वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

देशाच्या एकूण माल निर्यातीमध्ये 25 टक्के वाटा अभियांत्रिकी क्षेत्राचा असल्याचे वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांचे प्रतिपादन


अभियांत्रिकी क्षेत्राच्या योगदानामुळे यंदा भारताने केली 422 अब्ज डॉलर्स मूल्याची  विक्रमी व्यापारी माल निर्यात

अभियांत्रिकी निर्यात प्रोत्साहन परिषदेत प्रदान करण्यात आले भारताचे 37 वे पश्चिम क्षेत्रासाठीचे पुरस्कार

Posted On: 17 DEC 2022 3:48PM by PIB Mumbai

 

भारतीय अभियांत्रिकी उद्योगाने उत्पादन सुविधांच्या विकासात आणि आधुनिकीकरणात वेगाने प्रगती करून आणि जागतिक दर्जाची अभियांत्रिकी उत्पादने देऊन 'ब्रँड इंडिया' साठी महत्वाचे योगदान दिले आहे, असे वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी म्हटले आहे. त्या अभियांत्रिकी निर्यात प्रोत्साहन परिषद (ईईपीसी) या भारताच्या 37 व्या पश्चिम क्षेत्र पुरस्कार वितरण समारंभात बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या की, भारताने 2021-22 या वर्षात 422 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या माल निर्यातीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट गाठून इतिहास रचला आहे.

"याच कालावधीत अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात 112 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी राहिली असून, त्याचा भारताच्या एकूण निर्यातीत सुमारे 25 टक्के वाटा होता. हे क्षेत्र अशा प्रमुख क्षेत्रांपैकी एक आहे ज्याने कोविडच्या काळात लवचिकता दर्शविली, मंत्री पुढे म्हणाल्या.

भारताचा जीडीपी (सकल राष्ट्रीय उत्पादन ) वाढीचा अंदाज अनेक प्रगत देशांपेक्षा जास्त आहे, हे नमूद करत त्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला.

एक जिल्हा एक उत्पादन अथवा उत्पादन आधारित प्रोत्साहन यासारख्या योजनांमुळे भारतीय अर्थव्यवस्था जगारिक बाजाराशी आणि आपले सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग जागतिक पुरवठा साखळीशी अधिक घट्ट जोडले जातील. विविध देशांबरोबरचे व्यापार करार आपला निर्यात क्षेत्रासाठी अधिकाधिक बाजारपेठा उपलब्ध करतील, मंत्री म्हणाल्या. 

अभियांत्रिकी क्षेत्रामधील सदस्यांना संबोधित करताना ईईपीसी इंडियाचे अध्यक्ष अरुणकुमार गरोडिया म्हणाले, सध्याची जागतिक भू-राजकीय आणि आर्थिक परिस्थिती रशिया-युक्रेन युद्ध आणि ईशान्य आशिया आणि युरोपमधील आर्थिक अस्थिरतेच्या सावटाखाली दिसून येत आहे, तरी चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत जागतिक व्यापारात काही प्रमाणात सुधारणा दिसून येईल.

"2021-22 मध्ये अभियांत्रिकी निर्यातीत उल्लेखनीय सुधारणा होऊनही, काही धोके अजूनही दृष्टीपथात आहेत. महामारीमुळे निर्माण झालेली अस्थिरता अजूनही पूर्णपणे संपली नाही, तेलाच्या किमती चिंता वाटावी इतक्या उच्च स्तरावर आहेत, तर काही प्रदेशांमधील भू-राजकीय प्रश्न ही भीती आणखी वाढवत आहेत, ते म्हणाले. 

   

ते पुढे म्हणाले की, निर्यातदार समुदाय सध्या काही देशांतर्गत समस्यांना तोंड देत आहे, त्यामुळे आगामी काळात निर्यात वाढीला अडथळा निर्माण होऊ शकतो.

आगामी वर्षांमध्ये अभियांत्रिकी निर्यातीच्या वाढीचा सध्याचा वेग सुनिश्चित करण्यासाठी, आम्ही शिफारशींचा संच, त्यावर विचार करण्यासाठी सरकार पुढे सादर केला आहे," अध्यक्ष म्हणाले.

शाश्वत विकास उद्दिष्टांबाबतच्या (SDGs) प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी आणि अन्न, इंधन आणि खतांच्या सुरक्षेशी संबंधित तात्काळ समस्या हाताळण्यामध्ये विकसनशील देशांना पाठिंबा देण्यासाठीच्या जी-20 च्या सामुहिक कृतीवर भर देत मुंबईमध्ये नुकतीच तीन दिवसीय विकास कार्यकारी गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती. 

भविष्यातील अभियांत्रिकी क्षेत्राच्या विकासामुळे जीडीपीच्या दृष्टीने जी-20 मधील पहिल्या 3 देशांमधील एक होण्यासाठी भारताला खूप मदत होईल, अशी आशा अध्यक्षांनी व्यक्त केली. 

अभियांत्रिकी निर्यातीमधील उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल, पश्चिम विभागातील सर्व 97 निर्यातदारांचे, गरोडिया यांनी अभिनंदन केले.

ईईपीसी इंडिया वेस्टर्न रीजन एक्सपोर्ट अवॉर्ड्ससोहळा हा अभियांत्रिकी निर्यातीमधील उल्लेखनीय कामगिरीचा  गौरव करण्यासाठी, राष्ट्रीय आणि  प्रादेशिक स्तरावर दरवर्षी आयोजित केला जाणारा एक प्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे.

आपल्या स्वागतपर भाषणात, ईईपीसी इंडियाचे प्रादेशिक अध्यक्ष (पश्चिम क्षेत्र), अनुप मारवा  म्हणाले की, देशातून होणाऱ्या एकूण अभियांत्रिकी निर्यातीपैकी जवळजवळ 36 टक्के वाटा पश्चिम क्षेत्राचा आहे.

पश्चिम विभागातील महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या राज्यांचा एकत्रित जीडीपी  सुमारे 840 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतका आहे, जो नेदरलँड, सौदी अरेबिया, स्वीडन, स्वित्झर्लंड, पोलंड बेल्जियम इत्यादी देशांच्या जीडीपी पेक्षा जास्त, आणि टर्कीच्या जवळजवळ समतुल्य आहे, मारवा म्हणाले.

***

N.Chitale/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1884442) Visitor Counter : 256


Read this release in: English