संरक्षण मंत्रालय
पुण्याजवळील कान्हे येथील लष्करी विधी महाविद्यालयाच्या नव्या शैक्षणिक संकुलाचे आणि सभागृहाचे लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल ए के सिंग यांच्या हस्ते उद्घाटन
Posted On:
20 DEC 2022 4:46PM by PIB Mumbai
पुणे, 20 डिसेंबर 2022
लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एके सिंग, एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएम यांच्या हस्ते पुण्याजवळील कान्हे येथील लष्करी विधी महाविद्यालयाच्या (आर्मी लॉ कॉलेज) ‘चाणक्य’ या शैक्षणिक संकुलाचे आणि ‘साई सभागृह’ या वास्तूंचे उद्घाटन करण्यात आले. आर्मी वेल्फेअर एज्युकेशन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक, मेजर जनरल डॉ.आर के रैना देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. 2018 साली पुण्याजवळील कान्हे येथे स्थापन झालेल्या लष्करी विधी महाविद्यालयामुळे लष्करातील जवान आणि अधिकाऱ्यांच्या पाल्यांना आर्मी वेल्फेअर एज्युकेशन संस्थेच्या विद्यमाने किफायतशीर शुल्क भरून व्यावसायिक पातळीवरील कायदेविषयक शिक्षण घेता येते. या संस्थेत सध्या बीबीए एलएलबी अभ्यासक्रमाच्या पाच तुकड्यांमध्ये एकूण 285 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संपूर्णतः निवासी प्रकारच्या या महाविद्यालय परिसरात विविध अभ्यासक्रमविषयक तसेच अभ्यासेतर उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. एकीकृत सामुदायिक कक्ष, व्यायामशाळा आणि विद्यार्थ्यांसाठी भोजनगृह यांचा समावेश असलेले आधुनिक पद्धतीचे वसतिगृह ही या महाविद्यालय परिसरातील एक दर्जेदार सुविधा आहे.

महाविद्यालयाच्या नव्या शैक्षणिक- प्रशासकीय इमारतीमध्ये सहा अत्याधुनिक प्रकारचे वर्ग, संमेलन सभागृह, शिक्षकांचे कक्ष तसेच प्राचार्य आणि रजिस्ट्रार यांची कार्यालये आहेत. साई सभागृहामध्ये 450 प्रेक्षकांची सोय करण्यात आली असून त्यात अत्याधुनिक दृक्श्राव्य प्रणाली उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा तसेच चर्चासत्रे आयोजित करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची व्यवस्था झाली आहे.

महाविद्यालय परिसरातील पायाभूत सुविधा आणि सक्षम शिक्षकवृंद यांच्यामुळे या महाविद्यालयातील शैक्षणिक कार्यप्रणालीचा दर्जा उंचावला आहे. आर्मी कमांडर ए के सिंग यांनी उद्घाटन समारंभात उपस्थित विद्यार्थी, शिक्षक गण आणि व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि आपलेपणाची भावना तसेच स्पर्धात्मक उर्जा देणाऱ्या या संस्थेच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. तसेच एक जबाबदार वकील म्हणून स्वतःला घडविण्यासाठी स्वयंशिस्तीचा मार्ग अनुसरण्याचा सल्ला देखील विद्यार्थ्यांना दिला.
* * *
PIB Pune | M.Iyengar/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1885127)
Visitor Counter : 205