावना निर्माण केली.
"ग्राम सेवा - देश सेवा" या संकल्पने अंतर्गत आयोजित कार्यक्रमाने सैनिक-नागरिक यांना एकत्र आणण्यामध्ये मोठे योगदान दिले. तसेच भारतीय सैन्य जनतेच्या खांद्याला खांदा लावून उभे आहे, ही लष्कराची वचनबद्धता अधिक दृढ केली. समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांना, विशेषतः तरुणांना समाजाविषयी असलेल्या आपल्या कर्तव्याची जाण करून देणे, तसेच ‘राष्ट्र उभारणी’साठी त्यांना प्रेरित करण्याचा उदात्त हेतू साध्य करण्यासाठी, या अभियानामळे खूप मोठा हातभार लागणार आहे.
***
S.Kane/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1887657)
Visitor Counter : 178