अर्थ मंत्रालय
नागपूर येथे भारतीय महसूल सेवेच्या 76 व्या तुकडीच्या प्रवेशपुर्व प्रशिक्षणाचे उद्घाटन
Posted On:
28 DEC 2022 5:03PM by PIB Mumbai
नागपूर, 28 डिसेंबर 2022
सचोटी, नम्रता, नैतिकता आणि लोकसेवक म्हणून बांधिलकीची भावना हे घटक प्रशिक्षणार्थी अधिकारी यांनी आत्मसात केले पाहिजे. पारदर्शकता, प्रगतीशील कर आकारणी आणि ऐच्छिक अनुपालन या मूल्यांसह आयकर विभाग नव्या दृष्टीकोनातून काम करत असून फेसलेस योजना आणि चांगल्या कर सेवांसाठी विभागांच्या इतर प्रमुख उपक्रमानांही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या सदस्या श्रीमती. अनुजा सारंगी यांनी केले. भारतीय महसूल सेवेतील 59 आय आर एस अधिकारी आणि रॉयल भूतान सेवेतील 02 अधिकाऱ्यांच्या 76 व्या तुकडीसाठी प्रवेश प्रशिक्षणाचा उद्घाटन सोहळा आज राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी - नॅशनल अॅकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस - एनएडीटी नागपूर येथे झाला,याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. याप्रसंगी एनएडीटी नागपूरचे प्रमुख महासंचालक संजय पुरी उपस्थित होते.
सारंगी यांनी प्रारंभीच संबोधित करताना, अधिकारी प्रशिक्षणार्थींचे भारतीय महसूल सेवेत प्रवेश केल्याबद्दल अभिनंदन केले. भारतीय महसूल सेवेची भूमिका आणि सरकारच्या धोरण निर्मितीमध्ये आयकर विभागाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी, नागपूर ही भारत सरकारच्या भारतीय महसूल सेवा अधिकाऱ्यांसाठी असणारी सर्वोच्च प्रशिक्षण संस्था आहे. नागरी सेवा परीक्षेद्वारे भरती झालेले आयआरएस अधिकारी 16 महिन्यांचे प्रवेश पुर्व प्रशिक्षण घेतात. प्रशिक्षणादरम्यान, अधिकारी प्रशिक्षणार्थींना कर प्रशासनाच्या विविध पैलूंवर प्रशिक्षित केले जाते आणि त्यांना प्राप्तिकर कायदे, न्यायशास्त्र तसेच संबंधित कायदे, सामान्य कायदे आणि व्यवसाय कायदे यासंबंधी विशेष माहिती दिली जाते.
अधिकारी प्रशिक्षणार्थींना वित्त आणि लेखा प्रणालीवर सखोल प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणार्थींना करचोरी आणि मनी लाँड्रिंगसह कर प्रकरणे आणि आर्थिक गुन्ह्यांमध्ये तपासासाठी तयार करण्यासाठी फायनान्शियल फॉरेन्सिक्स आणि सायबर फॉरेन्सिक्समधील तपशील देखील दिले जातात. प्रशिक्षणार्थी यांना विशेषतः करदाता सेवा आणि इतर सार्वजनिक सेवा तसेच माहितीचा अधिकार इत्यादींबाबत संवेदनशील केल जाते. प्रशिक्षणाच्या व्यावहारिक बाबींमध्ये आयकर विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांशी तसेच संसदेसह भारतातील विविध संवैधानिक संस्था तसेच आरबीआय , एसबीआय , एनएसडीएल सारख्या वैधानिक संस्थांशी ॲटेचमेंट कार्यक्रमांचाही समावेश यात असतो .
76 व्या तुकडीत 25 महिलांसह (41% प्रमाण ) 61 अधिकारी प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. बॅचचे 38% अधिकारी प्रशिक्षणार्थी ग्रामीण पार्श्वभूमीतील आहेत आणि उर्वरित शहरी किंवा निमशहरी पार्श्वभूमीतील आहेत. अधिकारी प्रशिक्षणार्थींच्या शैक्षणिक पार्श्वभूमीचा संबंध आहे, सुमारे 2/3 अधिकारी प्रशिक्षणार्थी अभियांत्रिकी पार्श्वभूमीचे आहेत. सुमारे अर्ध्या बॅचसाठी ही त्यांची पहिलीच नोकरी आहे.
अधिकारी प्रशिक्षणार्थींना कर अधिकारी म्हणून काम करण्यासाठी आणि दर्जेदार करदाता सेवा देण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये सदर प्रशिक्षण सुनिश्चित करते. इंडक्शन प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर, अधिकारी प्रशिक्षणार्थींना संपूर्ण भारतातील क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सहाय्यक आयकर आयुक्त म्हणून नियुक्त केले जाते.
* * *
PIB Nagpur | D.Wankhede/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1887088)
Visitor Counter : 160